27 C
Panjim
Saturday, September 26, 2020

गोमंतकातील प्रबोधनयुगाचे प्रणेते

– डॉ. सोमनाथ कोमरपंत  ७ नोव्हेंबरला ‘भारत’कार हेगडे-देसाई यांची जयंती. त्यांचे दरवर्षी भावस्मरण करताना मनात अनेकविध विचारांची गर्दी होते. झुंजार पत्रकारिता हा धर्म मानून त्यांनी आयुष्यभर समर्पणशीलतेने समाजपुरुषाची सर्वंकष सेवा केली. त्यांच्या असामान्य कर्तृत्वाला सीमा नव्हती. त्यांची छाती सिंहाची होती आणि हृदय दीनदुबळ्यांच्या करुणेने ओथंबलेले होते. ते चौसष्ट वर्षे जगले. आपले पुरुषार्थी जीवन अर्थपूर्ण केले. लोकमान्य टिळकही चौसष्ट वर्षे जगले. राजकारणात लोकमान्य टिळकांचा वारसा ‘भारत’कारांसमोर होता आणि समाजकारणात ‘सुधारक’कर्ते गोपाळ गणेश आगरकर यांचा. लोकमान्यांचे नाव ‘केसरी’शी निगडित झाले, आगरकरांचे ‘सुधारक’शी आणि शि. म. परांजपे यांचे ‘काळ’शी. गो. पुं. हेगडे-देसाई यांचे नाव निगडित झाले ‘भारत’ या पत्राशी. राष्ट्रीय वृत्ती त्यांच्या नसानसांत भिनलेली होती अन् समष्टीच्या सौख्यासाठी त्यांच्या मनात चिरंतर चिंतन चालत असे, याचा प्रत्यय त्यांच्या ‘भारत’मधील अग्रलेखांतून येतो. उणीपुरी छत्तीस वर्षे ते ‘भारत’ या पत्राशी निगडित होते. जवळजवळ पन्नास छोट्या-मोठ्या खटल्यांशी त्यांना धैर्याने सामना करावा लागला. पोर्तुगीज सत्ता मग्रूर होती. गोमंतकीयांची स्वातंत्र्याची मागणी रास्त होती. आपल्या मातृभूमीशी एकरूप व्हायला ते आतूर होते. त्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा आली होती. ‘भारत’कारांनी आपल्या प्रज्ज्वलित लेखणीद्वारा गोमंतकीय जनतेचा प्रातिनिधिक स्वर ‘भारत’मधून हिरिरीने प्रकट केला. लोकमान्य टिळकांनी म्हटल्याप्रमाणे गुळगुळीत कागदावर मुळमुळीत मजकूर त्यांनी कधी लिहिला नाही. होता तो स्पष्टवक्तेपणा आणि अंतःकरणातील सच्चेपणा. यासंदर्भात ‘भारत’कारांच्या अग्रलेखांचे विषय आणि शीर्षके बोलकी आहेत. ‘भारत’मधून त्यांनी आपले ‘प्राणतत्त्वच’ प्रकट केले. ‘भारत’कारांनी असा अभिमानास्पद वारसा गोमंतकातील भावी पिढ्यांसमोर ठेवला आहे. पण हे स्मरताना ओशाळवाणे वाटते. मनात अनेक विचार यायला लागतात. कुसुमाग्रजांच्या ‘टिळकांच्या पुतळ्याजवळ’ या कवितेतील शब्द आठवतात ः ते होते जीवित- हाती धरुनि हताश खळखळती ज्यावर दृढ पोलादी पाश ध्वज चढवायाची एक अदम्य मनीषा ते होते जीवित- अन् हा जीवितभास! काही प्रश्‍नही मनात निर्माण होतात. निखार्‍यांतूनच माणसाचे जीवन खर्‍या अर्थाने का फुलते? संघर्षशील जीवनाच्या विणीतून महापुरुष कसे घडतात? आजच्या गोव्याच्या स्वराज्यात ‘भारत’कार हेगडे-देसाई असते तर त्यांनी कोणत्या प्रकारचे अग्रलेख लिहिले असते? ते प्रासादात राहिले असते की कारागृहात? येथील ऋषिसंस्कृतीचा आणि कृषिसंस्कृतीचा अभाव पाहून त्यांना काय वाटले असते? ‘स्वातंत्र्य? कुठे स्वातंत्र्य?’ असेच त्यांनी म्हटले नसते का? ‘भारत’कारांच्या जीवनाची धुनी हा खरोखरीच अंतर्मुखतेचा प्रवास आहे. तो मन अस्वस्थ करणारा आहे अन् प्रेरणादायीही आहे. ************* ‘जनसेवा ही ईश्‍वरसेवा| त्याविण दुसरा धर्म न ठावा’ हे ब्रीदवाक्य घेऊन ‘भारत’ या पत्राच्या माध्यमातून पोर्तुगिजांशी निकराने झुंज देणार्‍या गो. पुं. हेगडे-देसाई यांचे जीवनचरित्र गोमंतकीयांना ज्ञात आहे. एकतर ते नजीकच्या भूतकाळातील आहेत. जाज्वल्य जीवननिष्ठा आणि देदीप्यमान कार्य यांमुळे त्यांची तेजोमय प्रतिमा जनमानसांत आहे. त्यांनी वेळोवेळी ‘भारत’मधून व्यक्त केलेली मनोगते न्याहाळली तर ः आम्ही वैकुंठवासी| आलों याचि कारणासीं | बोलिले जें ऋषी| साच भावें वर्ताया ॥ झाडूं संतांचे मारग| आडरानें भरलें जग | उच्छिष्टाचा भाग| शेष उरलें तें सेवूं ॥ या तुकारामांच्या उद्गारांची आठवण होते. त्यांच्या जीवनचरित्रातील ही काही अधोरेखिते- ‘भारत’कार हेगडे-देसाई यांचा जन्म कुशावतीच्या काठावरील केपे येथे ७ नोव्हेंबर १८८५ रोजी झाला. प्राथमिक मराठी शिक्षण पूर्ण करून त्यांनी पोर्तुगीजमधून वकिलीचे आणि त्यानंतर फार्मसीविषयक शिक्षण घेतले. तत्कालीन रूढ मार्ग त्यांनी पत्करला नाही. याचे कारण, बालपणीच त्यांच्यावर झालेले राष्ट्रवादाचे संस्कार. मराठी व पोर्तुगीज भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. १९१० मध्ये पोर्तुगालमध्ये प्रजासत्ताक निर्माण झाल्यानंतर गोमंतकीयांनाही थोडीफार मुक्त हवा अनुभवायला मिळाली. डॉ. पुरुषोत्तम वामन शिरगावकर यांनी ‘प्रभात’ हे पत्र सुरू केल्यावर हेगडे-देसाई यांनी तेथे पोर्तुगीज विभागाचे संपादकपद स्वीकारले. त्यांच्या पत्रकारितेचा तो ओनामा होता. पण काही मतभेदांमुळे ‘प्रभात’ त्यांनी सोडले; स्वतःचे ‘भारत’ हे पत्र सुरू केले. तत्कालीन पत्रांच्या स्वरूपाला अनुसरून ते वृत्तपत्र नव्हते; मतपत्र होते. भारतकारांनी आपली मते ठामपणे मांडली. अर्थातच पोर्तुगीज सत्तेचा रोष त्यांना पत्करावा लागला. शोधपत्रकारितेला त्यांनीच सुरुवात केली. तत्कालीन गव्हर्नरांच्या पुत्राची क्रूरकर्मे त्यांनी वेशीवर टांगली. आसामच्या चहाच्या मळ्यांना मजूर पुरविण्यासाठी गोव्यात गुप्त रीतीने ‘गुलामांचा बाजार’ भरविला जाई. या मजुरांना जुलुमाने वागविले जाई. या अन्यायाला त्यांनी ‘भारत’मधून वाचा फोडली. त्यांना द्रव्यहानी पत्करावी लागली. अनेकदा कारावास भोगावा लागला. प्रापंचिक सुखाला मुकावे लागले तरी त्यांनी या प्रतिकूलतेची पर्वा