गांधी जयंतीपासून कॉंग्रेसची देशभरात भारत जोडो यात्रा

0
20

>> राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधींची माहिती; राजस्थानमधील चिंतन शिबिराचा समारोप

>> १५ जूनपासून जन जागरण अभियान

राजस्थानमधील कॉंग्रेसच्या नवसंकल्प चिंतन शिबिराच्या शेवटच्या दिवशी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नेत्यांना संबोधित केले. यावेळी कॉंग्रेस पक्ष देशभरात भारत जोडो यात्रा सुरू करणार असल्याची घोषणा सोनिया गांधी यांनी केली. यावर्षी गांधी जयंतीपासून भारत जोडो यात्रा सुरू होईल. या प्रवासात तरुण आणि वृद्ध सगळेच सहभागी होणार आहेत. यात्रेमुळे जातीय सलोखा राखण्यास मदत होणार आहे. याशिवाय जिल्हा स्तरावरही जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

कॉंग्रेस पक्षाने राजस्थानच्या उदयपूरमध्ये आयोजित केलेल्या नवसंकल्प चिंतन शिबिराचा काल अखेरचा दिवस होता. या चिंतन शिबिरात पक्षाला नवसंजीवनी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रविवारी आपल्या भाषणात कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी पक्षाकडून काश्मीर ते कन्याकुमारी भारत जोडो यात्रा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. गांधी जयंतीनिमित्त आम्ही २ ऑक्टोबरपासून ‘कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा’ सुरू करणार आहोत. कॉंग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांपासून ते ज्येष्ठ नेतेही या यात्रेत सहभागी होतील. या यात्रेमुळे लोकांमध्ये सामाजिक एकोपा वाढेल, असे त्या म्हणाल्या.

कॉंग्रेसचा जनतेशी तुटलेला संपर्क पुन्हा जोडावा लागेल
कॉंग्रेसच्या चिंतन शिबिरात राहुल गांधींनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. केंद्र सरकारने भारतातील तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले आहे. एकीकडे बेरोजगारी आहे, तर दुसरीकडे महागाईच्या वणव्यात जनता होरपळते आहे, अशी टीका त्यांनी केली. तसेच कॉंग्रेस पक्षाचा जनतेशी तुटलेला संपर्क पुन्हा जोडावा लागेल. ऑक्टोबरमध्ये संपूर्ण पक्ष लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधेल. पक्षाचे नेते व कार्यकर्ते जनतेत जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेतील. जनतेशी नाते निर्माण करायचे असेल, तर हे काम शॉर्टकटने होणार नाही. कॉंग्रेस हा एकमेव पक्ष देशाला पुढे नेऊ शकतो हे लोकांना समजले आहे, असे राहुल गांधी म्हणाले.