गोदडुबा…

0
2
  • गुरुदास नाटेकर

‘‘माझ्या काळजाला लागलेली आग या तुझ्या हाताच्या शेवटच्या पाण्यानंच विझेल. हा आपला देवही आंधळा आहे आंधळा… म्हणून तर त्याच्याकडं पाठ करून बसते मी. केव्हा उगवेल तो सोन्याचा दिवस ते या गुमान बसलेल्या गोदड्यालाच ठाऊक!’’

किती वेडं आहे माझं मन. सकाळपासून कशातच रमेनासं झालंय. उगीचच हुरहूर वाटते जिवाला. त्याचं कारणही तसं वेगळं आहे असं नाही. रोज तेच ते घरकाम. त्या कामाच्या रगाड्यात स्वतःला विसरणं हे आता रोजचंच झालं आहे. आज सकाळीच दादा वसुलीसाठी कळंब्याला गेले. कळंब माझी जन्मभूमी. मी त्याच परिसरात वाढले, हसले, खेळले, बागडले. मला खरा आनंद तिथेच मिळत होता. भल्यामोठ्या खानदानी थाटाच्या वाड्यात आम्ही मोजकीच माणसं वास्तव्य करीत होतो. मी, माझा छोटा भाऊ अनिल आणि आई.

त्या परिसराचं मला एक वेगळं आकर्षण होतं. येथे मनाला भुरळ घालणारं निसर्गसौंदर्य मनसोक्त लुटण्याची संधी होती. माझे दादा प्राथमिक शिक्षक होते. तिथेच कळंब्याला मराठी शाळेत ते काम करीत. घरात सारं काही मूबलक आणि आबादीआबाद होतं असं नाही; पण तशाही परिस्थितीत मन कसं प्रफुल्लित असायचं. तेव्हा मी शाळेत जात असे. शेजारची सारी मुलं सकाळ-संध्याकाळ आमच्या ओट्यावर जमायची.

मौज होती सारी. आम्ही मुलांनी मिळून कितींदा तरी भातुकलीचे डाव मांडले आणि मोडले. मी आणि माझी मैत्रीण संध्या- आम्ही दोघी एकमेकींना सोडून कधीच राहिलो नाही. वयाने लहान असलो तरी आमचे त्या वेळचे असणारे बालविचारही सारखेच होते!

….वतनवाडीच्या उगवतीला दोन फर्लांगावर सुळक्यासारखा भला उंच डोंगर. डोंगराच्या बरोब्बर मावळतीला खोल खोल दरीत एक छोटंसं देऊळ. त्यात शेंदरानं माखलेला गरगरीत गोल दगडाचा जागृत गोदडुबा धनगरांचा देव. दर रविवारी गावड्यांचा बापू दिवस बुडायला आल्यावर आपला भलामोठा ढोल त्या देवळासमोर तासभर बडवत असतो. ती खोल दरी ढोलाच्या ढीढीऽऽ पांगऽ ढीमऽ, ढिपांगऽ ढिम, दिमांगऽ दीमांगऽऽ अशा आवाजाने दणाणून जाते. बापू अंगात आल्यागत नाचतो. देवाची आरती करतो. अंधार पडू लागल्यावर तिथून माघारी फिरतो.

गोदड्याच्या डोंगरावर ढोल वाजायला लागला की तेवढ्यापुरतीच गावातल्या लोकांना त्या देवाची आठवण होते. आपल्या रोजच्या कामाच्या रगाड्यात त्याची आठवण करायला वेळ असतोच कुणाला म्हणा! पण बापू कळायला लागलं तेव्हापासून दर रविवारी डोंगरावर ढोल वाजवतो. नेम कधी चुकला नाही. वसाड दरीतल्या, शेंदरानं थापलेल्या त्या तेवढ्याच देवाची मनापासून पूजा करावी ती बापू गावड्यानंच!