केली नाही. हे व्रत त्यांनी जाणीवपूर्वकतेने स्वीकारले होते. या द्रष्ट्या विचारवंताने आणि कृतिशील पत्रकाराने स्फूर्तिदायी इतिहास घडविला. त्या इतिहासाची पाने वाचणे हा ध्यासाचा आणि अभ्यासाचा विषय आहे. ‘गोमंतक मराठी अकादमी’चे तत्कालीन अध्यक्ष शशिकांत नार्वेकर यांच्या अखंडित परिश्रमांमुळे आणि निदिध्यासामुळे ‘भारत’कारांच्या अग्रलेखांचे दोन भागांमधून संपादन झाले. त्यासाठी त्यांनी ‘सेंट्रल लायब्ररी’मधील जीर्ण-विशीर्ण झालेल्या ‘भारत’ पत्राच्या फाईली धुंडाळल्या. ‘गोमंतक मराठी अकादमी’च्या या प्रकाशनाला नामवंत समीक्षक प्रा. रवींद्र घवी आणि नामवंत पत्रकार परेश प्रभू यांचे मौलिक सहाय्य प्राप्त झालेले आहे. प्राचार्य मयेकरांनी आपल्या अध्यक्षीय कारकिर्दीत हा वाङ्‌मयीन संकल्प पूर्ण केला. ‘भारत’कारांचे विचारधन त्यामुळे अभ्यासकांना प्राप्त झालेले आहे. ************* ‘भारत’कारांच्या या अग्रलेखांतील विचारसंपदेचा खरे पाहता समग्रतेने परामर्श घ्यायला हवा. एका लेखापुरता तो सीमित नाही. पण वानगी म्हणून या व्यक्तीची महत्ता आणि जनजीवनाविषयीच्या सामाजिक संवेदनशीलतेची गुणवत्ता समजून घ्यायला हवी. ती पथदर्शक ठरावी. या अग्रलेखांचे विषयानुरूप वर्गीकरण केले गेलेले आहे. गोमंतक पारतंत्र्यात असताना हे अग्रलेख लिहिले गेले. अर्थातच राजकीय अग्रलेखांना अग्रक्रम लाभणे हे क्रमप्राप्त होते. या अग्रलेखांचे पुनरावलोकन आपल्या समाजाच्या दोषांवर प्रकाश टाकील. परिस्थितिजन्य दुःखांची कारणमीमांसा करील. ‘भारत’कारांच्या पारदर्शी मनाचे आणि अंतःप्रेरणेचे दर्शन घडवील. यादृष्टीने ‘मुखबंध’ हा पहिलाच अग्रलेख वाचावा. ‘गुलामांचा देश’, ‘राष्ट्रपुरुषाची शरीरशुद्धि’, ‘काय हा नेभळेपणा?’, ‘बुद्धिःकर्मानुसारिणी’, ‘सरकारचीं कर्तव्ये’, ‘मुस्कटदाबी’, ‘राष्ट्राचे पुढारी कोण?’, ‘भारतीयांचे ध्येय कोणते असावे?’ (हे शीर्षक असलेले सहा अग्रलेख), ‘स्वराज्याच्या वृथा वल्गना’, ‘रेपुब्लिक व हिंदु नागरिक’, ‘गोमांतकाचें नष्टचर्य’, ‘पुढे गती कैसी?’, ‘हें स्वराज्य की साम्राज्य’, ‘आमचें स्वराज्य’ (दोन अग्रलेख), ‘आमचें कर्तव्य’ (तीन लेखांक), प्रागतिक संघाविषयीचे सात अग्रलेख, ‘लोकमान्यांचे पुण्यस्मरण’, ‘म. गांधींची योग्यता’ हे राष्ट्रपुरुषांविषयीची स्मृती सांगणारे अग्रलेख, ‘स्वदेशी’विषयीचे तीन अग्रलेख, ‘वामनावतार’ आणि ‘हे आत्मबलिदान कीं आत्मविनाश’ हे मोजकेच जरी राजकीय विषयावरील अग्रलेख वाचले तरी ‘भारत’कारांच्या बौद्धिक पल्ल्याची कल्पना येईल. हे अग्रलेख विचारप्रवर्तक तर आहेतच; शिवाय या प्रतिपादनशैलीत व्युत्पन्नता आहे. सुसंगत आणि तर्कशुद्ध विवेचनपद्धती हा या