गोमंतकाचा भूतकालीन शैक्षणिक आढावा

0
283
ढवळी येथील इंदिराबाई ढवळीकर विद्यालय

– भिकू ह. पै आंगले

श्री शांतादुर्गा शिक्षण समिती या संस्थेने आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्षात जे काही अभिनवसंपन्न उपक्रम आयोजित केले आहेत त्यात दोन दिवसांच्या १३ आणि १४ सप्टेंबर या काळात शैक्षणिक आणि सामाजिक बांधीलकी राखून त्याचे लोण अखिल गोमंतकात व इतरत्र पोचवावे यासाठी संयोजित केलेली परिषद अनेक शैक्षणिक विषयांच्या माध्यमातून बदलत्या काळाचा वेध घेण्यास संयुक्तिक ठरेल यात तिळमात्र संदेह नाही.

या परिषदेचे उद्घाटक आणि सांगता समारोप ज्यांच्या हस्ते होणार आहे ते भारताचे जागतिक विज्ञानयुगातले सुप्रसिद्ध भारतीय तज्ज्ञ हे गोमंतकीय दोन तळपणारी तेजस्वी रत्ने आहेत हे अख्ख्या विज्ञानयुगाला ज्ञात आहे. त्यांचे विचार ते आपल्या दोन व्याख्यानातून प्रगट करणार असल्याने गोमंतकातील जगत् हे कितीतरी पटीने विकसित होऊन त्याची श्रीमंती गाठणार आहे, हे निर्विवाद आहे. त्यांचे प्रागतिक आणि विकासदर्शक मार्गदर्शन हा एक परिषदेचा अपूर्व अमृतानुभव ठरेल. ही ज्ञानदायी गंगोत्री म्हणजे परिषदेचे खास आकर्षण असेल. त्याचे श्रेय पूर्णतया चौकस आयोजकांकडे जाते हे नाकारून चालणार नाही.
या परिषदेच्या निमित्ताने गोमंतकातील भूतकालीन शैक्षणिक वाटचाल जाणून घेणे उपयुक्त आणि उपकारक ठरेल असे वाटल्याने त्यासाठी सखोल प्रवास करावा असा विचार मनाला चाटून गेला. ते एक शैक्षणिक विचार मंथन आहे. तब्बल साडेचारशे वर्षे पोर्तुगिजांच्या शृंखलात करकचून आवळून घेतल्याने आपली संस्कारसिद्ध संस्कृती लयाला जाते की काय असा संभ्रम गोमंतकीयांच्या मनात जवळ जवळ दृढ झाला होता. त्यातून सुटका राजकीयदृष्ट्या जरी भारत सरकारने इ. स. १९६१ मध्ये गोवा मुक्त केल्यानंतर झाली असली तरी मराठी शिक्षणाच्या माध्यमातून आणि धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक संस्कारामुळे ती संस्कृती टिकून राहण्यास मदत झाली आहे.
आपला राजकीय प्रभाव कायम राखण्यासाठी पोर्तुगीज सरकारने ज्या शाळा सुरू केल्या त्या सर्वांचे माध्यम हे पोर्तुगीजच होते आणि त्यामुळे बहुतांश जनता ही अशिक्षित राहिली. उच्चभ्रू समाजातील ठराविक लोकांनाच पोर्तुगीज शिक्षणाचा लाभ होत असे. त्यांत ख्रिश्‍चन आणि हिंदू यांच्यामध्ये जबरदस्त तरतमभाव शासनाकडून दाखवला जात असे. इ. स. १५१० मध्ये पोर्तुगीज सत्ता स्थापन झाल्यानंतर मिशनर्‍यांनी जो धार्मिक हैदोस घातला त्यांत प्रकर्षाने हिंदू समाजाला बरेच सोसावे आणि भोगावे लागले. हिंदू समाज जीव मुठीत घेऊन वावरायचा. तो समाज कायमचा नेस्तनाभूत करण्यासाठी जेजुइट मिशनर्‍यांनी चंग बांधून नाना तर्‍हेने छळवाद मांडला. हिंदूना पूजा-अर्चा करण्यासाठी मज्जाव केला आणि जे या हुकुमाविरुद्ध जात असत त्यांना सक्तीने बाटवून किंवा ठार करून मोकळे केले जात असे.
