Home बातम्या गोमंतकातील प्राचीन गणेश देवालये

गोमंतकातील प्राचीन गणेश देवालये

0

– ऍड. पांडुरंग नागेंद्र नागवेकर

गोमंतकात पोर्तुगीज आक्रमकांनी १५१० मध्ये तिसवाडी तालुका (तिसविषयक) कब्जात घेतल्यानंतर त्यांनी रोमन कॅथॉलिक धर्मप्रसार व प्रचारकार्य चालविताना इथल्या सर्व देवदेवतांच्या मंदिरांची सर्रासपणे तोडफोड करून हिंदू धर्म या तालुक्यातून कायमपणे हटविण्यासाठी प्रयत्न केला. त्यांची अशी इच्छा होती की, गोवा हा प्रदेश ‘पूर्वेकडील रोम’ बनण्यासाठी योग्य ठिकाण आहे. त्यानंतर त्यांनी १५४३ पर्यंत बार्देश (बहारदेश) आणि सासष्टी (षटषष्टी) हे दोन्ही तालुके कब्जात घेऊन रोमन कॅथलिक धर्मप्रसार व प्रचारकार्य सुरू केले. त्यासाठी दि. ३० जून १५४१ रोजी पोर्तुगीज राजवटीने एक हुकूमनामा (उरीींर ीशसळर) प्रस्तृत केला. परंतु सदर हुकूमनाम्यापूर्वी इ. स. १५४० मध्येच पोर्तुगिजांनी त्यांच्या राजाचा हुकूम येण्यापूर्वीच तिसवाडी तालुक्यातील हिंदू देवालये नष्ट करण्याचे क्रौर्य सुरू केले. सदर हुकूमनामा म्हणजे अर्थात माकडाच्या हाती कोलित देण्यासारखा प्रकार झाला. त्यामुळे सरकारने सदर हुकूमाची तत्काळ अंमलबजावणी करून त्याचवर्षी तिसवाडी तालुक्यातील एकूण एक हिंदू देवालये नष्ट करण्याचे फर्मान सोडले. सदर हुकूमाची तत्काळ अंमलबजावणी करून त्याचवर्षी तिसवाडी तालुक्यातील बहुतेक देवालये पोर्तुगिजांनी जमीनदोस्त केली.

पोर्तुगीज धर्मप्रसारप्रमुख पाद्री मिंगेल वाझ याने त्याचे दोन सहकारी मेश्त्रो डायगो आणि पेरो फर्नांडिस यांच्या सहकार्याने तिसवाडी तालुक्यातील सर्व हिंदूंना जुलूमजबरदस्तीने त्यांची स्वत:च्या देवदेवतांची मंदिरे स्वहस्ते जमीनदोस्त करण्यास भाग पाडले. तिसवाडी तालुक्यातील सर्व हिंदू मंदिरे तोडल्यावर सदर मंदिरांची सर्व मालमत्ता, त्याचप्रमाणे मंदिरांच्या सेवेकर्‍यांना नमशीद्वारे बहाल करण्यात आलेल्या शेतजमिनी व बागायती जप्त करून सदर मंदिरांच्या जागी उभारण्यात आलेल्या नूतन कॅथॉलिक चर्चीसना प्रदान केल्या.

दि. ८ मार्च १५४६ रोजी पोर्तुगीज राजसत्तेने उअठढअ ठएॠखअ हा हुकूमनामा पुन्हा लागू करून तिसवाडी, बार्देश व सासष्टी तालुक्यांतील सर्व मंदिरे तोडली, सर्व सार्वजनिक आणि खासगी हिंदू उत्सवांवर बंदी लावली आणि तेथील ब्राह्मणांना गोवा सोडण्याचा हुकूम केला. लाकूड, पाषाण व धातूपासून मूर्ती बनविणार्‍या मूर्तीकारांना कठोर सजा फर्मावण्यात आल्या आणि मूर्तीपूजा हद्दपार करण्यासंबंधीचा हुकूम लावला. दि. २५ मार्च १५५९ रोजी हिंदू घरातील खाजगी मूर्तीची पूजाअर्चा बंद ठेवण्याचा हुकूम जारी करून तो मोडणार्‍यांवर कडक कारवाई करून वरील प्रकरणाची खबर देणार्‍या खबर्‍यांना सदर हिंदूंची अर्धी मालमत्ता देणे आणि शिल्लक राहिलेला अर्धा हिस्सा गावातील नूतन चर्चच्या धार्मिक कार्यावर खर्च करणे, असे कडक फर्मान सदर कायदा न पाळणार्‍या हिंदूंना काढण्यात आले.