अग्रलेखांचा गुणविशेष आहे. यांतील आशयसामर्थ्याचा आणि अभिव्यक्तिसौंदर्याचा वेध घेताना त्यांतील वाङ्‌मयीन गुणवत्तेचे दर्शन घडते. त्यात प्रवाहित्व आहे. नव्वद-शंभर वर्षांपूर्वीच्या भाषेचे वळण त्यात दिसत नाही. ती आजची वाटते. तिच्या अंतरंगात प्रवेश करण्याचा मोह होतो. ‘भारत’कारांच्या सामाजिक आशयाच्या अग्रलेखांतून तत्कालीन समाजाच्या दुःस्थितीचे वास्तव चित्र दिसते. ते अंतर्मुख करणारे आहे. ‘भारत’कारांच्या पुरोगामी वृत्तीचे येथे दर्शन घडते. आगरकरांनी ‘इष्ट असेल तें बोलणार व साध्य असेल तें करणार’ अशा आत्मनिर्भर वृत्तीने ‘सुधारक’ पत्र चालविले, तोच निर्धार ‘भारत’कारांच्या सामाजिक विचारसरणीत आढळतो. आगरकरांनी ‘महाराष्ट्रीयांस अनावृत्त पत्र’ या अग्रलेखात ज्या विचारांचे अधोरेखन केले होते, त्यांचा प्रभाव ‘भारत’कारांवर आहे. त्यांच्यासमोर राष्ट्रीय समस्यांचा संदर्भ आहे; त्याचप्रमाणे तत्कालीन गोमंतकीय परिप्रेक्ष्यात त्यांनी विचारप्रकटन केले आहे. राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना जो स्पष्टवक्तेपणा आणि प्रखरता ‘भारत’कारांनी प्रकट केली आहे, तीच सामाजिक परिस्थितीची मीमांसा करतानाही व्यक्त केली आहे. अस्पृश्यता मानणे हा आपल्या समाजजीवनाला लागलेला कलंक आहे. माणसाने माणसाला हीन लेखणे हा मानवतेच्या दृष्टीने गुन्हा आहे; पण तत्त्व आणि व्यवहार यांमधील विसंवाद हे आपल्या भारतीय समाजातील मोठे न्यून आहे. ‘भारत’कारांनी आपल्या प्रगल्भ लेखणीने या अनिष्ट प्रवृत्तीवर प्रहार केला आहे. ‘अस्पृश्यता दूर करा!’ हा विचार त्यांनी चार लेखांकांमधून मांडला आहे. शिवाय ‘अस्पृश्यतानिवारणाचे कार्य’ असा स्वतंत्र लेख लिहिलेला आहे. मद्यपानावर त्यांचा कटाक्ष आहे. माणसाच्या अवनतीचे ते कारण आहे हे जाणून त्यांनी ‘मद्यपानाचा प्रसार’, ‘मद्यपान व हिंदुसमाज’ आणि ‘मद्यपान प्रतिबंध’ हे तीन अग्रलेख लिहिले आहेत. ‘पाश्‍चात्त्य लोकांच्या संसर्गापासून ज्या कांही बर्‍या वाईट चाली आमच्या हिंदुसमाजात शिरल्या, त्यांत मद्याचें सेवन ही एक अत्यंत अनिष्ट व भयंकर चाल होय!’ अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी या व्यसनाचा समाचार घेतला आहे. ‘गोमंतकप्रांत इतर अनेक बाबतींत पूर्ण मागासलेला राहून सुरापानांत मात्र तेवढा आघाडी गांठण्यासाठी तातडीने पळत आहे असे दिसून येतें.’ भारतकारांनी एवढे निक्षून सांगितले तरी त्यांचे मौलिक विचारप्रकटन हे अरण्यरुदन ठरलेले आहे. आपण नर्मदेतील गोटेच राहिलो आहोत. मुक्तीनंतरच्या गोमंतकात या व्यसनाला प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. तीच गोष्ट जुगाराची. ‘जुगार, सरकार व प्रतिकार’ आणि ‘जुगार व हिंदुधर्मविचार’ हे अग्रलेख आजच्या तथाकथित प्रगत समाजाच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे आहेत. ‘जुगार म्हटला म्हणजे त्याच्या जोडीस मद्यपानाचे व्यसन मागोमाग तयार असते’ या गोष्टीकडे ‘भारत’कारांनी अंगुलिनिर्देश केलेला होता. तरुण पिढीच्या भवितव्याच्या बाबतीत ते सचिंत होते, म्हणूनच त्यांनी ‘आमची आजची तरुण पिढी’ आणि ‘आमचे डोळे उघडणार तरी कधी’ यांसारखे अग्रलेख लिहिले. आपला समाज अशा प्रकारच्या षड्‌रिपूंनी ग्रासलेला आहे. त्यातही पुन्हा आपणच आत्मग्लानीमुळे आपले वैरी होतो याची जाणीव त्यांनी करून दिलेली आहे. पत्रकार हा समाजाचा खर्‍या अर्थाने जागल्या असतो याची प्रचिती येथे येते. जीवनाच्या विविध पैलूंवरून ‘सर्चलाईट’प्रमाणे ‘भारत’कारांची दृष्टी फिरते. आमच्या समाजाच्या मर्यादा दाखविण्याच्या निमित्ताने स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा त्यांनी घेतलेला परामर्श अत्यंत उद्बोधक आहे. ‘जनसेवा हीच ईश्‍वरसेवा’ या ब्रीदवाक्याचे निरूपण त्यांनी समर्थपणे केलेले आहे. हा आशय मुळातून वाचण्यासारखा आहे. ‘एकमेकां सहाय्य करूं| अवघे धरूं सुपंथ’ या अग्रलेखातून (दोन लेखांक) त्यांनी शुद्धीकरण मोहिमेचे जोरदार समर्थन केलेले आहे. ‘अनावृत्त पत्रास उत्तर’ या अग्रलेखाचा हाच आशय आहे. ‘मोडेन पण वाकणार नाही’ या करारी वृत्तीने संकटपरंपरा कोसळल्यानंतरही ‘भारत’कारांनी आपले पत्र निष्ठेने चालविले. ते एकाकी होते; पण त्यांच्या वृत्तीत एकांडेपणा नव्हता. तत्कालीन परकीय सत्तेच्या जाचामुळे धार्मिक क्षेत्रात जी दिशाभूल चालली होती, त्यावर ‘भारत’कारांनी प्रकाश टाकलेला आहे. ख्रिस्ती धर्मोपदेशकांनी चालविलेल्या धर्मप्रसारासंबंधी आणि त्यांच्या अनुयायांनी आंधळेपणाने स्वीकारलेल्या वृत्तीवर त्यांनी शरसंधान केले आहे. हिंदूंच्या उत्सवप्रियतेला मिळालेले अनिष्ट वळण त्यांना क्लेश देते. यादृष्टीने त्यांचे धार्मिक विषयांवर लिहिलेले अग्रलेख अंतर्मुख करणारे आहेत. ‘छडा लावलाच पाहिजे’, ‘दिव्याखाली अंधेर!’ आणि ‘महाजनमंडळ्यांस इशारा’ हे अग्रलेख आवर्जून वाचण्यासारखे आहेत. सांस्कृतिक क्षेत्राविषयी ‘भारत’कारांना विशेष आस्था होती. ‘नाट्यकला’, ‘भजनी सप्ताह’ आणि ‘परदेशगमन’ हे अग्रलेख या दृष्टीने महत्त्वाचे वाटतात. शैक्षणिक स्वरूपाच्या अग्रलेखांत पणजीच्या मुष्टिफंड संस्थेचा परिचय ‘भारत’कारांनी करून दिलेला आहे. ती नमुनेदार संस्था आहे हे त्यांनी गौरवाने नमूद केले आहे. ‘धोरण चुकतें आहे!’, ‘पण हें असें चालणार तरी कोठवर?’, ‘ही दिशा बदलली पाहिजे’ हे महत्त्वाचे अग्रलेख आहेत. ‘संन्याशी पाहिजेत’ हा अग्रलेख अवश्यमेव वाचण्यासारखा आहे. लोकमान्यांच्या चालीवर त्यांनी लिहिलेल्या ‘हे आमचे गुरूच नव्हेत!’ व ‘हे शिक्षक कीं तक्षक’ या अग्रलेखांतून तत्कालीन शैक्षणिक अराजकाचा जळजळीत शब्दांत निषेध केला आहे. ‘परावलंबी शिक्षण’ या अग्रलेखातून ‘कोणतेही शिक्षण प्रथमतः स्वभाषेतून मिळणे आवश्यक आहे’ हे त्यांनी प्रतिपादन केले आहे. ‘लोकशिक्षण’, ‘शिक्षणाचें प्राचीन ध्येय’, ‘स्त्रीशिक्षणाची इष्ट दिशा’ आणि ‘आमच्या शिक्षणाची दैना’ हे अग्रलेख उद्बोधक आहेत. मनाचे क्षितिज रुंदावणारे आहेत. भाषिक स्वरूपाच्या अग्रलेखांत ‘भारत’कारांची मराठी भाषेवरील नितांत निष्ठा दिसून येते. गोव्याच्या मराठी परंपरेचा गौरवाने त्यांनी उल्लेख केलेला आहे. पोर्तुगीज सत्तेने तिच्यावर केलेल्या अन्यायाला त्यांनी वाचा फोडलेली आहे. गोव्याच्या अर्थकारणाविषयी काही अग्रलेख ‘भारत’कारांनी लिहिलेले आहेत. ‘शेतकी खाते आणि जनता’ हा अग्रलेख सर्वेक्षणावर आधारलेला आहे. ‘गोरक्षण’, ‘कर आणि गव्हर्नर’, ‘हात आटोपा’, ‘उद्योगी बना’, ‘आमची सांपत्तिक उन्नति कशी होईल?’, ‘सांपत्तिक उन्नतीचे मार्ग’ आणि ‘धंद्याची आवश्यकता’ या अग्रलेखांतून याही विषयासंबंधी त्यांचे चिंतन चालत असे याचा प्रत्यय येतो. संकीर्ण स्वरूपाच्या अग्रलेखांतून ‘भारत’कारांची चौफेर नजर कुठे कुठे फिरत होती याचे दर्शन घडते. ‘आर्यवैद्यकावरील बहिष्कार’ हा अग्रलेख त्यादृष्टीने उल्लेखनीय आहे. ‘पावसाची सर काय म्हणते?’ या अग्रलेखात लालित्याचे मनोहारी रंग आहेत. सुरुवातच किती आकर्षक आहे! ः ‘मी पावसाची सर आहे. माझी सर कोणी घेऊ म्हटलें तरी यावयाची नाही. माझ्यासाठी लोक जसे हपापलेले दिसतात तसे इतर कोण्याही सरीला हपापलेले दिसायचे नाहीत. म्हणूनच ‘पावसाचे येणे आणि जगाचे जिणें’ झाले नाहीं तर बहुतेक सरांचे सरत्व जाऊन माणसांच्या शरीरांवर मात्र घामांचे सर दिसू लागतात.’ ‘काळ’कर्ते शि. म. परांजपे यांच्या प्रमत्त भाषाविलासाप्रमाणे ‘भारत’कारांची शैली आल्हाद देते. लोकमान्यांवरील त्यांचा मृत्युलेख हृद्य आहे. डॉ. बुकर टी. वॉशिंग्टन यांच्यावरील लेख आपल्याकडील तरुण पिढीने त्यांच्यापासून धडा घ्यावा या उद्दिष्टाने लिहिलेला आहे. शून्यातून नवी सृष्टी निर्माण करणार्‍या या कर्तृत्ववान व्यक्तीचे जीवन स्फूर्तिप्रद आहे. ‘भारत’कारांनी दोन अग्रलेखांतून उभे केलेले ‘श्रीकृष्ण चरित्र’ आदर्श स्वरूपाचे आहे. ‘भारत’कारांनी जन्म घेऊन आता लवकरच १३० वर्षे होतील. ते दिवंगत होऊनही ६५ वर्षे झाली, पण ‘भारत’कारांचा कीर्तिसुगंध सर्वत्र दरवळत आहे. ‘भारत’ या संज्ञेशी हे संवेदनशील मन एकात्म झाले होते. त्यांच्या स्वप्नांतील भारत त्यांना नित्य खुणावत होता.

