एकाचा मृतदेह सापडला; कुर्टी येथे घेत होते तायक्वांदोचे प्रशिक्षण; अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी अन्य दोघांना वाचवले
कुर्टी येथे तायक्वांदोचे प्रशिक्षण घेणाऱ्या 6 खेळाडूंचा एक गट काल दुपारच्या सुमारास गांजे-उसगाव येथील म्हादई नदीत आंघोळीसाठी उतरला असता त्यापैकी दोघे जण बुडाल्याची घटना घडली. नदीत बुडालेल्यांमध्ये धनंजय खैरनाथ (18, रा. धुळे-महाराष्ट्र) व लवप्रीत सिंग (24, रा. पंजाब) या खेळाडूंचा समावेश आहे. त्यापैकी लवप्रीत सिंग याचा मृतदेह संध्याकाळी उशिरा पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले, तर धनंजय याचा शोध सुरू होता. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांच्या चपळतेमुळे पाण्यात अडकून पडलेल्या अन्य दोघा खेळाडूंना बाहेर काढण्यात यश आले.
प्राप्त माहितीनुसार, रविवारी दुपारी कुर्टी येथील क्रीडा संकुलाजवळील एका प्रशिक्षण केंद्रात तायक्वांदोचे प्रशिक्षण घेणाऱ्या सहा खेळाडूंचा एक गट आंघोळीसाठी म्हादई नदीवर आला होता. सदर खेळाडू हे गेल्या दोन वर्षांपासून तेथे प्रशिक्षण घेत होते. हे सर्व जण म्हादई नदीत आंघोळ करत असताना त्यापैकी धनंजय आणि लवप्रीत हे दोघे जण अधिक खोल पाण्यात गेले. पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही बुडत असल्याचे पाहून अन्य दोघांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र ते दोघे बुडाले आणि वाचवण्यासाठी गेलेले अन्य दोघेजण पाणी अधिक असल्याने अडकून पडले. गटामधील इतरांनी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिकांनी नदीवर धाव घेतली. त्यानंतर फोंडा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना व पोलिसांना माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाचे अधिकारी सुशील मोरजकर व अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन अडकून पडलेल्या दोघांना बाहेर काढले. त्यानंतर बेपत्ता झालेल्या दोघांचा शोध सुरू केला. संध्याकाळी उशिरा लवप्रीत याचा मृतदेह बाहेर काढण्यात कर्मचाऱ्यांना यश आले. मात्र धनंजय याचा शोध लागू शकला नव्हता. संध्याकाळी उशिरापर्यंत शोधमोहीम राबवल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी बचावकार्य थांबवले. आता सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम राबवली जाणार आहे. फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांनी सुद्धा संध्याकाळी उशिरा घटनास्थळी धाव घेतली होती.
नदीत दोघेजण बुडाल्याची माहिती कळतात परिसरात लोकांची गर्दी उसळली. स्थानिक सरपंच रामनाथ डांगी व जिल्हा पंचायत सदस्य उमाकांत गावडे यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली.
दोन महिन्यांपूर्वी दोघांचा याच ठिकाणी झाला होता मृत्यू
दोन महिन्यांपूर्वी याच घटनास्थळावर फोंडा येथील दोन्ही लोकांचा बुडून मृत्यू झाला होता. ती घटना ताजी असतानाच रविवारी घडलेल्या घटनेमुळे गावातील लोकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. धोक्याची सूचना केल्यास नदीवर आंघोळीसाठी येणारे पर्यटक स्थानिक लोकांशी वाद घालतात. भविष्यात नदीवर आंघोळीसाठी पर्यटक दिसून आल्यास पोलिसांना फोन करण्याची विनंती काल पोलीस निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांनी केली.

