वरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी घरगुती एलपीजी दरवाढीवर टीका केली. एलपीजीच्या दरात वाढ करून सर्वसामान्यांवरील आर्थिक बोजा आणखीन वाढविण्यात आला आहे, असे विरोधी पक्षनेते आलेमाव यांनी म्हटले आहे.
घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात आणखी 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या 7 मार्च रोजी झालेल्या 60 रुपयांच्या दरवाढीनंतर ही दुसरी दरवाढ आहे. भाजपप्रणीत सरकारवर वारंवार इंधन दरवाढ करून मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबांवर आर्थिक भार टाकत आहे, असेही विरोधी पक्षनेते आलेमाव यांनी म्हटले आहे.
एलपीजी गॅस दरवाढीमुळे भाजपने महिला आणि मध्यमवर्गीय कुटुंबांशी केलेला विश्वासघात उघड झाला आहे. प्रत्येक एलपीजी गॅस दरवाढ गोव्याला भाजपच्या 3 मोफत सिलिंडर देण्याच्या आश्वासनाची आठवण करून देत असल्याची टीका गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या माध्यम आणि संचार विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी काल केली.
मागील 2022 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपने घरगुती गॅस ग्राहकांना दिलासा देण्याचे आणि तीन मोफत एलपीजी सिलिंडर देण्याचे आश्वासन देऊन मते मिळविली होती. तथापि, या आश्वासनाची पूर्तता अजूनपर्यंत करण्यात आलेली नाही. घरगुती एलपीजी गॅसच्या दरात वारंवार वाढ झाल्याने कुटुंबांना त्यांचे मासिक बजेट सांभाळणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. स्वयंपाकाच्या गॅसच्या वाढत्या किमती, तसेच जीवनावश्यक वस्तू, इंधन, शिक्षण आणि आरोग्यसेवा यांमधील महागाईने सामान्य नागरिकांना हतबल केले आहे, असेही पणजीकर यांनी म्हटले आहे.

