गावसकरांच्या संघात पाकिस्तानीच अधिक

0
135

 

भारतीय संघाचे माजी सलामीवीर सुनील गावसकर यांनी भारत व पाकिस्तानी खेळाडूंचा संयुक्त संघ निवडला आहे. या संघात त्यांनी सध्या सक्रीय असलेल्या एकाही खेळाडूचा समावेश केलेला नाही. गावसकर यांच्या संघात भारताच्या पाच व पाकिस्तानच्या सहा खेळाडूंचा समावेश आहे. निवडलेला संघ हा कसोटी, वनडे किंवा टी-ट्वेंटीचा आहे हे गावसकर यांनी स्पष्ट केलेले नाही. गावसकरांच्या संघात अनेक आश्‍चर्यकारक नावांचा समावेश आहे.

गावसकर यांनी आपल्या संघात सलामीला फलंदाज म्हणून भारताचा दिग्गज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि ‘ओरिजनल लिट्ल मास्टर’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या पाकिस्तानच्या हनीफ मोहम्मद यांचा समावेश केला आहे. गावसकर यांनी आपल्या ड्रीम इलेव्हनमध्ये तिसर्‍या स्थानासाठी पाकिस्तानी झहीर अब्बास याला निवडताना राहुल द्रविडचा विचार केला नाही. क्रमांक चारसाठी अपेक्षेप्रमाणे त्यांनी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा समावेश केला आहे.

गुंडाप्पा विश्‍वनाथ यांना गावसकर यांनी क्रमांक पाचसाठी निवडले आहे. भारताला १९८३ साली विश्‍वचषक जिंकून देण्यात मोलाचे योगदान दिलेले कपिलदेव व १९९२ साली पाकिस्तानला विश्‍वचषक मिळवून दिलेल्या इम्रान खान या अष्टपैलूंना सहाव्या व सातव्या स्थानासाठी गावसकर यांनी पसंती दिली आहे. गावसकर यांनी सय्यद किरमाणी यांचा यष्टिरक्षक म्हणून संघात समावेश केला आहे. दोन्ही देशातील अनेक दिग्गज गोलंदाजांचा या संघात समावेश आहे. यात पाकिस्तानचे माजी खेळाडू वसीम अक्रम, अब्दुल कादीर तर भारताचे बी.एस. चंद्रशेखर यांच्या नावांचा समावेश आहे.