या अशा परिस्थितीतून मार्ग काढला तो मराठी शिक्षणाने. इ. स. १९३० सालापर्यंत गोमंतकात २२० पेक्षा अधिक खाजगी मराठी प्राथमिक शाळा अस्तित्वात होत्या. त्यादेखील हिंदू समाजातील उच्चभ्रू आणि व्यापारी यांनी सुरू केल्या होत्या. त्यावेळी श्रीमंत व्यापारी यांचा मराठीतून व्यावसायिक पत्रव्यवहार चालू ठेवण्यासाठी, पेढीवर हिशेब लिहिण्यासाठी मास्तर नेमले जात असत. या व्यक्ती वेंगुर्ला, मालवण, बेळगाव म्हणजेच महाराष्ट्रातून आलेल्या असत. अगदी तुटपुंज्या वेतनावर ते आपली उपजीविका पार पाडीत असत. हे मास्तर हिशेब देवनागरी व मोडी लिपीमध्ये लिहीत असत.
या व्यापार्‍यांना आपल्या मुलांनी शिक्षण घ्यावे आणि आपल्या व्यापाराची जबाबदारी स्वीकारावी असे वाटल्याने आपल्या चौसोपी वाड्यात शिक्षण देण्यासाठी प्रवृत्त केले. हळूहळू शेजारीपाजार्‍यांची मुलेही शिक्षण घेण्यासाठी तिथे येऊ लागली. गोंगाट वाढू लागला. घरच्या लोकांना त्रास होऊ लागला, म्हणून या शाळा त्यांनी गावच्या मध्यवर्ती ठिकाणी किंवा देवळाच्या ओसरीवर चालू ठेवल्या. अशा शाळांची वाढ होतच राहिली. बाहेरून आलेल्या ह्या शिक्षकांच्या जेवणाखाण्याची सोय खासगीरीत्या श्रीमंत व्यापार्‍यांनी आपल्या निवासस्थानी केवळ गरज म्हणून केली.
कालांतराने मराठीतून शिक्षण देणार्‍या अशा शाळा संस्थांमार्फत चालाव्यात असे विचार मनात येण्यासाठी भारतातील स्वातंत्र्याविषयीची चळवळ कारणीभूत ठरली. त्यामुळे गोमंतकात शिक्षण संस्थांची शृंखला सुरू झाली. सर्वप्रथम इ. स. १९०८ मध्ये म्हापसा येथे ‘ज्ञानप्रसारक मंडळ’ आणि पणजी येथे ‘मुष्टीफंड’ यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर इ. स. १९११ मध्ये म्हापसा येथे ‘सारस्वत विद्यालय’ आणि फोंडा येथे ‘गोवा विद्याप्रसारक मंडळ’ स्थापन होऊन तेथे मराठी, पोर्तुगीज आणि पुढे इंग्रजी शिक्षणाची सोय करण्यात आली. इ. स. १९१३ मध्ये मडगाव येथे ‘श्री दामोदर विद्यालय’ तर कुंभारजुवे येथे ‘श्री शारदा विद्यालय’ या संस्था सुरू झाल्या.
इ. स. १८४३ साली पोर्तुगीज राज्यकारभाराची सोय व्हावी म्हणून पोर्तुगीज सरकारने सुरूवातीला मराठीचा वर्ग व नंतर सरकारतर्फेच मराठी प्राथमिक शाळा आपल्या राजधानीत सुरू केली. यावरून मराठी भाषेचे महत्त्व शासनाने जाणले. त्यावेळी सर्व व्यवहार (धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक) हे मराठीतूनच चालायचे. याची पोर्तुगीज शासनाने दखल घेतल्याचे वरील उदाहरणावरून दिसून येते.
एक क्रांतीकारक पाऊल म्हणून जी घटना मडगाव येथे घडली. त्यामुळे पुणे येथे ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई व अण्णासाहेब कर्वे यांनी सुरू केलेल्या स्त्री शिक्षणाच्या ‘यज्ञात’ मडगाव येथे ‘महिला विद्यालय’ स्थापन करून समाज सेवा संघाने आपल्या समिधा अर्पण केल्या. गोमंतकातील ती सर्वप्रथम आश्‍चर्यकारक अशी उत्क्रांतीपर स्त्री शिक्षणाची वाटचाल होती असेच म्हणावे लागते. या संस्थांनी शिक्षणाचे माध्यम मराठीच ठेवले होते. काळाचा तो महिमा होता. अशावेळी एकही कोकणीमाध्यमाची देवनागरी लिपीतून शाळा करू करायला एकही ‘गुडघ्यावरील बुद्धिवंत मायेचा पूत’ पुढे सरसावला नाही, ही सूर्यप्रकाशाइतकी सत्य परिस्थिती त्या वेळी होती. ख्रिश्‍चन गावडो समाजातील मुले पोर्तुगीज प्राथमिक शाळेत जायला घाबरत असायची म्हणून चर्चने रोमी लिपीतून कोकणी शाळा काढल्या होत्या. पण त्याला प्रतिसाद न मिळाल्याने किंवा त्याची तळी उचलून न धरल्याने आपोआपच त्या गतप्राण झाल्या.