उपरोल्लेखित सर्व कारणांस्तव वरील तिन्ही तालुक्यांतील हिंदूंना त्यांची मंदिरे व मूर्ती कायमची गमवावी लागली. बहुसंख्य हिंदूंनी वरील तिन्ही तालुके सोडून त्यांच्या दैवतांसकट गोमंतकातील उर्वरित, किंबहुना हिंदुस्थानातील इतर भागांत कायमचे स्थलांतर केले. या सर्वांनी मूळ गावातील त्यांच्या घर व जमीनजुमल्यांना कायमची तिलांजली वाहिली. स्वत:चे जमीनजुमले व घरे राखून ठेवण्यासाठी ज्यांनी आपला मूळ गाव सोडण्यास नकार दिला ते सर्व हिंदू कायमचे कॅथलिक ख्रिश्‍चन बनले.

अशा या धार्मिक धामधुमीच्या कालखंडात बहुसंख्य हिंदू देवदेवतांची मंदिरे नष्ट झाली. या नष्ट झालेल्या मंदिरांत श्रीगणेशाच्या अनेक मंदिरांचा समावेश होता.

गोमंतकातील प्राचीन गणेश देवालये

जुनी काबिजाद

तिसवाडी तालुका

पणजी– पणजी शहरात प्राचीनकाळी श्रीगणेशाचे मंदिर नसल्याचे संभवते. सध्या अस्तित्वात असलेली वरदविनायक, आपटेश्‍वर वगैरे मंदिरे ही गोमंतकाच्या स्वातंत्र्यानंतर उभारण्यात आल्याचे संभवते.

१) दिवाडी बेट- श्रीगणेश (नावेली), २) करंबोळी – श्री गणेश, ३) चोडण – श्री गणेश, ४) हेळे (जुने गोवे) – श्री गणेश.

बारदेश तालुका

१) म्हापसा शहर- श्री गणपती (लक्ष्मीनारायण देवाचा संलग्न देव), २) कोलवाळे- श्री गणपती (संलग्न देवता), ३) वळावली- श्री गणेश, ४) पोंबुर्पा- श्री गणेश, ५) पुनोळा- श्री गणेश, ६) सांगोल्डा- श्री गणेश, ७) शिवोली- श्री गणपती.

सासष्टी तालुका

१) बेताळभाटी- श्री गणेश, २) चंद्रापूर (चांदर)- श्री गणेश, ३) कुयेली- श्री गणेश, ४) केळशी- श्री गणेश.

तिसवाडी, बारदेश आणि सासष्टी हे तालुके मिळून जुनी काबिजाद ठरते. वरील तिन्ही तालुके पोर्तुगिजांनी सोळाव्या शतकात प्रथम कब्जात घेतले म्हणून त्यांना जुनी काबिजाद असे म्हणतात. या तिन्ही तालुक्यांत त्यांनी धर्मांतराच्या नावाखाली सर्व हिंदू मंदिरे तोडून टाकली आणि त्यांतील सर्व देवदेवतांच्या मूर्ती पण मोडून टाकल्या. (म्हापशातील लक्ष्मीनारायणाच्या मंदिरातील श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना इ. स. १९२९ मधील तर कोलवाळच्या श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना १९४३ मध्ये झाल्याने या मूर्ती धर्मच्छलाला बळी पडल्या नाहीत.) दिवाडी गाव सोडल्यास इतर गावांतील श्री गणेशाचे कुळावी कोण होते याचा पत्ता लागू शकत नाही.

नवी काबिजाद

डिचोली तालुका

१) बोर्डे किंवा बोड्डे- श्री गणपती, २) नानोडे- श्री गणपती, ३) नार्वे- श्री गणपती, ४) साखळी- श्री गणपती.

