मुख्यमंत्री, मडगावात लाभाथींना सनदांचे वितरण
गोव्यात 1972 पूर्वी बांधलेल्या घरांना कायदेशीर सनदा देऊन कायम करण्याची योजना आमच्या सरकारने तयार करून आज त्या घरमालकाना सनदा वितरण करण्यात येत आहेत. मागच्या सरकारने 20 कलमी कार्यक्रमांतर्गत, गृहनिर्माण वसाहतीत जागा दिल्या. खासगी जमिनीत घरे बांधली. पण कायदेशीर कागदपत्रे नसल्याने ती नियमित झाली नाहीत असे सांगून गरजूंना घरे मिळेपर्यंत माझे घर योजना सुरू राहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. मडगाव रवींद्र भवनात काल माझे घरच्या लाभार्थ्यांना सनदा वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, सभापती गणेश गांवकर, बांधकाममंत्री दिगंबर कामत, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, जलसंपदामंत्री सुभाष फळदेसाई, आमदार अलेक्स सिक्वेरा, नीलेश काब्राल, उल्हास तुयेकर, आंतोन व्हाज, ॲलेक्स रेजिनाल्ड व सचिव संदीप जॅकीश उपस्थित होते.
तीन कलमी घोषणा
यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी तीन कलमी घोषणा केली. त्यात माझे घर योजना यापुढे गरजूंना घरे मिळेपर्यंत चालू राहणार आहे. गोव्यात रक्तदाब व मधुमेह यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यासाठी वैद्यकीय शिबिर घेऊन जागृती केली जाईल. तसेच हरित गोवा, स्वच्छ गोवा ही मोहीम आज 5 जून ते सप्टेंबरपर्यंत 90 दिवसांसाठी गोव्यात राबविण्यात येणार आहे. त्यासाठी दहा लाख झाडे लावण्यात येणार असल्याचे सांगितले.
माझा फ्लॅट योजना
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी, माझे घर या योजनेनंतर माझा फ्लॅट ही योजना तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले. फ्लॅटधारकांना त्यांचा मालकी हक्क मिळवून देण्यासाठी स्वतंत्र योजना करण्यात येणार असून या योजनची घोषणा लवकरच करण्यात येईल असे सांगितले.
बांधकाममंत्री कामत यांनी स्वागत केले. खासदार तानावडे, सिक्वेरा यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.

