राज्यात कर्करोग उपचारांना गती देण्यासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये (गोमेकॉ) एकात्मिक कर्करोग बाह्यरुग्ण विभाग लवकरच सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरी येथील सचिवालयातील आयुष वेलनेस सेंटरच्या उद्घाटन केलेल्या बोलताना काल केले.
या एकात्मिक कर्करोग बाह्यरुग्ण विभागासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आर्येवेद- गोवा आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. राज्यात कर्करोग रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. कर्करोग रुग्णांना आधुनिक वैद्यक शास्त्रासोबत आयुर्वेद, जीवनशैली सुधारणा आणि पूरक उपचारांचा लाभ उपलब्ध करून दिला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
कर्करोग उपचारात आधुनिक औषधांबरोबरच आयुर्वेद, आहार नियोजन, योग, मानसिक आरोग्य व्यवस्थापन आणि पूरक उपचारांचा एकत्रित वापर केला जाणार आहे. एकात्मिक कर्करोग उपचार संकल्पनेत निदान, उपचार आणि पुनर्वसन या सर्व बाबी एकाच छताखाली उपलब्ध होतात. त्यामुळे रुग्णांच्या केवळ आजारावर नव्हे, तर त्याच्या एकूण आरोग्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. ही सुविधा आगामी काळात आरोग्य केंद्र, सामाजिक आरोग्य केंद्रात विस्तारली जाणार आहे. त्यामुळे गोव्यातील रुग्णांना दर्जेदार उपचारासाठी परराज्यात जावे लागणार नाही, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
सचिवालयातील वेलनेस सेंटरमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना योग, मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीचे मार्गदर्शन मिळणार आहे. हे वेलनेस सेंटर सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यत कार्यरत राहणार असून याठिकाणी आयुष डॉक्टर उपलब्ध असणार आहे. राज्यात गोमेकॉसह प्राथमिक, सामाजिक आरोग्य केंद्र, जिल्हा इस्पितळात आयुष वेलनेस सेंटर सुरू केले जाणार आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
केंद्र सरकारने गोव्यात 28 आयुष वेलनेस सेंटर मंजूर केले आहेत. या सेंटरच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले. यावेळी मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू, आरोग्य सचिव यतींद्र मराळकर, आरोग्य खात्याच्या संचालिका डॉ. रूपा नाईक व इतरांची उपस्थिती होती.