बापूचा बाप मुरा. तोही याच देवाची मनापासून पूजा करायचा म्हणे. बापूने मुराचाच वारसा पुढं चालवलाय असं लोक म्हणतात. बापू सात वर्षांचा असतानाच मुरा वारला. बापूला तेव्हा तेवढं काही कळत नव्हतं. मुरा आपली चार खंडी मेंढरं घेऊन एक दिवस गोदड्यावर गेला आणि तिथेच त्याला साप डसला. संध्याकाळी देवळापुढचा त्याचा मुडदा उचलून घराकडं आणला म्हणे लोकांनी. सात वर्षांचा बापू आणि त्याची जख्ख म्हातारी झालेली आजी ऊर बडवून रडली; पण मुराची तरणीताठी बायको डोळ्याला पदर लावून चोरट्या नजरेनं काय काय चाललंय ते नुसतं बघत होती. असतात अशी काही माणसं दगडाच्या काळजाची; पण मुराच्या बायकोचं मात्र आक्रितच म्हणायचं!

बापाच्या मागं चार खंडी मेंढरं पोसायची जोखीम बापूवर अगदी कोवळ्या वयातच पडली. त्या मेंढरांच्या गोंधळात बापूला दुसरं काहीच सुचत नव्हतं. सकाळी उठावं, मेंढरं हुसकावत डोंगरावर जावं, दिवसभर त्यांच्यामागं वणवण भटकावं… आजीनं आपल्या नातवाला भाकरी घेऊन काठी टेकत डोंगरावर यावं, बापूला साद घालावी आणि मग देवळापुढे बसून आजी-नातवाने वचावचा चार घास खाऊन घ्यायचे. भाकरी खाऊन झाल्यावर आजी देवळामागच्या मोठ्या शिळेवर देवाकडे पाठ करून तासन् तास बसून राहायची. मग बापू तिला म्हणायचा,
‘‘आजी, आता घरी जा की. मी काळोख पडता पडता येतो. तू हो पुढे…’’ म्हातारी शिळेवरून उठता उठता आपलं सुरकुत्यांनी भरलेला हात बापूच्या गालावरून फिरवत म्हणायची,
‘‘बापू! राजा, सावधगिरीनं रहा. माझ्या लेकरा, तुझीच काळजी वाटते बघ मला. लवकर लवकर ताडामाडासारखा वाढ. तुझ्याशिवाय माझं म्हातारीचं कोण आहे मागं? पण माझ्या शरीरात जीव आहे तोवर तुझ्याकडूनच मला सगळं करून घ्यायचं आहे आणि मगच तुझ्या हातानं शेवटचं पाणी प्यायचं आहे. माझ्या काळजाची झालेली आग या तुझ्या हाताच्या शेवटच्या पाण्यानंच विझेल. हा आपला देवही आंधळा आहे आंधळा… म्हणून तर त्याच्याकडं पाठ करून बसते मी. केव्हा उगवेल तो सोन्याचा दिवस ते या गुमान बसलेल्या गोदड्यालाच ठाऊक!

बापू, अरे पापाची वाट अशीच असते बघ माझ्या राजा. जारिणीला मरण असंच येणार टाचा घासून. जटा तोडून गेली सटवी हेच बरं झालं. आतासा या दगडाच्या देवाला पाझर फुटला. अरे किती दिवस मी दातखिळ बसल्यासारखी गप्प होते. आता माझं तोंड मोकळं होईल. आपल्या अस्तनीतला निखाराच निखळून पडला आता. जा आता, पुन्हा गावात जा आणि चार जाणती माणसं बोलावून आण. त्या सरपंचाला मात्र बोलवायला विसरू नकोस. भाड्या ये आणि बघ म्हणावं तुझं कौतुक डोळे फाडून. चार लोकांनी बघितलं की कळेल सगळ्यांना. पोटातलं पाप बाहेर टाकायला गेली आणि सोन्यासारखा स्वतःचा जीव घालवून बसली. हा भोग आहे बाबा ज्याच्या-त्याच्या कर्माचा!’’
बापू गावाकडं पळाला. म्हातारी बसली जाग्यावरच्या मुडद्याकडं बघत गिधाडासारखी.