30 C
Panjim
Monday, September 28, 2020

गुन्हेगारी कथांच्या वाचकांसाठी

गुन्हेगारी कथा वा सत्यकथा उघडेवागडे बटबटीत सत्य आपल्यासमोर ठेवत असल्याने माझ्यासारख्या अनेकांना अशी पुस्तके वाचावीशी वाटत नाहीत, परंतु अशा पुस्तकांचाही स्वतःचा असा एक वाचकवर्ग असतो. त्यांना ही दोन्ही पुस्तके नक्कीच भावतील.

एडिटर्स चॉईस
परेश प्रभू

या साप्ताहिक स्तंभामधून मराठी व इंग्रजीतील नवनवीन पुस्तकांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे. नामांकित प्रकाशनसंस्थांच्या या नव्या कोर्‍या पुस्तकांमध्ये काय दडले आहे याचे कुतूहल शमविण्याचा आणि वाचकांना ती पुस्तके वाचण्यास प्रेरित करण्याचा यामागे हेतू आहे. चौफेर वाचन हे नेहमीच आपले व्यक्तिमत्त्व समृद्ध करीत असते. आपल्याला आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये अद्ययावत ठेवत असते.
गेले दोन आठवडे इंग्रजीतील हार्पर कॉलीन्स, आणि रूपा पब्लिकेशन्स या मातब्बर प्रकाशनसंस्थांच्या नव्या कोर्‍या वाचनीय पुस्तकांचा परिचय मी आपल्याला घडवला. पहिल्या आठवड्यात नारायण राणे यांच्या येऊ घातलेल्या राजकीय आत्मचरित्राची ओळख मी घडवली होती. गेल्या आठवड्यात काश्मीरवरील अशोक धर यांच्या नव्या कोर्‍या पुस्तकाचा परिचय आपल्याला झाला. यावेळची प्रकाशनसंस्था आहे पेंग्वीन बुक्स आणि तिची सहयोगी संस्था पेंग्वीन रँडम हाऊस.
ज्या दोन पुस्तकांचा परिचय आज घडवणार आहे, ती आहेत किडनॅप्ड ः ट्रू स्टोरीज ऑफ ऍब्डक्शन, रॅन्सम अँड रिव्हेंज आणि क्वीन्स ऑफ क्राइम ः ट्रू स्टोरीज ऑफ वूमन क्रिमिनल्स फ्रॉम इंडिया. पुस्तकांची शीर्षके सुचवतात त्याप्रमाणे ह्या सार्‍या सत्यकथा आहेत आणि अर्थातच गुन्हेगारी विश्वाशी संबंधित आहेत. अशा पुस्तकांनाही एक वाचक असतो आणि त्या वाचकाला आवडतील अशी ही सरळसोट भाषेतील पुस्तके आहेत.
नवरा एके पावसाळी रात्री आपल्या पत्नीला मुलांसह घरातून हाकलून लावतो. अचानक डोक्यावरचा निवारा हरवलेली आणि कुठे जायचे, काय करायचे याबाबत मोठे प्रश्नचिन्ह समोर उभे असलेली ही महिला मुलांसह मुंबईच्या वरळी भागातल्या सिद्धार्थनगर चाळीत आपल्या भावाच्या घरी आसर्‍याला जायचे ठरवते. भावजय तिचे प्रेमाने स्वागत करते, उदरनिर्वाहासाठी जवळच्या परिसरात धुणीभांडी करायचे काम सुचवते. एक दिवस अशीच धुणीभांडी करून घरी परतत असताना ग्लानी आल्याने बाकावर बसलेल्या ह्या महिलेची दया येऊन एक अपरिचित इसम तिला उदरनिर्वाहाचा एक नवा मार्ग सुचवतो. हा मार्ग असतो ब्राऊन शुगर आणि हशीश हे अमली पदार्थ गिर्‍हाईकांपर्यंत पोहोचवण्याचा. त्यात बक्कळ पैसा असतो. ही गरजू महिला ते काम पत्करते आणि बघता बघता त्या क्षेत्रातली दादा बनते. तिचे नाव असते शांतीदेवी पाटकर!
मुंबईतल्या कुख्यात महिला गुन्हेगारांची आणि त्यांच्या अपरिचित विश्वाची सफर घडवणारे हे पुस्तक आहे ‘क्वीन्स ऑफ क्राइम.’ सुशांत सिंग आणि कुलप्रित यादव यांनी यातील लेख संकलित केलेले आहेत. या सत्यकथा आहेत आणि अर्थातच नाट्यमयतेने भरलेल्या आहेत. रहस्यकथा वा गुन्हेगारी कथा वाचनाची आवड असलेल्या वाचकांसाठी या सत्यकथा रोचक वाटतील. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या गुन्हेगारी विश्वावर महिलाही अधिराज्य करू शकतात आणि भल्याभल्यांना आपल्या पायाशी यायला भाग पाडू शकतात हे दाखवून देणार्‍या या कहाण्या आहेत आणि गुन्हेगारी कथांच्या वाचकांना एका वेगळ्या जगाची सफर त्या घडवून आणतील.
या आठवड्यातले दुसरे पुस्तक आहे ‘किडनॅप्ड ः ट्रू स्टोरीज ऑफ ऍब्डक्शन, रॅन्सम अँड रिव्हेंज.’ पुस्तकाचे शीर्षक सुचवते त्याप्रमाणेच हे पुस्तक आहे अपहरण या विषयाला वाहिलेले. या सार्‍या सत्यकथा आहेत आणि दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार यांनी त्यांना आपली प्रशस्तीही दिलेली आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्डस् ब्यूरो आपल्या देशातील गुन्हेगारीची नोंद ठेवत असतो. आपल्या देशामध्ये अन्य गुन्ह्यांबरोबरच अपहरण, खंडणी यांचे प्रमाणही फार मोठे आहे. अनेकदा अशा घटनांची तक्रार पोलिसांत नोंदवली जातेच असे नाही, परंतु अशा घटना मात्र सातत्याने आणि सर्वत्र घडत असतात. २०१६ च्या उपलब्ध आकडेवारीला पाहिले तर तासाला दहा अपहरणे भारतात होतात. त्यातील सहा मुलांची असतात. अनेकदा या अपहरणाची निष्पत्ती त्याहून भयावह गुन्ह्यामध्ये होते. अशाच काही अपरहणांच्या बातम्यांचा मागोवा घेत घेत अर्पिता सरकार या महिला पत्रकाराने या सत्यकथा संकलित केल्या आहेत. देशाच्या वेगवेगळ्या भागांमधील या अपहरणकथा आहेत. मुंबई, कोइम्बतूर, नाडियाड, दिल्ली, नोयडा, मुंबई, पुणे हैदराबाद, हावडा अशा वेगवेगळ्या शहरांतील या अपहरणकथा आपल्याला सुन्न करून जातात. अपहरण झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना सामोर्‍या जाव्या लागलेल्या परिस्थितीचा वेधही लेखिकेने या पुस्तकात घेतलेला आहे. ज्युलियो रिबेरोंसारख्या कसलेल्या पोलीस अधिकार्‍याने या पुस्तकातील केस स्टडीजना आपली प्रशस्ती दिलेली आहे. प्रत्येक अपहरण प्रकरणाचा तपशीलवार मागोवा लेखिकेने या पुस्तकामध्ये घेतलेला आहे.
गुन्हेगारी कथा वा सत्यकथा उघडेवागडे बटबटीत सत्य आपल्यासमोर ठेवत असल्याने माझ्यासारख्या अनेकांना अशी पुस्तके वाचावीशी वाटत नाहीत, परंतु अशा पुस्तकांचाही स्वतःचा असा एक वाचकवर्ग असतो. त्यांना ही दोन्ही पुस्तके नक्कीच भावतील. यामध्ये नाट्य आहे, थरार आहे, परंतु वास्तवाला धरून आहे. नाहक अतिरंजित भडकपणाचा सोस नाही आणि हेच या पुस्तकांचे वैशिष्ट्य आहे!

