गीता-मानस ः 26…स महात्मा सुदुर्लभः

0
22
  • प्रा. रमेश सप्रे

असा आदर्श, ज्ञानी, निष्काम भक्त सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी त्या भक्ताला असंख्य जन्म घ्यावे लागतात, तेव्हा त्याला सर्वत्र वासुदेवाच्या दर्शनाचा अनुभव येतो. तो सदैव तृप्त, संतुष्ट, समाधानी असतो. तोही भक्तच असतो; पण ज्ञानी, साक्षात्कारी भक्त असतो.

बोलताना आपण काही शब्द सहज वापरून जातो. पण त्याचा अर्थ पाहिला तर तो खूप खोल, व्यापक असा असतो. उदा. भक्त- भक्ती- भक्तिभाव. भक्त म्हणजे कोण तर भक्ती करतो तो! आणि भक्ती म्हणजे काय तर भक्त करतो ती! यावरून निश्चित काय कळलं? हे असं झालं- देसाई कुठं राहतात? नाईकांच्या समोर आणि नाईक कुठं राहतात तर देसाईंच्या समोर! म्हणजे दोघांचंही घर नक्की कुठंय हे काही कळलंच नाही.

सॉक्रेटिसच्या आजूबाजूला नेहमी तरुणांचं कोंडाळं असायचं. त्यांना सॉक्रेटिस एकच सांगायचा- ‘तुमच्यासमोर कोणत्याही वडील मंडळींनी एखादा मोठा शब्द वापरला तर त्या व्यक्तीला थांबवून त्या शब्दाचा अर्थ विचारायचा. जर त्यानं त्या शब्दाचा अर्थ सांगितला तर पुढचा प्रश्न विचारायचा- ‘तुमचं वर्तन, जीवन या अर्थाप्रमाणे आहे का?’ उदा. घरी बाबांनी म्हटलं, ‘तुम्हां मुलांना शिस्त हवी.’ की बाबांना विचारायचं, ‘शिस्त म्हणजे काय हो बाबा?’ ते इंग्लिश जाणणारे असतील तर म्हणतील- ‘शिस्त म्हणजे डिसिप्लिन!’ आणि ‘बाबा, डिसिप्लिन म्हणजे काय?’ तर बाबा म्हणतील, ‘डिसिप्लिन म्हणजे शिस्त!’ याचा अर्थ त्यांना शिस्त म्हणजे निश्चित काय हे माहीत नाहीये.

एखादा राजकीय नेता म्हणून जातो- ‘आपला देश लोकशाही पद्धतीनं चालतो.’ त्या नेत्याला थांबवून विचारा, ‘महाशय, लोकशाही म्हणजे काय हो?’ तो तयारीचा असेल तर म्हणेल, ‘लोकशाही म्हणजे लोकांचं- लोकांसाठी- लोकांनी चालवलेलं राज्य.’ लगेच विचारा त्यांना, ‘तुमच्या घरात अशा प्रकारची व्यवस्था आहे? आणि तुमच्या संस्थेत? सर्व लोकांच्या मतांचा आदर केला जातो का? निर्णय घेताना त्यात सर्वांना सहभागी करून घेतलं जातं का?’
अशा प्रकारे मोठ्या लोकांना निरुत्तर करणं हा उद्देश नसावा. उलट त्यांनी विचार करून शब्द वापरावेत (भाषा वापरावी) नि त्याप्रमाणे व्यवहार करावा अशी अपेक्षा असावी. सभ्य, सुसंस्कृत लोकांची विचारपद्धती नि जीवनशैली अशी असली पाहिजे.
भगवंतांनी स्वतः गीतोपदेश करताना अनेक महत्त्वाचे शब्द किंवा शब्दप्रयोग वापरले. काही नवे शब्द तयार केले, तर काही शब्दांना नवा कालसंगत अर्थ दिला. यज्ञ- दान- तप- कर्म- धर्म- स्वाध्याय यांसारखे जीवनाची दिशा ठरवणारे शब्द गीतेत अधिक व्यापक अर्थानं वापरलेयत. स्वधर्म, संन्यास, कर्म-अकर्म-विकर्म यांसारख्या शब्दांवर गीतेतील चिंतन नि विवरण खूप हृद्य आहे.
‘भक्त’ हा शब्द स्पष्ट करताना त्याचे चार प्रकार, नव्हे, पैलू सांगितलेयत. अर्थात भक्तासाठी ‘सुकृतिनः जनः’ म्हणजे पुण्यशील भक्तजन असे शब्द वापरलेयत. भगवंताचे शब्द आहेत-
चतुर्विधा भजन्ते मां जना: सुकृतिनोऽर्जुन ।
आर्तो जिज्ञासुः अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ ॥7।16॥
म्हणजे- हे भरतवंशातील पुरुषांत श्रेष्ठ (भरतर्षभ) अर्जुना, आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी असे चार प्रकारचे भक्त (सुकृतिनः जनाः) मला भजतात. येथे चार भक्तांची नावं (पैलू) सांगितलीयत त्यांचा योग्य क्रम लावला तर अर्थ स्पष्ट होण्यास मदत होते.
हा क्रम असा आहे ः आर्त- अर्थार्थी- जिज्ञासू- ज्ञानी.
जिवंत उदाहरणांवरून हे भक्तांचे प्रकार (पैलू) चांगले समजतात.

