गुंतवणुकीचे आमिष दाखवून 4.23 कोटींची फसवणूक

0
10

केरळम येथून संशयितास अटक

गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हा विभागाने खोर्ली तिसवाडी येथील एका व्यक्तीला उच्च परतावा देण्याचे आमिष दाखवून सुमारे 4.23 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील एका संशयित आरोपी रेजस अली पी पी याला कोझिकोड केरळम येथे अटक करण्यात यश मिळविले आहे.

सायबर विभागाने या फसवणूक प्रकरणामध्ये 18 मे 2026 रोजी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 18 मे 2026 पूर्वी संशयिताने विविध मोबाईल क्रमांकांचा वापर करून आपण सिटाडेल सिक्युरिटी या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचे प्रतिनिधी असल्याचे भासवून आणि तक्रारदाराला सिटाडेल सिक्युरिटी नावाच्या बनावट ॲप्लिकेशनची ओळख करून देऊन जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून तक्रारदाराला एकूण 4,23,94,163 रूपये हस्तांतरित करण्यास प्रवृत्त केले.

सायबर विभागाने केलेल्या सखोल तांत्रिक आणि आर्थिक तपासानंतर, केरळममधील कोझिकोड येथे एका संशयिताचा शोध लागला. पोलीस उपनिरीक्षक नवीन नाईक यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने कोझिकोड केरळम येथे जाऊन संशयित आरोपी रेजस अली याला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आला असून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक राजू राऊत देसाई यांच्या मार्गादर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर पुढील तपास करीत आहेत.