पोर्तुगीज शासनाने इ. स. १८४६ मध्ये एक महत्त्वाचा हुकूम काढून सरकारी दुभाष्यांनी पोर्तुगीजबरोबर प्रचलित मराठी किंवा गुजराती शिकलेच पाहिजे अशी सक्ती केल्याने कायदेशीर खाजगी मराठी शाळा उघडण्यास एक प्रकारे राजमान्यताच दिली हे सिद्ध होते. आणि कोकणीला भाषेचे स्थान देणे फक्त संभाषणात प्रचलित असूनही, अप्रस्तुत आहे आणि ती फक्त बोलण्यासाठीच प्रचलित आहे यावर शिक्कामोर्तब झाले. दैनंदिन व्यवहारासाठी कोकणीचा लेखी संबंध येत नसून मराठीचाच वापर व्यवहारात होतो ही काळ्या दगडावरील रेघ ठरली.
पोर्तुगीज शासनाने मात्र आपल्या प्रजेला पोर्तुगीजमधूनच शिक्षण द्यावे यासाठी सर्वप्रथम गावोगाव पोर्तुगीज प्राथमिक शाळा स्थापन केल्या. सेगुंदुग्राव (प्राथमिक शिक्षणाची अंतिम परीक्षा) झाल्यावर अध्यापक शाळा (इस्कोल नॉर्माल) इ. स. १८४१ साली स्थापन झाली. त्याच वर्षी ‘औषध सिद्धी शाळा’ (इस्कोल द फार्मासेवतिका) आणि पुढील वर्षी म्हणजे इ. स. १८४२ साली ‘वैद्यिक पाठशाळा’ (इश्कोल मॅट्रिका) प्रस्थापित करण्यात आल्या. त्यानंतर इ. स. १८५४ साली ‘लिसेव नासिओनाल’ स्थापन करून सुरूवातीला तीन वर्षांचा, पुढे पाच वर्षांचा आणि इ. स. १९१९ साली सात वर्षांचा कोर्स तयार करून विद्यार्थ्यांसाठी पोर्तुगीज माध्यमातून उच्च शिक्षणाची सोय निर्माण करण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे या अभ्यासक्रमात मराठी व संस्कृत या विषयांचाही समावेश केला होता हे विशेष. लिसेव होईपर्यंत ही व्यवस्था चालूच होती. सुरूवातीला ‘सूर्याजी आनंदराव देशपांडे’ आणि नंतर ‘यशवंत तळावलीकर’ हे त्या विषयांचे प्रमुख होते.
अशी ही परिस्थिती पोर्तुगीज अमदानीत पोर्तुगिजांनी आपल्या शासन व्यवस्थेत आणि आवश्यक तेवढीच वैद्यकीय आणि अधिकारी वर्ग तयार करण्याच्या बाबतीत फक्त पोर्तुगीज माध्यमातून व्यवस्था केली होती. आता उच्च वर्गातील ख्रिश्‍चन व हिंदू सरकारदरबारी नोकरी करण्यासाठी शिक्षण घेऊन वर्णी लावू लागले. त्यात विशेषत: डॉक्टर व शिक्षक होण्यासाठी उच्चभ्रू समाज भाग घेऊ लागला.