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

संत मोहनदास

ऍड. रमाकांत खलप अशा या संताची १५० वी जयंती २ ऑक्टोबर २०२० रोजी जगभर साजरी केली जाईल. सत्याग्रह...

ततो युद्धाय युज्यस्व…

मीना समुद्र कोरोनाचे संकट हे पूर्णपणे माणसाने आपल्या करणीमुळे ओढवून घेतलेले आहे. स्वतःच्या स्वार्थापायी आणि भोगवादी, चंगळवादी, बेदरकार...

सृष्टीच्या रहस्याचा वेध

डॉ. सोमनाथ कोमरपंत रूढार्थाने हे क्रमिक पुस्तक नसून त्याचे उद्दिष्ट काहीसे निराळे आहे. विद्यार्थ्यांना काव्यमाधुरी स्वतंत्र चाखता यावी;...

आश्विन

पौर्णिमा केरकर भातकापणी करून ती पेंडके खळ्यावर तर कधी घराच्या पडवीत आडवी करून ठेवली जायची. त्यावेळी आश्विन घरात...

ALSO IN THIS SECTION

बळींची संख्या ४०० पार

>> राज्यात आणखी १० जणांचा मृत्यू, २७ दिवसांत २०९ बळी राज्यात कोरोना रुग्णांच्या बळींचा आकडा ४०० पार झाला असून...

माजी केंद्रीय मंत्री जसवंतसिंह यांचे निधन

माजी केंद्रीयमंत्री जसवंतसिंह (८२) यांचे काल रविवारी दिल्लीत निधन झाले. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली. गेल्या सहा वर्षांपासून...

कुंकळ्ळीत युवतीचा संशयास्पद मृत्यू

>> केपे येथे युवकाची आत्महत्या खेडे - पाडी - कुंकळ्ळी येथे नाल्यात युवतीचा संशयास्पद मृत्यू आणि केपे येथे युवकाची...

राज्यात यंदा ४३ टक्के जास्त पाऊस

राज्यात मोसमी पावसाची आत्तापर्यंत सरासरीपेक्षा ४३ टक्के जास्त नोंद झाली आहे. यावर्षी राज्यात विक्रमी पावसाची नोंद झाली असून आत्तापर्यंत १६५.२१ इंच पावसाची...

देवसू-पेडणे येथे अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू

काल रविवार दि. २७ रोजी सकाळी ११.३० वाजता प्रज्ञा हायस्कूल देवसू येथे दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेचा रस्त्यावर गतिरोधकावरून उसळून पडल्याने डोक्याला गंभीर...