गोवा काँग्रेसने काल प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवनकडून भाजपच्या मुख्यालयापर्यंत मिरवणूक काढली आणि केंद्र सरकारने देशात जातिनिहाय जनगणना करण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्या निर्णयाचे स्वागत केले. तसेच त्याचे श्रेय काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाच जाते, असे राज्यातील काँग्रेस नेत्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
केंद्र सरकारने जनगणनेच्या वेळी देशभरात जातिनिहाय जनगणना करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते या नात्याने बोलताना राहुल गांधी यांनी संसदेतून केली होती आणि जातिनिहाय जनगणनेसाठी आग्रह धरला होता. त्यामुळे आता केंद्राने जातिनिहाय जनगणना करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याचे श्रेय राहुल गांधी यांना द्यावे लागणार असून, हा देशातील जनतेचा विजय असल्याचे युरी आलेमाव, अमित पाटकर, काँग्रेस आमदार कार्लुस फेरेरा व रामकृष्ण जल्मी यांनी यावेळी सांगितले.
राहुल गांधी जेव्हा जेव्हा संसदेत जातिनिहाय जनगणनेची मागणी करायचे त्या त्या वेळी भाजप नेते त्यांची भर संसदेत थट्टा करायचे; पण शेवटी वाढत्या दबावामुळे केंद्रातील भाजप सरकारला जातिनिहाय जनगणनेसाठी होकार द्यावा लागला, असे पाटकर म्हणाले. या जातिनिहाय जनगणनेमुळे देशातील आदिवासी, दलित, ओबीसी आदींना आरक्षण, रोजगार, बढत्या तसेच अन्य वेगवेगळ्या सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. देशातील एकूण लोकसंख्येत ह्या लोकांची संख्या किती आहे हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना त्यांचे हक्क मिळू शकतील, असेही पाटकर म्हणाले.

