भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांची माहिती
आदिवासी कल्याण खात्याबाबत वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात काल कला, संस्कृती, क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्याशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी आल्तिनो पणजी येथे चर्चा केली. भाजपचे केंद्रीय नेतृत्व मंत्री गोविंद गावडे प्रकरणी निर्णय घेणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.
मंत्री गोविंद गावडे यांच्यावरील कारवाईबाबत मागील एक आठवडा माध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. राज्य सरकारच्या प्रेरणा दिन कार्यक्रमात मंत्री गावडे यांनी आदिवासी कल्याण खात्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. त्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष नाईक यांनी मंत्री गोविंद गावडे यांच्यावर शिस्तभंग प्रकरणी कारवाईची घोषणा केली. तसेच, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्री गावडे यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेतल्याचे सांगून याप्रकरणी लवकरच कारवाई करण्यात येईल, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले होते.
तथापि, मंत्री गोविंद गावडे यांनी गंभीर आरोप करणारे वक्तव्य करून आठ दिवस उलटले तरी भाजपकडून मंत्री गावडे यांच्यावर अजूनपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी मंत्री गावडे यांच्याशी चर्चा करण्याचे जाहीर केले होते. तथापि, प्रदेशाध्यक्ष नाईक हे दिल्ली दौऱ्यावर असल्याने मंत्री गावडे यांच्याशी चर्चा करू शकले नव्हते.
गावडे यांच्याशी चर्चा
दामू नाईक यांनी गोव्यात परतल्यानंतर तातडीने मंत्री गावडे यांच्याशी वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी चर्चा केली. मंत्री गावडे यांची बाजू ऐकून घेण्यात आली असून या चर्चेचा अहवाल भाजपच्या केंद्रीय नेत्यांना पाठविला जाणार आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून मंत्री गावडे प्रकरणी कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असे प्रदेशाध्यक्ष नाईक यांनी सांगितले.
नवी दिल्लीच्या दौऱ्यात गोविंद गावडे मुद्द्यावर कोणतीही चर्चा झाली नाही. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 11 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संपूर्ण भारतात कार्यक्रम आयोजित करण्याशी संबंधित बैठकीला उपस्थिती लावली, असे प्रदेशाध्यक्ष नाईक यांनी सांगितले.
मंत्री गावडे यांच्यावरील कारवाईबाबत माध्यमांतून वेगवेगळी वृत्ते प्रसिद्ध होत होती. गोवा प्रदेश भाजपने कारवाईबाबत केंद्रीय नेतृत्वाकडे बोट दाखविले आहे. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाकडून मंत्री गोविंद गावडेंबाबत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे राज्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
प्रश्नांना दिली उत्तरे ः गावडे
भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली आहेत, असे मंत्री गावडे यांनी भाजप मुख्यालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना सांगितले.