काणकोण तालुका

१) काणकोण- श्री गणपती, २) गावडोंगरी- श्री गणपती.

पेडणे तालुका

१) मोरजी- श्री गणपती, २) पारशें- श्री गणपती.

फोंडा तालुका

१) बांदिवडे- श्री गणपती, २) खांडेपार- श्री गणपती, ३) खांडोळा- श्री गणपती, ४) कुंडई- श्री गणपती, ५) मडकई- श्री गणपती, ६) माशेल- श्री गणपती, ७) मार्दोळ- श्री गणपती, ८) मार्दोळ- श्री गणपती (संलग्न देवता), ९) कपिलेश्‍वरी- श्री गणपती.

केपे तालुका

१) कुडचडे- श्री गणपती.

सांगे तालुका

१) कुर्पे- श्री गणपती.

दीपवाडी बेटातील (नावेली) श्री गणेशाचे पुरातन मंदिर

दीपवाडी किंवा दिवाडी हे बेट एकूण चार गावांत विभागले गेले असून प्रत्येक गावाची स्वत:ची अशी एक स्वतंत्र गावकरी ग्रामसंस्था आहे. या बेटातील नावेली गावात श्री गणेशाचे एक मंदिर प्राचीनकाळी उभारण्यात आले होते. इतिहासकारांच्या मतानुसार तिसवाडी तालुक्यातील सर्व हिंदू मंदिरे इ. स. १५४० ते ४१ या दरम्यान जमीनदोस्त करण्यात आली. परंतु या घटनेस दिवाडी बेट व तिथली हिंदू मंदिरे अपवाद ठरतात.

आन्फोंसो दे आल्बुकर्क याने गोवा बेट कब्जात घेतल्यावर तिथल्या हिंदूंना अनेक आश्‍वासने दिली. त्यांपैकी एक आश्‍वासन असे होते की, पोर्तुगीज सरकार हिंदू धर्माच्या विरोधात कधीच जाणार नाही, तर दुसरे आश्‍वासन गावकरी ग्रामसंस्था (कोमुनिदाद) आहे त्या स्वरुपात कायम ठेवून सदर संस्था पूर्वीच्या राजवटीला जो कर फारकत करीत होत्या तेवढाच कर सदर संस्थांनी नवीन राजवटीला द्यावा.

वरील दोन्ही आश्‍वासनांमुळे तिथले हिंदू निश्‍चिंत झाले. गोवा बेटातील जवळ जवळ ६ हजार मुस्लिमांचे शिरकाण केल्यामुळे आणि हिंदू धर्माला अभय दिल्याकारणाने आन्फोंसो दे आल्बुकर्क हिंदूंचा रक्षणकर्ता ठरला. हिंदूंना तो एखाद्या देवदूताप्रमाणे भासू लागला. परंतु आन्फोंसो दे आल्बुकर्कचा ‘हिंदू धर्माचा राखणदार’ हा मुखवटा १५१३ मध्ये गळून पडला. गोवा बेट घेतल्यानंतर दोन वर्षापर्यंत हिंदू मंदिर तथा हिंदू धर्मामध्ये आन्फोंसो दे आल्बुकर्कने ढवळाढवळ केली नाही. परंतु गोमंतकाच्या इतिहासात दिवाडी बेटातील नावेली या गावी असलेले श्री गणेशाचे भव्य आणि दिव्य मंदिर इ. स. १५१३ मध्ये जमीनदोस्त करून त्याठिकाणी ‘खसीशूर ऊश छेीीर डशपहेीर ऊर डशीीरफ ढहश उर्हीीलह ेष र्जीी ङरवू ेष डशीीर (र्चेीपींरळप) (पर्वतीय देवीचे गिरीजाघर) उभे केले. श्री गणेशाचे सदर मंदिर आन्फोंसो दे आल्बुकर्कच्या हुकूमानुसार जमीनदोस्त करण्यात आले आणि त्याच्याच सांगण्यावरून त्याठिकणी पर्वतीय देवीचे मंदिर उभारण्यात आले.

