गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने प्रथमच राज्यात अंधत्व सर्वेक्षणाचे काम सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती नेत्र विकारावरील उपचार विभागाच्या सूत्रांनी दिली. आरोग्य खात्याच्या सहकार्याने वरील सर्वेक्षण केले जाईल.
राष्ट्रीय पातळीवर ३० वर्षांपूर्वी अशा प्रकारचे सर्वेक्षण करण्यात आले होते. अन्य राज्याच्या तुलनेत गोव्यात दृष्टीहिनांचे प्रमाण कमी असल्याचे सांगण्यात आले. राज्यात सकस आहाराचे प्रमाण चांगले असल्याने ‘कार्निव्हल’ अंधत्वाची प्रकरणे कमी सापडतात, असा अनुभव असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मोती बिंदूचे प्रमाण गोव्यात अधिक आहे. वृद्धत्वामुळे मोतीबिंदू होतो. राज्यात वृद्धांची संख्या अधिक असल्याने मोतीबिंदूचे प्रमाण वाढल्याचे सांगण्यात आले. मधुमेहामुळेही नेत्र विकार होत असतात. गोव्यात मधुमेहाचे प्रमाण अधिक आहे.
वरील सर्वेक्षणानंतर राज्यात अंधत्व झालेल्यांची संख्या किती आहे हे स्पष्ट होऊ शकेल.