पण इंग्रजीचे महत्त्व गोमंतकाच्या बाहेर इतरत्र वाढू लागल्यामुळे गोमंतकीय लोकांना आपल्याकडेही इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेऊन स्पर्धात्मक जीवन जगण्याची इच्छा निर्माण झाली. ही इच्छा पूर्णत्वात नेण्यासाठी काही समाजसेवाभावी आणि शिक्षणात रस घेणारी मंडळी यांनी इंग्रजीतून मॅट्रीकपर्यंत शिक्षण देण्यासाठी शाळा सुरू केल्या. ही एक त्या लोकांची समाजोन्नतीसाठी अंगीकारलेली सेवाभावी आणि त्यागी वृत्ती होती. या शाळांना शासकीय अनुदान मिळत नव्हते. शिक्षकांचे पगार विद्यार्थ्यांकडून आलेल्या फीमधून आणि हितचिंतकांकडून मिळालेल्या देणगीमधून भागविले जात असत. या शाळा सुरूवातीच्या काळात म्हणजे इ. स. १८४८ पर्यंत मुंबई विद्यापीठाशी संलग्नित होत्या. त्या नंतर पुना बोर्डाच्या अंकित झाल्या. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेचे नामाभिधान ‘मॅट्रीक’ परीक्षा होते, तर इ. स. १९४८ पासून ते एस. एस. सी. बोर्डाची परीक्षा म्हणून परिवर्तन झाले. त्या परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात जावे लागे. ही परिस्थिती गोवा मुक्तीनंतर गोमंतकाचे भाग्यविधाते आद्य मुख्यमंत्री श्री. भाऊसाहेब बांदोडकर यांनी बदलून टाकली. त्यांनी शिक्षणाकडे सर्वतोपरी विकासात्मक दृष्टी देऊन गोमंतकाच्या तळागळातील मुलांना शिक्षण मिळावे म्हणून गावोगावी सरकारी मराठी प्राथमिक शाळा उघडल्या. माध्यमिक शाळांना अनुदान दिले. गोवा बोर्ड स्थापन केले. उच्च शिक्षण मिळावे म्हणून महाविद्यालये स्थापण्यास खाजगी संस्थांना परवानगी देण्यात आली. त्यांना अनुदानही पुरवण्याची हमी घेतली. आणि त्यामुळे उच्च शिक्षण घेणार्‍यांची जी निकड होती ती पुरवण्यात आली.
आज मात्र एक प्रकारचे निराशात्मक वातावरण शिक्षण जगतात झाल्यासारखे वाटते. वस्तुत: शिक्षण आणि त्याचा विकास हा त्या त्या राज्याचा विषय असावा ही घटनात्मक तरतूद आहे. राज्याच्या गरजा जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण नितांत गरजेचे आहे. ते मात्र होत नाही ही फार मोठी खंत आहे. शिक्षणात एकसूत्रता आणण्यासाठी व राष्ट्रीय अभ्युदय साधण्यास केंद्र सरकारकडून राज्यांना सल्ला देण्यास हरकत नाही; पण त्या एकसूत्रीपणाच्या नावे खिळे ठोकून तो सल्ला राज्यावर लादण्यात येऊ नये. आज प्रकर्षाने या गोष्टी घडत आलेल्या आहेत. आणि त्यामुळे हितापेक्षा अहितच अनुभवायला मिळते यात तिळमात्र संदेह नाही.
शिक्षणात समानता आणि गुणवत्ता आणण्यासाठी सर्वसमावेशक असा अभ्यासक्रम अवश्य असावा. भारतात अठरापगड जाती आणि तळागळात असलेल्या गरीब विद्यार्थ्यांमध्ये आकलन शक्ती वाढविण्यासाठी कमी काठिण्याच्या भागांचा समावेश पाठ्यपुस्तकांत असणे गरजेचे आहे. केवळ शहरी विभागातील विद्यार्थी समोर ठेवून आजकाल नेमलेली कमिशने अभ्यासक्रमाची आखणी करतात आणि परिणामांची आणि गुणवत्तेची दरी वाढवतात. हा प्रकार राष्ट्रीय शिक्षण व्यवस्थेला तारक नसून तो अधिक मारकच आहे असे म्हटल्यास ते वावगे होणार नाही. शिक्षणातली कौशल्ये जोपर्यंत आकलन शक्तीला आवाहन देत नाहीत तोपर्यंत शिक्षणाच्या वाटेवर आताच्याप्रमाणे खाच-खळगेच निर्माण होतील असे स्पष्ट मत व्यक्त करणे क्रमप्राप्त ठरत आहे.
त्या दृष्टीने शैक्षणिक विकासात्मक विचार करताना गोमंतकातील ‘श्री शांतादुर्गा शिक्षण समिती’ जागरूक वृत्तीने आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षात १३ व १४ सप्टेंबर या दोन दिवसात एक राष्ट्रीय परिषद आयोजित करून शैक्षणिक धोरणाचा ऊहापोह करण्याची संधी प्राप्त करून देते; यास्तव ती शैक्षणिक संस्था सकौतुक अभिनंदनास पात्र झाली आहे. या दोन दिवसात त्यांनी आठ सत्रे आयोजित करून त्यात प्राथमिक शिक्षणापासून ते औद्योगिक क्षेत्रासाठी शैक्षणिक उपक्रम कसे राबवावेत आणि त्यातून गोमंतकाचा सर्वांगीण विकास कसा घडवावा, यावर चर्चात्मक विचारांतून विधायक मार्गदर्शन घडणार आहे, हे खास नमूद करणे आवश्यक आहे.
