चेन्नई सुपर किंग्सचा सीईओ गायब
आयपीएल स्पर्धेतील सट्टेबाजीत गुंतलेल्या विंदू दारासिंग यांच्याशी साटेलोटे असल्याचा आरोप असलेल्या बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांचा जावई गुरूनाथ मेयप्पन याला नोटीस बजावण्यास गेलेल्या मुंबई पोलिसांना चेन्नईत वेगळ्याच नाट्याला सामोरे जावे लागले. मेयप्पन त्याच्या घरी सापडला नाही किंवा त्यांच्या घरच्यांकडूनही त्याच्याबद्दल काहीच माहिती पोलिसांना मिळू शकली नाही. मात्र नंतर उशिरा मेयप्पनने पोलिसांना सामोरे जाण्यासाठी येत्या सोमवारपर्यंतची मुदत मागितली असल्याचे वृत्त आहे.
सध्या पोलिसांच्या अटकेत असलेल्या विंदू दारासिंग याने एका महिन्यात आपल्यात व मेयप्पन याच्यात १३० फोन कॉल्स झाल्याची माहिती दिली असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर काल दुपारी ३ वा. मुंबई पोलिसांनी मेयप्पन याच्या चेन्नई येथील निवासस्थानी धडक दिली. मात्र त्यांना त्याच्या निवासस्थानाच्या मुख्य फाटकाबाहेर दहा मिनिटे ताटकळत ठेवण्यात आले व आत गेल्यानंतर पुन्हा अर्धा तास थांबवण्यात आले. मात्र तेथील कर्मचारी किंवा घरच्यांकडून मेयप्पनची माहिती न मिळाल्यामुळे पोलिसांनी कर्मचार्यांकडे नोटीस दिली. मेयप्पनने मुंबई पोलिसांसमोर जबानी देण्यासाठी आज २४ रोजी सकाळी ११ ते ५ या वेळेत उपस्थित रहावे, असे त्याला बजावण्यात आले आहे. या वेळेत तो उपस्थित न राहिल्यास त्याला समन्स काढले जाणार असून फरारी घोषित करण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी पोलीस चेन्नई सुपर किंग्स संघाच्या अन्य अधिकार्यांचीही चौकशी करण्याची शक्यता आहे.