  • आर्त भक्त ः आपण चातक पक्ष्याला तृषार्त म्हणतो. एका अलीकडच्या काळातील महापुरुषाच्या चरित्राचं नाव आहे ‘तृषार्त.’ चातकाची तृषा ही पावसाच्या थेंबांसाठी आहे. ती शरीराच्या अंगानं जाणारी आहे. पण पावसाच्या थेंबांशी चातक एकनिष्ठ आहे. त्या महापुरुषाच्या चरित्रात जी तृषा म्हणजे तहान आहे नि जी आर्तता म्हणजे आतून आलेली ओढ आहे, उत्कटता आहे ती आर्त भक्ती आहे नि तो आर्त भक्त आहे.
    अत्यंत अगतिक, लाचार झालेली द्रौपदी जेव्हा आर्ततेनं श्रीकृष्णाचा धावा करते तेव्हा कृष्ण ‘वस्त्रावतार’ बनून धावत येतो नि तिचं लज्जारक्षण करतो.

दुसरा तो गजेंद्र. जेव्हा एक मगर आपला पाय तिच्या अक्राळ-विक्राळ जबड्यात पकडून आपल्याला पाण्याच्या आत ओढून नेते आहे. तिची शक्ती पाण्यात आपल्यापेक्षा जास्त आहे. आपला मृत्यू आता अटळ आहे हे लक्षात आल्यावर जवळच उमललेलं एक कमळ सोंडेनं तोडून वैकुंठाच्या दिशेनं फेकतो. विष्णूला ते पुष्प अर्पण करून स्वतःचं रक्षण करून घेतो, तेव्हा तो आर्त भक्त असतो.
आर्त भक्तीत शरणागती, आत्मसमर्पण, सर्व‘स्व’ अर्पण करणं हे सारे भाव समाविष्ट आहेत. विशेषतः संपूर्ण अनन्यशरणागती अपेक्षित आहे. अर्थातच, भगवंताचा ‘आर्त भक्त’ हा खूप लाडका भक्त आहे.
आपण निरनिराळ्या देवदेवतांच्या, साधुसंतांच्या आरती (‘आरत्या’ हे आरती शब्दाचं अनेकवचन शक्यतो टाळावं. जसं आईचं अनेकवचन ‘आया’ नको, मूर्तीच ‘मूर्त्या’ नको, संधीचं ‘संध्या’ नको. असो.) म्हणतो. आर्त भावाशिवाय म्हटलेली आरती हा फक्त गायनप्रकार किंवा एक भावगीत आहे असं समजावं.

  • अर्थार्थी भक्त ः म्हणजे काही अपवाद वगळता आपण सारे भक्त, ज्यांना प्रपंच सुधारण्यासाठी भक्ती करून काही ना काही भगवंताकडून हवं असतं. भागवत ग्रंथात प्रल्हादानं अशा भक्तीला ‘वणिक्‌‍ भक्ती’ म्हटलंय. ‘वणिक्‌‍’ म्हणजे वाणिज्य- व्यापार- देण्याघेण्याचा व्यवहार. अर्थार्थी भक्त हा मुख्यतः ‘सकाम भक्त’ असतो. काही ना काही तरी त्याला सतत हवं असतं. त्यासाठी पूजाअर्चा, व्रतं, तीर्थक्षेत्रांना भेटी, दान, तप, यज्ञ हे सारं करत असतो. पूर्वीचे राजे, आजकालचे नेते, सर्वसामान्य सांसारिक सारे अर्थार्थी भक्त. मंदिरांसमोर त्या-त्या देवदेवतेच्या दिवशी (म्हणजे सोमवारी- शिव, मंगळवारी- गणपती किंवा हनुमान, गुरुवारी- दत्त, शुक्रवारी- देवी इ. इ.) ज्या भल्यामोठ्या रांगा लागतात त्या अर्थार्थी भक्तांच्याच असतात.
  • जिज्ञासू भक्त ः जीवनात सारं काही अगदी नवससायास, विविध कर्मकांडं, अनेक प्रकारच्या पूजा (उदा. सत्यनारायण, सत्यविनायक, सत्यदत्त इ.) सारं करूनही आपल्या मनासारखं घडत नाही, व्यवहारातले प्रयत्न करूनही अपेक्षित यश मिळत नाही, तेव्हा अशा जिज्ञासू भक्ताच्या मनात काही प्रश्न उभे राहतात. त्यातून देव- साधुसंत- सद्गुरू यांच्या कार्याबद्दल जिज्ञासा, कुतूहल निर्माण होतं. देवाचं, पूजाअर्चेचं रूप-स्वरूप नि एकूण जीवन याविषयी जिज्ञासू भक्त विचार करू लागतो. संसाराच्या व्यापातून, किचकट कटकटीतून सुटण्यासाठी कीर्तन- प्रवचन- पारायण- वाचन- क्वचित चिंतन करू लागतो. या मुमुक्षूसारखी (मोक्षाची इच्छा निर्माण झालेल्या) जिज्ञासू भक्ताची मनोवस्थाही म्हणता येईल.

