गृहकर्ज योजनेबाबत भाजपकडून फसवणूक

0
16

>> कॉँग्रेसचे नेते गोम्स, नाझारेथ यांचा आरोप

कर्मचार्‍यांसाठी असलेल्या गृहकर्ज योजनेवरून भाजप सरकार त्यांची फसवणूक करीत असल्याचा आरोप काल कॉंग्रेस पक्षाने केला. तसेच कॉंग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर बंद करण्यात आलेली जुनी गृहकर्ज योजना पुन्हा सुरू करण्यात येईल, असे आश्‍वासन काल कॉंग्रेसचे नेते एल्विस गोम्स व जॉन नाझारेथ यांनी दिले.
भाजपने सरकारी कर्मचार्‍यांची मते मिळवण्याच्या उद्देशाने ही नवी गृहकर्ज योजना सुरू केली आहे. पण या योजनेचा सरकारी कर्मचार्‍यांना कोणताही फायदा होत नसल्याचे सांगून भाजप सरकार या योजनेच्या नावाखाली सरकारी कर्मचार्‍यांची फसवणूक करीत असल्याचा आरोप वरील द्वयींनी केला.
भाजप सरकारने सत्तेवर आल्यानंतर गृहकर्ज योजना बंद केली होती. मात्र, गोवा विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्यानंतर मतांचे राजकारण करण्यासाठी नवी गृहकर्ज योजना लागू केली. पण त्यात असलेल्या एका नियमानुसार सरकार ही योजना कधीही मागे घेऊ शकते.
यासंबंधी अधिक माहिती देताना जॉन नाझारेथ म्हणाले की, पूर्वीची गृहबांधणी योजना ही आता गृहनिर्माण कर्ज योजना म्हणून ओळखली जाते. यापूर्वी एसबीआय व एचडीएफसी बँकेतर्फे या योजनेसाठीचे कर्ज देण्यात येत असे. आता त्यांना गाळून इतर ५ बँकांचा समावेश करण्यात आला आहे. या बँकांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याशी सामंजस्य करार अजून करण्यात आलेला नसून सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतरच कर्ज हस्तांतरीत केले जाणार आहे.

नाझारेथ पुढे म्हणाले की, या नवीन योजनेअंतर्गत लाभार्थी सरकारी कर्मचार्‍यांना त्यांच्या गृहकर्जाच्या व्याजदराचे फक्त २ टक्के व्याज भरावे लागेल. तर ५ टक्के व्याज राज्य सरकार भरेल. जर एकूण व्याजदर ८ टक्के असेल तर हा अतिरिक्त एक टक्का लाभार्थिंना सहन करावा लागेल. कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही सरकारी कर्मचार्‍यांच्या बाजूने निर्णय घेऊ आणि पूर्वीची योजना लागू करू.

गोवा सरकारने सरकारी नोकर्‍यांना दिनदयाळ सामाजिक स्वास्य्थ योजना, लाडली लक्ष्मी या योजनांपासून वंचित ठेवल्याचा आरोप करतानाच एखाद्या सरकारी कर्मचार्‍याचे निधन झाले तर त्याची पत्नी अथवा मुलांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देणेही भाजप सरकारने बंद केले असल्याचा आरोप त्यांनी केला.