>> जुने गोवेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गोवा कृषी महाविद्यालयाचे उद्घाटन; इच्छुक विद्यार्थ्यांना मोठा फायदा
गोवा कृषी महाविद्यालय उभारण्यासाठी सरकारने जमीन निश्चित केली असून, या महाविद्यालयासाठीची इमारत व अन्य साधनसुविधा येत्या २ वर्षांच्या काळात उभ्या राहणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. जुने गोवे येथील एला फार्म येथे एका तात्पुरत्या जागेत या महाविद्यालयाचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. गोमंतकीय विद्यार्थ्यांना यापूर्वी कृषी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी राज्याबाहेर जावे लागत होते; परंतु आता सरकारने राज्यातच कृषी महाविद्यालय सुरू केल्याने त्यांना मोठा फायदा होणार आहे.
यावेळी कृषीमंत्री रवी नाईक, कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई, कृषी सचिव अरुण कुमार मिश्रा, गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. हरिलाल मेनन, उच्च शिक्षण संचालक प्रसाद लोलयेकर, कृषी संचालनालयाचे संचालक नेविल अल्फोन्सो, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण भेंडे, उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष सिद्धेश नाईक, जुने गोवेच्या सरपंच सँड्रा गोन्साल्विस उपस्थित होत्या. जुने गोवे येथे राज्य कृषी व्यवस्थापन आणि विस्तार प्रशिक्षण संस्था गोवा आणि कृषी संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे गोवा कृषी महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे.
राज्यात १.५ लाख हेक्टर एवढ्या जमिनीत पीक घेतले जात आहे. असे असले तरी कृषी क्षेत्रात संशोधन होण्याची गरज आहे. पुढील काळात राज्यात एमएससी कृषी पदवी, पशुचिकित्सा महाविद्यालय आणि मत्स्यपालनातही पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला.
नव्याने प्रवेश घेतलेले विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे महाविद्यालय सुरळीत चालेल आणि भविष्यातील पदवीधरांना उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी सर्व आवश्यक मान्यता असतील, असे आश्वासन दिले. हे महाविद्यालय चांगले चालविण्यासाठी सरकार मदत करण्यात कुठेही कमी पडणार नाही. या महाविद्यालयात कृषी विषयात पदव्युत्तर शिक्षण सुरू करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेही मुख्यमंत्र्यांनी अधिकाधिक काजू लागवडीला प्रोत्साहन देण्याची सूचना केली. किसान क्रेडिट कार्ड सुविधा अशा अनेक उपक्रमांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
या नव्या गोवा कृषी महाविद्यालयासाठी आयसीएआरची मान्यता मिळवण्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे. या महाविद्यालयाच्या पहिल्या तुकडीसाठी ५० विद्यार्थ्यांनी बीएससी कृषी पदवी मिळवण्यासाठी प्रवेश घेतला आहे. या महाविद्यालय जवळच असलेल्या भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या समन्वयाने महाविद्यालयात कृषी अभ्यासासाठी संशोधन संस्था सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गोव्यातील यापुढे कोणतीही शेतजमीन कृषीशिवाय इतर कोणत्याही वापरासाठी बदलली जाणार नाही, याची काळजी आपण घेतली आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेल्या अमूल्य संपत्तीचे आपणच रक्षण केले पाहिजे.
- रवी नाईक,
कृषीमंत्री.