गोवा आणि मराठी संस्कृतीचे नाते अतूट : मुख्यमंत्री

0
12

15 व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन; मोहन जोशींना कृतज्ञता पुरस्कार प्रदान

गोवा आणि मराठी संस्कृतीचे नाते अतूट आहे. गोव्यात कोकणी बोलली जात असली, तरी मराठी दूरदर्शन मालिका, मराठी चित्रपट पाहण्यास गोमंतकीय रसिक उत्सुक असतात. गोवा म्हणजे समुद्र किनारे, वाळू आणि पर्यटन ही केवळ ओळख नसून, गोव्याला लोकसंस्कृतीचे वैभव आहे. हजारो वर्षांचा कदंबकालीन, शिवाजी महाराजांचा व स्वातंत्र्यसेनानींचा इतिहास आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे केले.

विन्सन वर्ल्ड आयोजित 15 व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे आयनॉक्स थिएटरमध्ये काल दिग्गज मराठी सिनेकलाकारांच्या उपस्थित उद्घाटन केल्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गोवा मनोरंजन सोसायटीच्या उपाध्यक्ष डिलायला लोबो, विन्सन वर्ल्डचे संजय शेट्ये व श्रीपाद शेट्ये उपस्थित होते.
यावेळी यंदाचा कृतज्ञता (जीवन गौरव) पुरस्कार ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महेश मांजरेकर यांचाही सत्कार करण्यात आला.

गोवा हे इफ्फीसाठी कायमचे केंद्र आहे; पण गोवा मराठी चित्रपट महोत्सव त्याच दर्जाचा होतो. गोवा सरकार मराठी आणि कोकणी चित्रपट निर्मितीसाठी अनेक सवलती देते. गोव्यात चित्रिकरणासाठी येणाऱ्यांना सरकार सिंगल विंडो क्लिअरन्स देते, असे मुख्यमंत्री म्हणाले.
महोत्सवाच्या उद्घाटनानंतर ‘बंडखोरब चित्रपटाचा प्रीमियर झाला व त्याने रसिक प्रभावित झाले. या चित्रपटासंदर्भात महेश मांजरेकर यांनी भाष्य केले. हा चित्रपट कमी वेळेत कसा तयार झाला, हे मलाच कळले नाही. मी एवढा जलद गतीने सिनेमा कधीच केला नव्हता व एवढे निर्माते पाहिले; पण संजय शेट्येंसारखा लाभला नव्हता. मी स्क्रिप्ट आधी देत नाही; कारण मग कलाकार आधी तयारी करून येतो व मला ते कधी पटत नाही. गोव्याच्या कलाकारांचे मला कौतुक वाटते; कारण त्यांनीही नैसर्गिक अभिनय केला आहे, असे मांजरेकर म्हणाले.
मोहन जोशी यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. हा सन्मान मला विशेष वाटतो कारण महाराष्ट्राबाहेर आम्हा कलाकारांवर गोमंतकीय रसिकांनी भरभरून प्रेम केले आहे, असे जोशी म्हणाले.

या उद्घाटन सत्राला अनेक लोकप्रिय सिने कलाकारांची, निर्मात्यांची व दिग्दर्शकांची मांदियाळी होती. त्यात गजेंद्र अहिरे, किशोर कदम, रेणुका शहाणे, सुबोध भावे, छाया कदम, सचिन खेडेकर, जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव, नेहा पेंडसे, मृण्मयी गोडबोले, मंगेश देसाई, केदार शिंदे, प्रार्थना बेहेरे, ईशिता देशमुख, मानसी नाईक, मानसी पाटील, मयुरा प्रधान, प्रियदर्शन जाधव, नेहा जोशी, प्रियदर्शनी इंदलकर, सई मांजरेकर, दीप्ती धोत्रे, तितिक्षा तावडे, सुरज सुमन, सुनील फडतरे, भूषण प्रधान, सीमा बिस्वास आदींचा समावेश होता.