गुजरात मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी काल मंत्रिमंडळ फेररचनेच्या पार्श्वभूमीवर काल राजीनामा दिला. पाच ते सहा मंत्र्यांची मंत्रिपदे ह्या मंत्रिमंडळ फेरबदलात कायम ठेवली जाणार असून उर्वरित जागांवर नवे चेहरे घेतले जाणार आहेत. सध्या गुजरातमध्ये सोळा मंत्री आहेत. ही संख्या 26 पर्यंत वाढवली जाणार आहे. ज्या मंत्र्यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार आहे, त्यांची नावे राज्यपालांकडे सोपविण्यात आली आहेत. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे विद्यमान मंत्रिमंडळातील सध्या कायम असलेले एकमेव सदस्य राहिले आहेत. ते रात्री उशिरा राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेऊन मंत्र्यांचे राजीनामे सुपूर्द करतील अशी अपेक्षा आहे. गुजरातचे नवे मंत्रिमंडळ शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता गांधीनगरच्या महात्मा मंदिरात शपथबद्ध होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राष्ट्रीय अध्यक्ष जगत्प्रकाश नड्डा हेही ह्यावेळी उपस्थित राहणार आहेत.

