‘गोवा उज्ज्वला’साठी महिलांच्या नावे अर्ज करा

0
16

>> मुख्यमंत्र्यांकडून सूचना; आतापर्यंत 50 हजार कार्डधारकांना लाभ; एकूण दीड लाख अर्ज प्राप्त

राज्य सरकारच्या ‘गोवा उज्ज्वला’ योजनेचा आतापर्यंत 50 हजार कार्डधारकांना लाभ मिळाला असून, सुमारे दीड लाख लाभार्थ्यांनी योजनेसाठी अर्ज केले आहेत. मात्र, त्यातील तब्बल 40 हजार अर्ज पतींच्या नावाने दाखल झाल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सांगितले. महिलांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज आपल्या नावाने करावा, असे आवाहन त्यांनी केले. एकूण अर्जांपैकी 40 हजार अर्ज हे महिलांऐवजी त्यांच्या पतीच्या नावाने सादर झाले आहेत. पतीऐवजी महिलांना आपल्या नावाने अर्ज द्यावे लागतील. कारण ही योजना महिलांसाठी आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

एलपीजी ग्राहकांना वार्षिक तीन एलपीजी सिलिंडरच्या मोफत देणाऱ्या ‘गोवा उज्ज्वला योजने’च्या अंमलबजावणीनंतर, लोकांशी संवाद साधण्यासाठी आणि या महत्त्वपूर्ण उपक्रमाची व त्याच्या अंमलबजावणीची माहिती देण्यासाठी काल बायणा येथील रवींद्र भवनच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, आमदार संकल्प आमोणकर, आमदार दाजी साळकर, नरेंद्र सावईकर व मान्यवर उपस्थित होते.

माझ्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळावा, अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे महिलांनी अर्ज आपल्या नावाने भरावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. ज्या महिलांना गृहआधार मिळत नाही, त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. महिलांचा अधिकार कुणी हिसकावून घेणार नाही याची खात्री आमचे सरकार देत आहे. निवडणुकीआधी महिलांना वाढीव गृहआधार मिळणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. आतापर्यंत भाजप सरकारने 950 कोटी रुपये मुलींच्या लग्नासाठी अर्थात ‘लाडली लक्ष्मी’ योजनेखाली दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

>> ज्या 40 हजार महिलांनी आपल्या पतीच्या नावाने मोफत गॅस सिलिंडर योजनेसाठीचे अर्ज भरले आहेत, त्यांना आता ते अर्ज मागे घेऊन आपल्या नावाने अर्ज भरून द्यावे लागणार आहेत.