गरज धडक मोहिमेची

0
25

साकवाळ येथील एका प्रतिष्ठित शिक्षणसंस्थेच्या वसतिगृहात मृतावस्थेत आढळलेल्या विद्यार्थ्याच्या उलटीच्या रासायनिक तपासणीत त्याच्या पोटात अमली पदार्थांचे अंश सापडण्याचा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. ही काही एकमेव घटना नव्हे. गेल्या नऊ महिन्यांत पाच विद्यार्थी अशा प्रकारे संशयास्पद परिस्थितीत मृतावस्थेत सापडले आहेत. त्यामुळे ह्या विषयाकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांपर्यंत आणि त्यातही जर अशा प्रतिष्ठित उच्चशिक्षण संस्थांपर्यंत हे अमली पदार्थ पोहोचले असतील तर ती एका मोठ्या धोक्याची चाहुल म्हणावी लागेल. ह्यापूर्वीही गोव्यातील काही प्रतिष्ठित महाविद्यालयाचे विद्यार्थी अमलीपदार्थ सेवन करताना आढळून आलेले हेोते. अशा घटनांशी संबंधित जे कोणी आढळतील त्यांना कोणतीही दयामाया न दाखवता कठोर कारवाई केली गेली, तरच हे लोण थांबू शकेल. दुर्दैवाने अमली पदार्थ व्यवहारांबाबत पुरेसे गांभीर्य दिसत नाही. हैदराबाद पोलिसांनी मध्यंतरी मोठे रॅकेट उघडकीस आणले तेव्हा कुठे स्थानिक पोलिसांना त्याची खबर मिळाली होती. एकीकडे सरकारकडून कॅसिनो संस्कृतीला उत्तेजन मिळते आणि दुसरीकडे अमली पदार्थांविरुद्ध कारवाई चालते. अमली पदार्थांसारखे गैरप्रकार काही आकाशातून होत नसतात. जे सांस्कृतिक पर्यावरण राज्यामध्ये दिसते त्याला अनुलक्षूनच हे व्यवहार होत असतात. एक काळ होता जेव्हा गोव्यामध्ये हिप्पी संस्कृतीचे प्राबल्य होते. गोव्याची ओळख जगभरात पोहोचली ती येथील मंदिर संस्कृतीमुळे नव्हे. ती पोहोचली येथील उघड्यानागड्या हिप्पींमुळे. सत्तरच्या दशकात गोव्यात त्यांनी थैमान मांडले होते. तो भार काही काळाने ओसरला, परंतु आजही गोव्याकडे पाहण्याची दृष्टी स्वैराचारी वर्तनासाठीचे ठिकाण अशीच दिसते आणि त्यासाठी देशविदेशातून पर्यटक येथे लोटत असतात. ते काही येथील मंदिरे बघायला येत नाहीत वा गोमंतकीय संस्कृती समजून घ्यायलाही येत नाहीत. ते येतात खा, प्या, मजा करा ह्यासाठी. आजवर गावोगावी, रस्तोरस्ती असलेली मद्यालये हे ह्या पर्यटकांचे आकर्षण होते. आज येथील कॅसिनो आहेत. एकीकडे संस्कृतीच्या संवर्धनाच्या बाता मारायच्या आणि दुसरीकडे कॅसिनो संस्कृतीला उघडउघड राजाश्रय द्यायचा ही निव्वळ ढोंगबाजी आहे. एकीकडे येथे योगसेतू उभारला जातो आणि त्यावरून चहुबाजूंना दिसते काय तर कॅसिनो. एकीकडे कोटीतीर्थे उभारण्याच्या घोषणा चालतात आणि दुसरीकडे रस्तोरस्ती मद्याचे तीर्थ वाहते. त्यामुळे उगाच हे देखावे करण्यात काही अर्थ नाही. आपल्याला नेमकी कोणती दिशा पकडायची आहे हे एकदा सरकारने ठरवावे. शाळा महाविद्यालयांपर्यंत, उच्च शिक्षणसंस्थांपर्यंत अमली पदार्थ पोहोचणे ही साधीसुधी बाब नव्हे. ह्यापूर्वी बड्या आंतरराष्ट्रीय ड्रगमाफियांनी येथे कसे बस्तान बसवले हेोते आणि पोलिसांपासून पत्रकारांपर्यंत त्यांची हप्तेबाजी कशी चालली होती हे सर्व पुराव्यांनिशी उघडकीस आलेले आहे. आजही आपण त्याच वाटेने प्रवास करणार असू तर संस्कृती संवर्धनाच्या बाता कशासाठी? आज गोव्यात जागोजागी अंधाऱ्या ठिकाणी ग्राफिटी चितारून खाणाखुणा केलेल्या दिसतात. पूल म्हणा, कुंपणाच्या भिंती म्हणा, ह्या रंगवलेल्या ग्राफिटी काय दर्शवतात? ह्या काही कलाकृती नव्हेत. ह्या सरळसरळ अमली पदार्थ व्यवहारांच्या खाणाखुणा असतात आणि येथे येऊन ठाण मांडलेल्या विदेशी टोळ्यांद्वारे ह्या ठिकाणी खुलेआम अमली पदार्थ व्यवहार चालवले जातात असा संशय घेण्यास वाव आहे. पोलिसांना हे दिसत नसेल तर ही आश्चर्याची बाब आहे. मटक्यासारखे अवैध धंदे आज राजधानी पणजीसारख्या शहरात उघडउघड चालतात ते काय पोलिसांच्या आणि राजकीय नेत्यांच्या कृपाछत्राशिवाय? त्यामुळे मुळात अशा गैरव्यवहारांना असलेला राजकीय आणि पोलिसी वरदहस्त काढून घेण्याची जरूरी आहे. गोव्याची नवी पिढी अमलीपदार्थांच्या आहारी जाते आहे, तिला त्या दिशेने नेले जात आहे ही साधी गोष्ट नव्हे. गोवा हे अमपी पदार्थ व्यवहारांच्या आंतरराष्ट्रीय नकाशावर आलेले आहे. येथून देशा आणि विदेशात अमली पदार्थांचे व्यवहार चालतात हे राष्ट्रीय अमलीपदार्थविरोधी विभागाने यापूर्वीच आपल्या अहवालात स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे आज खरी गरज आहे ती हे सध्या गाजणारे प्रकरण पडद्याआड टाकण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी अमली पदार्थांची ही काड उद्ध्वस्त करण्याची. त्यासाठी मोठी मोहीम पोलिसांकरवी राबवावी. जे कोणी स्थानिक किंवा विदेशी अशा गैरकृत्यांत गुंतलेले असतील, त्यांचा निर्णायक हिशेब केला जावा. गोवा अमलीपदार्थमुक्त करण्याची वेळ आज आलेली आहे. त्यासाठी निर्णायक धडक कारवाई गरजेची आहे.