Home बातम्या गुजरातहून खते आणण्याची प्रशासनाकडून व्यवस्था

गुजरातहून खते आणण्याची प्रशासनाकडून व्यवस्था

0

लवकरच विक्रेत्यांकडे उपलब्ध होणार

जुवारी ऍग्रो केमिकल्सच्या कामगारांचा संप चालूच असल्याने राज्यात निर्माण झालेली खताची टंचाई दूर करण्यासाठी सरकारने गुजरातमधील कांडला येथून खत आणण्याची व्यवस्था केली असून लवकरच ते खत विक्रेत्यांकडे उपलब्ध होईल. त्यामुळे शेतकर्‍यांनी घाबरू नये, असे आवाहन कृषी संचालक सतीश तेंडुलकर यांनी केले आहे.

कृषी उत्पादनात वाढ करण्यावर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सुरुवातीपासूनच लक्ष केंद्रित केले आहे. सध्या पावसाळा सुरू झाल्याने शेतकर्‍यांना शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य तयार ठेवल्याचे तेंडुलकर यांनी सांगितले.

जया, ज्योती व कर्ज जातीची बियाणे सध्या गोवा बागायतदार, पेडणे फार्मर्स सोसायटी, म्हापसा येथील कृषी बाजाराच्या दालनांमध्ये उपलब्ध असून बियाण्यांवर शेतकर्‍यांना ५० टक्के सबसिडी मिळू शकेल. सर्वत्र ट्रॅक्टर उपलब्ध असल्याने शेती नांगरण्याचे कामही सुरू झाले आहे. खाजगी ट्रॅक्टर वापरणार्‍या शेतकर्‍यांनाही सरकारची मदत मिळू शकेल, असे तेंडुलकर यांनी सांगितले. भेंडी, चिटकी व ओली मिरचीची बियाणे गोवा फलोत्पादन महामंडळाकडे उपलब्ध असून महामंडळाकडून बियाणे घेऊन वरील भाजीची लागवड करणार्‍या शेतकर्‍यांच्या उत्पादनाची फलोत्पादन महामंडळातर्फे विक्री करण्याची व्यवस्था होईल, असेही त्यांनी सांगितले. अन्य भाज्यांची बियाणे कृषी विभागीय कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध असून त्यावर शेतकर्‍यांना ५० टक्के सबसिडी मिळेल, असे तेंडुलकर यांनी सांगितले.