(पुन्हा एकदा…)
- डॉ. सोमनाथ कोमरपंत
कविता सूत्रमय असते; म्हणून ती लक्षात राहते. ती मंत्रमुग्ध आहे; म्हणून ती भावमंत्रित करते. पण हे नेहमीच घडत नाही. ती अंतर्मुखही करते. हे सारे घडणे माणसाच्या मनोव्यापाराशी निगडित आहे; कवितेतून व्यक्त होणार्या भावनाशयावर अवलंबून आहे.
कवित्वशक्ती ही निरोगी जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे. जीवनाची समग्रता तिच्यात सामावलेली आहे म्हणून ती मिताक्षरांतून बोलते. तिला सांगायचे असते खूप; पण ती बोलते थोडे. जीवन जगण्यासाठी ती सकारात्मक अनुभूती देते. अशा या कवितेकडे रसिक या नात्याने आपण सकारात्मक अनुभूतीने बघायला नको का? कविता करणे म्हणजे रिकामपणाचा उद्योग असा काही लोकांचा दृष्टिकोन असतो. तो बरोबर आहे का? कवितेत विचारांची ठिणगी असते. विचार हा आचाराला प्रेरणा देतो. आचारामुळे जीवनात अनेकांकडून अचाट कार्ये घडत असतात. हे जर सत्य मानले तर कविता करणे, कविता वाचणे आणि तिचा मनःपूत आस्वाद घेणे या तिन्ही क्रिया म्हणजे केवळ शब्दनिष्ठ स्वरूपाच्या प्रक्रिया राहत नसून जीवनपोषक मूलद्रव्यांची उपासना करण्याचा तो एक मार्ग आहे असे म्हणता येईल.
कवितेची व्यक्त होण्याची रीत मात्र निराळी आहे. कवितेतील विचार बाणासारखा सरळ येऊन घुसत नाही. तो वाहत्या वार्याची, वाहत्या पाण्याची, सळसळत्या शेताची, उंचावरून कोसळणार्या अनेकप्रवाही, अनेक वळणावाकणांच्या प्रपातासारखा आणि शरीरातून वाहणार्या चैतन्यमय रक्ताची लय घेऊन आलेला असतो. कवितेच्या व्याख्या तर अगणित आहेत. त्यातही थॉमस कार्लाईलची ‘पोऍट्री इज म्युझिकल थॉट’ ही व्याख्या मनाला अधिक पटण्यासारखी. कविता सूत्रमय असते; म्हणून ती लक्षात राहते. ती मंत्रमुग्ध आहे; म्हणून ती भावमंत्रित करते. पण हे नेहमीच घडत नाही. ती अंतर्मुखही करते. हे सारे घडणे माणसाच्या मनोव्यापाराशी निगडित आहे; कवितेतून व्यक्त होणार्या भावनाशयावर अवलंबून आहे.
मौखिक परंपरेतदेखील माणूस गीतस्वरूप कविता ऐकण्यात रमत होता. ‘अंगाईगीत परिसुनि बाळ करिं झोपला’ अशी अनुभूती बहुतेक आयांना आली असेलच. अशाच अनामिक आयांच्या भावभावनांना आधुनिक काळात कवी-कवयित्रींनी आपल्या अंगाईगीतांतून शब्दरूप दिले असेल. वि. भि. कोलते आपल्या ‘अंगाई’ या कवितेत म्हणतात ः
काय झालं सोनुलीला
रडूं कशाचं डोळ्यांत
पोरक्या वासरावाणी
कशापायीं हा आकांत?