(ब्रागांझा पेरेरा- ओरियांते पोर्तुगीज १९३९, नं. २३ )

या बेटातील इतर हिंदू देवालये पाडण्यास पोर्तुगिजांनी इ. स. १५१५ मध्ये सुरुवात केली. नावेली गावातील श्री गणेशाचे मंदिर पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त करून त्याच्या बाजूला कॅथॉलिक धर्मीयांची स्मशानभूमी बांधली. सदर स्मशानभूमीत सध्या एक जुनी चॅपेल आहे. या चॅपेलच्या छताच्या वरच्या पण आतील भागात काळ्या पाषाणावर कोरलेले एक हिंंदू शिल्प पाहण्यास मिळते. त्याचप्रमाणे खिडक्यांच्या काळ्या पाषाणाच्या दोन चौकटी सदर चॅपेलच्या भिंतीला लावलेल्या आढळून येतात. सदर खिडक्यांच्या चौकटींना जाळीदार कलाकुसरीच्या काळ्या फळ्या बसविण्यात आल्या आहेत. सांगे तालुक्यातील तांबडी सुर्ला येथील कदंबकाळी बांधण्यात आलेल्या भगवान श्री महादेवाच्या मंदिराला करण्यात आलेल्या कलाकुसरीच्या कारागिरीत आणि दिवाडी बेटातील नावेली गावातल्या प्राचीन भगवान श्री गणेशाच्या मंदिरातील (सध्याचे ख्रिश्‍चन चॅपेल) कलाकुसरीच्या कारागिरीत एकदम साम्य असल्याचे आढळून येते. त्यामुळे गणेशाचे सदर मंदिर कदंब काळातील असल्याचे संभवते. मूळ मंदिराच्या सखल भागातील जमिनीत एक प्राचीन तळ्याचे अवशेष पाहण्यास मिळतात. सदर तळी श्री गणेशाच्या मंदिराची होती हे संभवनीय आहे. इ. स. १५१५ मध्ये पोर्तुगीज कप्तान आन्फोंसो दे अल्बुकर्कने दिवाडी बेटातील सर्व मंदिरे नष्ट करण्याचा जणू चंगच बांधला. त्यानुसार तिसवाडी तालुक्यातील दिवाडी बेटावरील सर्व मंदिरे प्रथम तोडण्याचा पोर्तुगिजांनी निर्णय घेतला. त्यापूर्वी १५१३ मध्ये नावेली गावातील श्री गणेशाच्या मंदिरावर प्रथम घणाचे घाव घालण्यात आले.

इ. स. १५१३ मध्ये भगवान श्री गणेशाच्या कुळाव्यांना पोर्तुगीज ख्रिस्ती प्रचारक मंदिर तोडण्यासाठी जुन्या गोव्याहून येत असल्याचा सुगावा लागला. त्यांनी जलदगतीने पावले उचलून नावेलीतील मंदिरातील गणेशाची काळ्या पाषाणाची मूर्ती विधीवत उचलून डिचोली तालुक्यातील नार्वे गावात स्थलांतरित केली. सदर गावात हंगामी स्वरुपात मूर्तीची स्थापना करून नंतर काही कालखंडानंतर श्री गणेशाची मूर्ती नार्वे गावातून हलवून फोंडा तालुक्यातील खांडयेपार येथे नेऊन त्या गावात तिची विधीवत स्थापना करण्यात आली. दि. १७ जानेवारी १७९१ रोजी अंत्रुज महाल (फोंडा तालुका व आसपासचा भाग) पोर्तुगिजांच्या हाती पडला. तत्पूर्वी दि. २७ मार्च १७५६ रोजी पोर्तुगिजांनी एका हुकूमाद्वारे नवी काबिजादीतील हिंदू मंदिरे जमीनदोस्त करण्यासंबंधीचे एक फर्मान जारी करून भोसल्यांकडून जिंकून घेतलेल्या प्रदेशात सार्वजनिकरीत्या हिंदू उत्सव साजरे करण्यावर बंदी आणली.

