हेन्री किसेका याने अंतिम क्षणात नोंदविलेल्या गोलाच्या जोरावर गोकुळम केरळ संघाने मोहन बागानचा काल सोमवारी २-१ असा पराभव केला. आय लीग स्पर्धेतील हा सामना सॉल्ट लेक स्टेडियमवर खेळविण्यात आला.
पाहुण्या संघाकडून महमूद अल अजमी याने पहिला गोल केला तर असेर दिपांदा याने यजमानांचा एकमेव गोल नोंदविला. शंकरलाल चक्रवर्ती यांनी या सामन्यासाठी मोहन बागान संघात एकमेव बदल करताना एस.के. फैयाज याला खेळवून अझरुद्दीन मलिक याला बाहेर बसविले. गोकुळमच्या बिनो जॉर्ज यांनी सांतू सिंग, मोहम्मद दिब्बिन, अर्जुन जयराज व लाडामपुईया यांना बेंचवर बसवून प्रोवोत लाक्रा, डॅनियल एडो, मोहम्मद राशिद व किवी झिमोनी यांना उतरवले. आज मिनर्वा पंजाब व ईस्ट बंगाल यांच्यात सामना होणार आहे. स्पर्धेच्या चौदाव्या आठवड्याच्या समाप्तीनंतर १३ सामन्यांतून २९ गुणांसह मिनर्वा पंजाब पहिल्या स्थानी आहे. १३ सामन्यांतून १६ गुण घेत गोव्याचा चर्चिल ब्रदर्स सातव्या क्रमांकावर आहे.