ये ग ये ग हम्मा ये ग
दुदू दे ग तान्हुलीला
राघो! पळत ये तूंहि
घाल वारा साळुंकीला
अशाच प्रकारच्या भावना भा. रा. तांबे यांच्या ‘अंगाईगीत’ या कवितेतील आईच्या तोंडून व्यक्त होतात ः
हम्मा ही, दूदू देउनि पाहीं
निजली गोठ्यांत
रे छबिल्या, राघूमैना निजल्या
अपुल्या पिंजर्यात
अशी अंगाईगीते ऐकत ऐकत मूल मोठे होते. तसेच त्याचे भावविश्वही मोठे होत जाते. जगाविषयीचे कुतूहल वाढते. त्याविषयीच्या भावना व्यक्त करणे हे कवींना आपले कर्तव्य वाटायला लागते. या भावविश्वात सूर्य, चंद्र, ग्रह, तारे आणि आकाश; त्याचप्रमाणे सभोवतालची सृष्टी कवीच्या काव्यरचनेतून शब्दांकित होते, त्यात बालमानसशास्त्राविषयीचा विचार अभिप्रेत असतो.
आजच्या आधुनिक जमान्यात शासनप्रणीत पाठ्यपुस्तकनिर्मिती मंडळ हे शिक्षणतज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक यांच्या साहचर्याने बालकांच्या बुद्धिविकासाचे तत्त्व ध्यानात घेऊन पाठ्यक्रम आखत असते. त्यात गद्य-पद्याचा समावेश त्यांच्या वयोगटानुसार केला जातो.
गतकाळातील पाठ्यपुस्तकनिर्मिती मंडळाने असे मुलांच्या बुद्धिविकासाचे कार्य केलेले आहे हे विहंगमावलोकन केल्यावर दिसून येते. पारतंत्र्याच्या काळातदेखील आपल्याकडच्या बुद्धिजीवी मंडळींनी गद्य-पद्य वेचे निवडताना प्रतिकूल परिस्थितीतदेखील राष्ट्रनिष्ठेचे बीजारोपण कसे केले याचे चित्र पाहण्यासारखे आहे. त्या काळाच्या संदर्भात विचार करताना हे असिधाराव्रत वाटते. दृढ पायावर ही कोनशिला बसविली गेली. त्यामुळे नंतरच्या पिढ्यांतील राष्ट्रभक्तीची ऊर्मी विकसित झाली. स्वातंत्र्याचे ध्येय दृष्टिपथात आणण्याचे कार्य त्या पिढीने केले. स्वातंत्र्योत्तर कालखंडात राष्ट्रनिर्माणाची प्रक्रिया सुरू झाली. या प्रक्रियेत भाषा आणि वाङ्मय यांचे कार्य किती महत्त्वाचे असते हे निराळ्या शब्दांत सांगण्याची आवश्यकता नाही. मुलांची मने घडविण्याचे कार्य भाषा आणि वाङ्मय करीत असते एवढे सांगितले तरी पुरे.
या दृष्टीने आचार्य अत्रे यांनी निर्माण केलेल्या ‘नवयुग वाचनमाले’ने क्रांतिकारक पाऊल उचलले. १९३३ सालापासून तत्कालीन मुंबई इलाखा सरकारने या मालेला मान्यता दिली. जुनाट क्रमिक पाठ्यपुस्तकांच्या जगतातून बाहेर काढून नव्या रसरशीत, आधुनिक साहित्याची ओळख प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांना करून देण्याचे श्रेय आचार्य अत्रे यांना जाते. मुलांच्या कोवळ्या मनाची पकड घेतील असे नादमधुर, तालबद्ध असे धडे या वर्गांसाठी तयार केले गेले. ‘आनंद’ मासिकाचे संपादक गोपीनाथ तळवलकर, प्रा. गं. भा. निरंतर, प्रिन्सिपॉल ग. ह. केळकर, रं. कृ. चिंचळकर, प्रा. वा. भा. पाठक आणि वि. द. घाटे या अनुभवसंपन्न व्यक्तींचा समावेश या मालेसाठी करून घेण्यात आला.