STAY CONNECTED

844FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

पर्यटनावर कोरोनाचे सावट

सौ. प्रतिभा वासुदेव कारंजकरफोंडा खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत...

गारवा तुझ्या आठवणींचा

सुरज गायकवाड ‘‘आई, दूध उतू चाललंय! आणि ती खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निशाचा...

कावळ्याची शिकवण

पल्लवी भांडणकरफोंडा कावळासुद्धा किती निसर्गप्रेमी आहे ना! माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठेही न दुखावता आपल्याला हवी असलेली...

‘मानसिकता’ बदलायला हवी ः ल्यूक कुतिन्हो

समग्र आरोग्यसेवेच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेले आणि जीवनशैली प्रशिक्षक असलेले ल्यूक कुतिन्हो मारिया फर्नांडिस यांनी बालपणीचे जीवन परदेशात निरनिराळ्या ठिकाणी व्यतीत...

विदारक साटेलोटे

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बाहेर निघालेली अमली पदार्थ व्यवहाराची भुते आता बॉलिवूडमधील बड्या बड्यांचे बुरखे फाडत निघालेली आहेत. आतापर्यंत दीपिका पडुकोण,...

ALSO IN THIS SECTION

युद्धसज्जता आणि मुत्सद्दीपणा

प्रा. अशोक ढगे युद्धासाठी लष्कर सातत्यानं सज्ज ठेवावं लागतं. गेल्या पाच महिन्यांपासून भारत आणि चीनमधले संबंध तणावपूर्ण बनले...

गद्य-पद्य वेचे आणि मुलांची जडणघडण

(पुन्हा एकदा…) डॉ. सोमनाथ कोमरपंत कविता सूत्रमय असते; म्हणून ती लक्षात राहते. ती मंत्रमुग्ध आहे;...

दिवाळी अर्थव्यवस्थेला उजाळा देईल?

शशांक मो. गुळगुळे दिवाळी या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी साजरी करू, पण जीवच गेला तर काय करणार?...

अनलॉक

पौर्णिमा केरकर ‘मी’चा सुजाण प्रगल्भ विचारच ‘कोरोना’ला हरवू शकतो! ‘कोरोना’सोबत जगण्याची सवय तर आता करावीच लागेल. हा नवा...

कावा

दत्ताराम प्रभू-साळगावकर अशा लोकांचं वागणं प्रामाणिकपणाचं म्हणजे जणू ‘साधू’सारखं वाटतं. पण ते असतात पक्के संधी‘साधू’! आपण महत्त्वाचे निर्णय...