‘कशाला हवा हा सारा उपद्व्याप आणि खटाटोप बरे’ असा प्रश्‍न काहींच्या मनात टपकून जाईलही. ‘घरी आराम करायचे सोडून दोन दिवस भाषणांवर भाषणे – आणि तीही शिक्षणावरील ऐकून मेंदूला त्रास का द्यायचा’ यातून काय साधले जाणार आहे? कोणते फलित मिळणार आहे असा स्वार्थी विचाराचा किडा डोक्यांत वळवळेलही! आजकाल द्रव्या (दुडू) ला अधिकाधिक महत्त्व आल्याने जीवनातील इतर विषयांना दुय्यम स्थान प्राप्त झाले आहे. ‘गुरुब्रह्म:’च्या ऐवजी ‘दुडूब्रह्म:’ हा श्‍लोक व्यवहारात आला आहे. वस्तुत: शिक्षणाला अग्रभागी महत्त्व आले पाहिजे; कारण तो जीवनाचा भक्कम पाया आहे. वस्तुत: शिक्षण म्हणजे, ‘बालब्रह्माची उपासना; सौंदर्याची साधना आणि सामर्थ्याची आराधना आहे.’ त्याकडे दुर्लक्ष करून कसा निभाव लागणार?
प्रस्तुत राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या अशा विचारमंथनातून ‘अभ्यासू, व्यासंगी, कर्तव्यशील असा सतेज, ज्ञानसंपन्न शिक्षक तयार व्हावा, आदर्शाच्या मुशीतून तो घडला जावा आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाचे व शिक्षकाचे महत्त्व पटवून द्यावे’, इतके जरी फलित या संग्रामातून प्राप्त झाले तर संयोजकांना कृतकृत्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
पू. साने गुरुजी म्हणाले, ‘ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते.’ पण ते ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यासाठी शिक्षकाच्या गाठीला (पदरी) ज्ञानाची शिदोरी असायला हवी ना! आडातच नाही तर पोहर्‍यात कुठून येणार? ज्ञानभांडाराची जोपासना ही आजच्या शिक्षकाची नितांत गरज आहे. त्यासाठी शिक्षकाने वाचन-संस्कृतीला कवटाळायला हवे. शिक्षकाने आपणाबरोबरच विद्यार्थ्यांनाही वाचनाची गोडी निर्माण करणे ही आजची निकड आहे. हे जाणून घेण्यासाठीच अशा शिक्षण परिषदेचे आयोजन करून गोमंतकीय शिक्षण क्षेत्राला एक अमोल संधी प्राप्त करून दिल्याबद्दल शिक्षणप्रेमींनी सप्रेम ऋण व्यक्त करायला पाहिजे. शिवाय अभिनंदही – भारतातील उत्तुंग शैक्षणिक व्यक्तिमत्त्वे या परिषदेत आपापल्या क्षेत्रातील विविध स्तरांतील तत्त्वज्ञानातून इच्छुकांना सर्वोत्कृष्ट मार्गदर्शनात्मक लाभ देणार आहेत हे निर्विवाद आहे. विशेषत: डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर यांच्यासारखे जगविख्यात गोमंतकीय सुपुत्र ज्यांनी संपूर्ण जगाला तंत्रज्ञानयुक्त असे प्रकाशात्मक व्यासंगी विचार दिले त्यांची प्रेरणादायी उपस्थिती – आणि भारताच्या सर्वांगीण विकासात्मक विचारप्रणालीचा संदेश गोमंतकीय शिक्षणप्रेमींना संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात सुवर्णमयी ठरतील हे सूर्यप्रकाशाइतकेच स्पष्ट आहे. त्याना लक्षवेधी साथ देण्यासाठी गोवा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सतीश शेट्ये आणि सर्वश्री विवेक सामंत, रामराव वाघ, आदित्य शिंदे, चंद्रशेखरन, अनिल खेर इत्यादी नामवंत आणि त्या त्या क्षेत्रातील व्यासंगी व्यक्ती शिक्षणाच्या उत्कर्षासाठी बहुमोल विचार मांडून गोमंतकीय शिक्षण क्षेत्र – श्री परशुरामाची पुण्यभूमी पुनीत करून ती समृद्ध करतील याबद्दल पूर्ण खात्री वाटते.
श्री शांतादुर्गा शिक्षण समिती या संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात या लक्षणीय उपक्रमाला सुयश आणि सुफल प्राप्त होओ हीच त्या वीणाधारी श्री सरस्वतीदेवीपाशी प्रार्थना करून या शिक्षण यज्ञात एक छोटीशी अनुभवसंपन्न समिधा अर्पण करण्याचे पुण्य जोडण्याचे धाडस करीत आहे.
……………