वरील तीनही प्रकारचे भक्त हे शुद्ध भक्त नव्हेत. खऱ्या देवापासून, उपासना-भक्तीपासून तसे ते दूरच आहेत. ‘सकाम भक्त’ हाच त्यांचा परिचय आहे. म्हणून भगवंतांनी याहीवरचा श्रेष्ठ, खऱ्या भक्ताचा प्रकार सांगितलाय.

  • ज्ञानी भक्त ः हा साऱ्या भक्तांचा मुकुटमणी असतो. निरपेक्ष, निष्काम भक्ती करणं नि तिच्यातच रमून-रंगून जाणं हेच अशा ज्ञानी भक्ताचं वैशिष्ट्य असतं.

पुराणातलं उदाहरण द्यायचं तर ध्रुव हा अर्थार्थी (सकाम) भक्त होता. त्याला हवं होतं अढळपद. म्हणजे जिथून त्याला कोणी ढकलणार नाही किंवा त्याचं पतन होणार नाही असं स्थान त्यानं मिळवलं. पण प्रल्हादाला साक्षात्‌‍ महाविष्णू नृसिंहानं अनेकदा सांगूनही ‘मला काही नको’ हेच धृपद (पुन्हा पुन्हा म्हणणं) प्रल्हादानं चालू ठेवलं. जेव्हा ‘आपल्याला हे तेज (ह्या ज्वाला) असह्य होतंय, त्यातून मुक्त होण्यासाठी काहीतरी माग’ असं साक्षात्‌‍ नृसिंह भगवान म्हणाले तेव्हा त्यानं मागितलं की ‘तुझे भक्त तन्मय होऊन नाम घेत असतील (नामामृत) आणि तुझ्या कथा (कीर्तन) ऐकण्यात रंगून जातील त्या ‘नामामृत’ नि ‘कथामृत’ प्रशान करणाऱ्या भक्तांना तुझा अनुभव दे. दर्शन दे.’ – एवढंच मागितलं. हा खरा ज्ञानी भक्त.

दशरथानं पुत्रप्राप्तीसाठी केलेला ‘पुत्रकामेष्टी’ यज्ञ हा सकाम होता. पण त्याच्याच वंशातील रघू राजानं केलेला विश्वजित यज्ञ निष्काम असायचा. कारण यज्ञाची पूर्वतयारी म्हणून रघू राजा सर्वस्वाचा त्याग करत असे.
भक्तीऐवजी भक्तांची लक्षणं भगवंतांनी गीतेत सांगितलीयत. तर भागवतात ‘नवविधा भक्तीची’ चर्चा केली आहे. कारण वरवर पाहता ‘गीता’ नि ‘भागवत’ या ग्रंथांचा विषय तसा भिन्न आहे. अर्थात, सर्व प्रकारच्या भक्त राजांच्या, महापुरुषांच्या अनेक कथा भागवतातही आल्या आहेत. असो.

भक्तांचा मुकुटमणी जो ‘ज्ञानी भक्त.’ त्याची उदाहरणं म्हणजे, रामायणातील सकाम भक्त म्हणजे ‘लक्ष्मण.’ त्याला सदासर्वदा सर्वत्र जिवंत रामच हवा असायचा. पण भरताला रामाचं प्रतीक असलेल्या रामाच्या पादुका चालल्या. महाभारतात अर्जुनाला अखेरपर्यंत कृष्ण हवा होता; पण उद्धवानं कृष्णाचं परंधाम गमन यासारखा प्रसंग स्वतः अनुभवून भगवान कृष्णाचं तेज असलेल्या ‘भागवत’ ग्रंथाचा अभ्यासही त्याला पुरला.
पुढे भगवंत महत्त्वाचा विचार सांगतात- असा आदर्श, ज्ञानी, निष्काम भक्त सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी त्या भक्ताला असंख्य जन्म घ्यावे लागतात, तेव्हा त्याला सर्वत्र वासुदेवाच्या दर्शनाचा अनुभव येतो. तो सदैव तृप्त, संतुष्ट, समाधानी असतो. तोही भक्तच असतो; पण ज्ञानी, साक्षात्कारी भक्त असतो.

भगवंताचे शब्द आहेत-
बहूनां जन्मनां अन्ते ज्ञानवान्‌‍ मां प्रपद्यते ।
वासुदेवः सर्व इति स महात्मा सुदुर्लभः ॥
ऋषीमुनी, साधुसंत, सत्‌‍पुरुष असे सर्वत्र वसून असलेल्या देवाचा, दैवीशक्तीचा, चैतन्याचा सदैव अनुभव घेणारे ‘महात्माजन’ होते. त्यांना विनम्र अभिवादन करूया.