विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांनी गोव्याला, देशाला व जगाला दिलेल्या योगदानाची दखल घेऊन सरकारने त्यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड केल्याचे मांद्रेकर यांनी सांगितले.
डॉ. माशेलकर हे सीआय एसआर भटनागर फेलो, ग्लोबल रिसर्च अलायन्सचे अध्यक्ष आहेत. या संस्थेचे ६० हजार शास्त्रज्ञ सदस्य असल्याचे त्यांनी सांगितले.
गोव्याच्या या थोर सुपुत्राने ३० प्रयोगशाळांचा कारभार चालविणार्या काऊंसिल ऑफ सायन्टिफीक ऍन्ड इंडस्ट्रीयल रिसर्चचे ११ वर्षे सरसंचालकपद भूषविले होते, इंडियन नेशनल सायन्स ऍकाडमी, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल इंजिनीयर्सचेही अध्यक्ष असून त्यांनी अनेक कंपन्यांचे संचालक म्हणून काम केले आहे.
१९९८ साली रॉयल सोसायटी लंडनचे फेलो म्हणून निवड झालेले तिसरे भारतीय असल्याचे मांद्रेकर म्हणाले. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने १९९१ साली पद्मश्री तर २००० साली पद्मविभूषण किताब प्रदान केला होता. त्यांना बिझनेस विक (अमेरिका) ‘स्टार्स ऑफ एसिया’ पुरस्कार जॉर्ज बुश यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांच्या सायंटिफिक ऍडव्हायजरी कौन्सिलचे ते सदस्य होते.
डॉ. माशेलकर यांनी आतापर्यंत अत्यंत प्रतिष्ठेचे असे ५० पुरस्कार प्राप्त केले आहेत. त्यात भटनागर पारितोषिक, पंडित नेहरू टेक्नोलॉजी अवॉर्ड, जीडी बिर्ला सायंटिफिक अवार्ड, एचआरडी एक्सलन्स अवार्ड, इंडियन सायन्स कॉंग्रेसचा जीवन गौरव पुरस्कार आदींचा समावेश आहे.
गोमंतविभूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याची लवकर तारीख जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. रोख पाच लाख रुपये व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.