गुजरातमध्ये आणखी तीनशे ते पाचशे कोटींची गुंतवणूक करणार

0
68
नैऋत्य गुजरातमधील महत्त्वाचे बंदर असलेल्या भावनगरमध्ये अलीकडेच धेंपो उद्योगसमूहाने मॉडेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर लि. च्या माध्यमातून मोठ्या जहाजबांधणी उद्योगाचा पाया घातला आहे. भारतीय नौदलासारख्या मोठ्या ग्राहकांच्या मागणीनुसार तेथे जहाजनिर्मिती होते.

गुजरात राज्याची उद्योगाभिमुखता आणि भावनगरच्या जनतेचा स्वागतशील दृष्टिकोन यामुळे येत्या तीन ते पाच वर्षांत तीनशे ते पाचशे कोटींची गुंतवणूक तेथे करण्यात येईल असे श्री. धेंपो यांनी घोषित केले. धेंपो उद्योगसमूहाच्या तीन पिढ्या किनारपट्टीच्या विकासासाठी कटिबद्ध राहिल्या असून पूर्वी दमण व दीवचा भाग असलेल्या खंबातच्या आखातापर्यंत धेंपो उद्योगसमूहाने आपले कार्यक्षेत्र ठेवले आहे, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गुजरातचे अर्थ, वीज आणि पेट्रोकेमिकल्स मंत्री सौरभभाई पटेल उपस्थित होते. अनेक खासदार, आमदार, उद्योगपती आदींचीही या समारंभास उपस्थिती होती.
सौराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेले भावनगर तेथील उत्कृष्ट रस्ते, रेल्वे, तसेच हवाई व सागरी मार्गांमुळे जागतिक दर्जाची स्मार्टसिटी बनेल असे मत श्री. धेंपो यांनी व्यक्त केले. 
सौराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे नवनिर्वाचित अध्यक्ष तुलसीभाई पटेल यांचे अधिकारग्रहणही यावेळी पार पडले. मॉडेस्ट इन्फ्रास्ट्रक्चरच्या रामसार शिपयार्डला यावेळी मंत्री सौरभभाई पटेल यांनी भेट दिली. श्री. धेंपो, तसेच कंपनीचे स्थानिक संचालक मेहुलभाई पटेल यांचे त्यांनी अभिनंदन केले. यावेळी मंत्री रमेशभाई मेंडपारा, राज्यसभेचे खासदार मनसुखभाई मांडवीय, स्थानिक आमदार जीतूभाई वाघानी, विभावरी बेन दवे व मानवेंद्रभाई त्रिवेदी, शिपब्रेकिंग असोसिएशनचे प्रमुख जवारभाई पटेल, जिल्हाधिकारी पी. के. सोळंकी, आयजीपी राधाकृष्णन आणि भावनगर इलेक्ट्रीसिटी कंपनीचे ए. बी. पांचाळ उपस्थित होते.