दि. १७ जानेवारी १७९१ रोजी पोर्तुगिजांनी अंत्रुज महाल ताब्यात घेतल्यावर खांडयेपारातील श्री गणेशाच्या मंदिरातील मूर्ती कुळाव्यांनी सोबत घेऊन फोंडा तालुक्यातील तिवरे- वरगाव हा गाव गाठला. श्री देवाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या गावच्या सीमेवरील खांडोळा या गावात मंदिर उभारून त्यात श्री गणेशाची मूर्ती कायम स्वरुपात स्थापन केली. पुढे खांडोळा गावात श्री गणेशाचे एक भव्य मंदिर कुळाव्यांनी बांधून त्यात श्री गणेशाच्या प्राचीन मूर्तीची विधीवत प्रतिष्ठापना केली. या गणपतीला श्री महागणपती असे म्हणतात. गोमंतकातील एक प्राचीन तथा सुप्रसिद्ध श्री गणेश म्हणून या देवाला ओळखले जाते.

पोर्तुगीज कप्तान आन्फोंसो दे अल्बुकर्क याची गोव्यातील राजसत्तेची कारकीर्द एकदम छोट्या कालखंडाची राहिली. दि. १० फेब्रुवारी १५१० रोजी त्याने गोव्यात प्रवेश केला आणि दि. २७ डिसेंबर १५१५ रोजी तो मेला. एकूण पाच वर्षे, दहा महिने व सतरा दिवसांच्या कालखंडात त्याने अनेक नवीन ख्रिस्ती चर्चेस तिसवाडी तालुक्यात उभारल्या. परंतु एखादे हिंदू मंदिर उद्ध्वस्त करून त्यावर ख्रिस्ती चर्च उभारल्याचे आढळत नसल्याने काही इतिहासतज्ज्ञ त्याला सहिष्णू मानतात. परंतु हे बरोबर नाही. दिवाडी येथील नावेली गावातील श्री गणेशाच्या मंदिरासंबंधीचे लिखित स्वरुपातील दोन दाखले आन्फोंसो दे अल्बुकर्क हा कट्टर ख्रिश्‍चन धर्मपंथी होता आणि त्याच्याच काळात मोडले गेलेले नावेलीतील श्री गणेशाचे मंदिर व त्यानंतर सदर मंदिराच्या जागी त्याने उभारलेल्या चर्चमुळे आन्फोंसो दे अल्बुकर्क हा सहिष्णू नव्हता तर तो एक ख्रिस्ती कट्टरपंथीय होता हे सिद्ध होते.

प्रथम पुरावा : आंद्रे कोरसाली या पोर्तुगीज प्रवाशाने दि. ६ जानेवारी १५१५ रोजी कोचीनहून ज्युलियाव दे मॅदिसी याला पत्र लिहून गोमंतकातील पोर्तुगीज राजवटीने धर्माच्या नावाखाली मांडलेला उच्छाद नोंद केला आहे. ते सदर पत्रात म्हणतात, ‘हिंदुस्थानात ज्याप्रमाणे सगळीकडे परमेश्‍वराचे वास्तव्य असलेल्या आणि ज्यात उच्च तथा कुलीन आचार-विचार पाळण्यात येणार्‍या भव्य प्राचीन इमारती सापडतात, तशाच प्रकारच्या अनेक भव्य इमारती गोवा शहरात तथा त्या शहरानजीक असलेल्या दिवाडी बेटावर होत्या. सदर इमारतींना ‘झअॠजऊए’ (देवालय) असे म्हणण्यात येते. सदर मंदिरात काळ्या पाषाणात कोरलेल्या देवदेवतांच्या मूर्तींंचे व इतर कलाकुसरीचे नक्षीकाम उच्च कोटीतले होते. सदर नक्षीकामात प्राचीन कलाकुसरीची झलक पाहण्यास मिळत होती. अशा प्रकारची सुंदर तथा प्राचीन मंदिरे पोर्तुगिजांनी कोणाचीही पर्वा न करता उद्ध्वस्त करून टाकली. सध्या त्याठिकाणी जमीनदोस्त झालेल्या मंदिरांचे काही अवशेष पाहण्यास मिळतात.’

