गहू निर्यात : ३० वर्षांनंतर मुरगाव बंदरातून जहाज निघणार

0
64

सुमारे ३० वर्षांच्या कालावधीनंतर मुरगाव बंदरातून गहूची निर्यात होत असून ३१,५०० मे. टन क्षमतेचे पहिले जहाज सोमवारी दक्षिण आफ्रीकेला जाण्यासाठी सज्ज झाले आहे.

मुरगाव बंदरातील खनिज वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे मुरगाव पोर्ट ट्रस्ट व्यवस्थापनासमोर गंभीर समस्या निर्माण झाली आहे. तेलवाहू टँकर तसेच कंटेनरची वाहतूक मुरगाव बंदरातून सुरळीतपणे होत असली तरी एम. पी. टीचा ८० टक्के महसूल हा खनिज वाहतुकीवर अवलंबून आहे. त्यामुळे यावर उपाय म्हणून एम. पी. टी. व्यवस्थापनाने गहू निर्यात करण्यासाठी केंद्रीय पातळीवरून प्रयत्न केले होते.

मुरगाव पोर्ट ट्रस्टचे चेअरमन पी. मारा पांड्या यांनी मंगळवारी संध्याकाळी विधिवतरीत्या पूजा करून गहू निर्यात मोसमाला प्रारंभ केला. दक्षिण आफ्रिकेला गहूची निर्यात करण्यासाठी जहाज मुरगाव बंदरामध्ये दाखल झाले असून आज बुधवारी सकाळपासून जहाजामध्ये गहू भरण्यास सुरुवात झाली आहे. येत्या सहा दिवसांमध्ये हे जहाज पूर्ण होणार असून नंतर दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. भारतीय अन्न महामंडळाने मध्य प्रदेश व पंजाब येथून सदर गहू एम. एम. टी. सीतर्फे पाठविला जात असून येथून वाहतूक करण्याचे कंत्राट अमित अर्थ मुवर्सला देण्यात आले आहे. पंजाब व मध्य प्रदेश येथून रेलमार्गे वास्कोमध्ये येणारा गहू ट्रकद्वारे मुरगाव बंदरात पाठविला जात आहे. यासंदर्भात बोलताना अमित अर्थ मुवर्सचे तुषार भोसले यांनी सांगितले की, गहू वाहतुकीसाठी सध्या १३० ट्रक कार्यरत असून सुमारे ६५० कामगारांना कंत्राटपध्दतीने नोकरभरती करण्यात आली आहे. भविष्यामध्ये निर्यातीची क्षमता लक्षात घेऊन आवश्यकता भासल्यास ट्रक तसेच कामगारांची संख्या वाढविण्यात येईल. मुरगाव बंदरामध्ये ६० हजार मे. टन पेक्षा अधिक गव्हांचा साठा करण्याची क्षमता आहे.

यापूर्वी मुरगाव बंदर गोदी मंडळातर्फे गहू, पेंड, साखर, युरीया इतर वस्तूंची आयात केली जात होती. धक्का क्र. ९ पूर्ण झाल्यापासून ही आयात बंद झाली होती.