मुख्यमंत्री पर्रीकर यांचे आश्वासन
गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील एकाही रुग्णावर यापुढे जमिनीवर झोपण्याची पाळी येऊ नये यासाठी आवश्यक ती तरतूद केली जाईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत सांगितले. गोमेकॉतील वॉर्ड क्रमांक १३९ व १०८ मध्ये रुग्णांना खाटांभावी जमिनीवर झोपवण्यात येते. जमिनीवर झोपण्यासाठी त्यांना चटईही देण्यात येत नाही. घाणेरडी अशी एक चादर व उशी देण्यात येते असे नरेश सावळ यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला सभागृहाच्या नजरेस आणून दिले असता पर्रीकर यांनी वरील स्पष्टीकरण केले.
सदर प्रश्नावरून सावळ यांनी आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना यावेळी फैलावर घेतले. रुग्णांना गुरांसारखी वागणूक का देण्यात येते. त्यांना चटईही न देता जमिनीवर झोपण्यास का भाग पाडले जाते असे प्रश्न उपस्थित करून यावेळी सावळ यांनी पार्सेकर यांना भंडावून सोडले. त्यामुळे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना हस्तक्षेप करावा लागला. जमिनीवर झोपावे लागणार्या रुग्णांच्या सोयीसाठी अतिरिक्त साहित्य खरेदी करू. त्यांना स्वच्छ चादरी व उशी देण्याची सोय केली जाईल, असे आश्वासन यावेळी पर्रीकर यांनी दिले.
त्याआधी आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणाले की, गोमेकॉत केवळ १२०० खाटांची सोय आहे. मात्र, रुग्णांची संख्या त्याच्यापेक्षा जास्त झाल्यानंतर नाईलाजाने काही रुग्णांना जमिनीवर झोपवावे लागते. खाटा भरल्या म्हणून आम्ही हाऊसफुल बोर्ड लावून रुग्णांना परत पाठवू शकत नसल्याचे ते म्हणाले. जमिनीवर झोपणार्या रुग्णांना चटई देण्यात येते असा दावा पार्सेकर यांनी केला. तर चटई देण्यात येत नसल्याचा आरोप सावळ यांनी केला.
यावेळी हस्तक्षेप करताना आमदार रोहन खंवटे म्हणाले की गोमेकॉत मोठ्या संख्येने गोव्याबाहेरून रुग्ण येतात. परिणामी गोमंतकीयांचे हाल होतात. गोमेकॉ हे गोमंतकीयांचे इस्पितळ असून त्यात गोमंतकीयांनाच प्राधान्य द्यायला हवे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. त्यावर बोलताना पर्रीकर म्हणाले की, आम्ही गोमंतकीय व बिगर गोमंतकीय असा रुग्णांच्याबाबतीत भेद करू शकत नाही. मात्र, त्याचबरोबर घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगून आता गोमेकॉत सुपर स्पेशालिटी विभाग सुरू करण्यात येत असून ते सुरू झाले की खाटांची संख्या वाढेल. परिणामी खाटांची समस्या सुटू शकेल, असे ते म्हणाले.