(रामुसिओ, प्रिमो, खंड दॅले, नेविगेशनेट वियाजी, पान नं. १९६)

द्वितीय पुरावा : गॅस्पार कोर्रेया हा पोर्तुगीज लेखक लिहितो- ‘आन्फोंसो दे अल्बुकर्क हा एक कट्टर ख्रिश्‍चन पंथीय होता. तो येशूची प्रार्थना फार खडतरपणे करीत होता. गोवा शहर काबीज केल्यावर असाच एके दिवशी तो बोटीतून सैर करीत पणजीजवळच्या आग्वाद किल्ल्याच्या किनार्‍यावर पोहोचला. त्यावेळी तो अंथरुणाला खिळून असल्याने त्याच्या केबिनमध्ये निपचित पडून होता. त्यावेळी त्याच्या कानावर शब्द पडले, ‘दिवाडी बेटावर बांधण्यात आलेले चर्च ऑफ अवर लेडी ऑफ सेर्रा हे इथून दिसू शकते.’ हे ऐकल्यावर तो अंथरुणातून उठून बसला. त्याच्या दोघा चाकरांच्या खांद्याचा आधार घेत तो लटपटत बोटीतील त्याच्या केबिनच्या दरवाजापर्यंत आला. दरवाजाचा आधार घेत त्याने दिवाडी बेटावर दूरवर कटाक्ष फेकला. क्षणात त्याला सदर बेटावरील चर्चचे दर्शन घडले. तशाही परिस्थितीत तो ओणवा झाला. पूर्णपणे गुडघ्यावर बसून त्याने अवर लेडी ऑफ सेर्रा दिवार या चर्चकडे पाहून हात जोडले आणि प्रार्थना केली. त्यानंतर तो त्याच्या केबिनमध्ये परतला, तो पुन्हा कधीच बाहेर आला नाही. शेवटी दि. २७ डिसेंबर १५१५ रोजी त्याने येशू ख्रिस्ताचे शेवटचे नाव घेतले. काही काळानंतर सदर चर्चची पडझड झाली.

(गॅस्पार कार्रेय, लॉक. सिट. खंड ११, पान १०८)

वैभवसंपन्न दिवाडी बेटातील नावेली गावातले श्री गणेशाचे सदर मंदिर हे त्याकाळात गोमंतकात जागृत आणि वैभवशाली मंदिर म्हणून सुपरिचित होते.

दीपवाडी किंवा दिवाडी अथवा दिवार

दीपवाडी हे गोवा द्विपसमुहातील एक बेट असून त्यात नावेली, गोलती, माळार किंवा मालार व नार्वे या चार गावांचा समावेश होतोे. त्यातील नावेली व गोलती ही दोन्ही गावे एकत्र करून पोर्तुगिजांनी ‘पियेदाद’ हा गाव तयार केला. मालारचे नाव बदलून त्याला ‘साव माथायश’ हे नाव दिले आणि नार्वे गावचे नाव तसेच ठेवून दिले.

नावेली गावातील प्राचीन मंदिर

या गावातील सध्याच्या ख्रिस्ती दफनभूमीच्या परिसरात श्री गणपती देवाचे मंदिर वसले होते. सदर दफनभूमीत असलेल्या चॅपेलच्या छताला एक कोरीव पाषाणी शिला व भिंतींना खिडकीच्या आकाराच्या काळ्या पाषाणांचे दोन चौकोनी दरवाजे आढळतात. सदर तिन्ही वस्तूंत व तांबडी सुर्लच्या (सांगे तालुका) महादेवाच्या मंदिराच्या कोरीवकामात बरेच साम्य आढळते. वरील कोरीवकाम कदंब काळातील असल्याचे जाणवते. सदर श्री गणपतीचे मंदिर डोंगराच्या पायथ्यापाशी होते. या ठिकाणी सदर मंदिराच्या तळीचे अवशेष आढळून येतात. पोर्तुगिजांनी आरंभलेल्या धर्मच्छलामुळे सदर मंदिरातील श्री गणपतीची मूर्ती प्रथम डिचोली तालुक्यातील नार्वे या गावी नेण्यात आली. तेथून ती फोंडा तालुक्यातील खांडेपार या ठिकाणी नेली आणि तेथून त्याच तालुक्यातील खांडोळा येथे नेऊन या मूर्तीची विधीवत स्थापना करण्यात आली. फ्रान्सिस्को पेस नावाच्या इतिहासकाराने लिहिलेल्या ‘तोंबो दास इल्हास इ तेररास दे सालसेत अँड बार्देश’ या ऐतिहासिक दस्तऐवजानुसार (डॉ. पांडुरंग शेणवी पिसुर्लेकर संशोधन अहवाल) दिवाडी गावात खालील देवदेवतांची मंदिरे प्राचीन काळात होती. १) श्री भैरव, २) श्री महालक्ष्मी, ३) श्री मोकुआ आणि ४) श्री निर्गुण. श्री भैरवदेवाची मूर्ती सध्या खांडोळा येथील मंदिरात आढळते. इतर देवदेवतांच्या मूर्तीच्या स्थलांतरासंबंधी काहीच माहिती मिळू शकत नाही.

नावेलीची गावकारी ग्रामसंस्था

प्राचीन काळापासून या गावात गावकार ग्रामसंस्था होती. कामटी (कामत), नाईक परभु (प्रभू), सेन व महाले या उपनामांचे लोक सदर ग्रामसंस्थेचे गावकार होते. सध्या सदर गावकर्‍यांचा थांगपत्ता सापडत नाही.

दिवाडी गावातील चर्च

पोर्तुगीज दिवाडी गावाचे नामकरण ‘पियेदादे’ असे केले. या ठिकाणी ‘अवर लेडी ऑफ पियादाद’ नावाचे चर्च त्यांनी बांधले. इ. स. १५४१ मध्ये पोर्तुगालच्या एवोरा गावचे अमीर पास्सो दे व नार्वे गावाचे कप्तान रुय डायस दा सिल्वेरा यांनी सदर अवर लेडी ऑफ पियादादच्या स्मरणार्थ प्रथम चॅपेल बांधले. इ. स. १६२५ मध्ये सदर चॅपेलचे रूपांतर चर्चमध्ये करण्यात आले. सध्याच्या चर्च इमारतीचे बांधकाम इ. स. १७०० मध्ये सुरू होऊन इ. स. १७२४ मध्ये ते पूर्ण झाले. दिवाडी बेटातील सर्व लोकांचे ख्रिस्तीकरण इ. स. १५६० मध्ये करण्यात आले. सुरुवातीला सदर चर्च हे पोर्तुगीज लोकांचे चर्च म्हणून ओळखले जात होते.

गोमंतकातील फक्त सत्तरी तालुक्याचा अपवाद वगळता इतर सर्व तालुक्यांत भगवान श्री गणेशाची मंदिरे आढळून येतात. जुन्या काबिजादीतील सर्व प्राचीन श्री गणेश मंदिरे इतर देवदेवतांच्या मंदिरांसमवेत पोर्तुगिजांनी जमीनदोस्त केली. गोमंतकाच्या स्वातंत्र्यानंतर जुन्या तथा नव्या काबिजादीतील सर्व तालुक्यांत गणेशाची अनेक मंदिरे नव्याने बांधण्यात आली. दिवाडी बेटातील नावेली गावात श्री गणेशाचे मंदिर मूळ जागी पुन्हा बांधण्यात आले. या नवीन मंदिराच्या वास्तूची जागा तेथील एक भाटकार तथा सुप्रसिद्ध वकील ऍड. रुय गॉमिश परेरा यांच्या मालकीची होती. दिवाडी गावातील हिंदू रहिवाशांनी त्यांना भेटून त्यांच्या सदर जागेत तथा मूळ गणेश मंदिराचे नवनिर्माण करण्याचा त्यांचा मनोदय कळविला. ऍड. रुय गॉमिश परेरा यांनी लगेच त्यांची सदर जमीन मंदिर निर्माणासाठी दान करण्याचे मान्य केले. त्यानुसार त्यांनी सदर जमीन श्री गणेश मंदिराला दान दिली. पुढे सदर जागेवर एक सुंदर व सुबक अशी श्री गणेशाच्या मंदिराची वास्तू उभारण्यात आली.

॥ ॐ श्री शुभंत भवतु॥ इति मंगलम्‌॥