‘‘आज आम्ही जी उत्तम मराठी भाषा लिहू शकतो याचे कारण म्हणजे नवयुगवाचन माला,’’ असे उद्गार प्रख्यात कवी मंगेश पाडगावकर यांनी काढले. प्रख्यात कवयित्री प्रा. शांताबाई शेळके यांनीदेखील अशाच प्रकारच्या शब्दांत आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. मराठीतील ख्यातनाम समीक्षक डॉ. सुधा जोशी यांनी नवयुगवाचनमालेविषयी असेच प्रशंसोद्गार माझ्याशी बोलताना काढले. ‘सुभाषवाचनमाला’, ‘मंगलवाचनमाला’ इत्यादी मालांनी काही पिढ्यांच्या जडणघडणीचे असे मौलिक कार्य केले आहे. ‘नवयुग वाचनमाला’ निर्माण करण्यामागचा दृष्टिकोन आचार्य अत्रे यांच्या शब्दांतून संक्षेपाने समजून घेणे आवश्यक वाटते ः
‘‘ही माला लोकप्रिय होण्याचे मुख्य कारण म्हणजे, ती केवळ शालेय नाही; तर ती वाङ्मयीन दृष्टीने तयार केलेली आहे. मुलांची भाषा उत्तम व्हावी, त्यांच्या कल्पनेला चालना मिळावी, त्यांच्या नैसर्गिक जिज्ञासेचे समाधान व्हावे व त्यांच्या अनुभवाचे क्षेत्र विस्तीर्ण व्हावे, याच हेतूने या पुस्तकांतील गद्य व पद्य धड्यांची योजना केलेली आहे… पहिल्या दोन पुस्तकांतील बर्याच धड्यांची भाषा आपण जशी बोलतो तशीच योजलेली आहे; तीमुळे धडा वाचताना मुलांना एक प्रकारचा आपलेपणा वाटतो व त्यांच्या वाचनाची गती वाढते… स्वतंत्र भारतातील बालकांचा मनोविकास करण्याच्या हेतूने या मालेतील धडे तयार करण्यासाठी मुंबई सरकारने काही विषय दिले होते त्यांचा समावेश योग्य त्या ठिकाणी केलेला आहे. याशिवाय इतरही काही महत्त्वाच्या विषयांचा अंतर्भाव ज्या-त्या पुस्तकात करून मालेची उपयुक्तता वाढविण्याचा प्रयतन केला आहे.
एक विशेषत्वाने नमूद करण्यासारखी बाब म्हणजे ‘सह्याद्रीच्या पायथ्याशी’ हा मराठीतील पहिला प्रादेशिक कथांचा संग्रह प्रसिद्ध करणारे वि. स. सुखटणकर यांनी शैक्षणिक मूलतत्त्वांचे भान ठेवून ‘वासंती’ हा प्रातिनिधिक कवितासंग्रह प्रसिद्ध केला. त्याला आचार्य अत्रे यांनी स्वागतशील वृत्तीने अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली. (कर्हेचे पाणी, खंड- १लामध्ये ती समाविष्ट आहे.)
या पाठ्यपुस्तकनिर्मितीच्या प्रक्रियेला जोडून समांतरपणे झालेल्या शैक्षणिक प्रयोगाचा येथे आवर्जून उल्लेख करायला हवा. प्रा. श्री. बा. रानडे आणि गंगाधर देवराव खानोलकर या दोघांनी मिळून १९३५ ते १९३९ च्या दरम्यान ‘महाराष्ट्र रसवंती’चे तीन भाग आणि याच काळात ‘मराठी गद्यवैभव’चे तीन भाग प्रसिद्ध केले. क्रमिक पाठ्यपुस्तकापेक्षा या संपादनाचे उद्दिष्ट काहीसे निराळे होते. या दोन्ही व्यक्ती आपापल्या क्षेत्रात निष्णात होत्या. प्रा. श्री. बा. रानडे हे सूक्ष्मजीवशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. पुण्याला १९२२ मध्ये स्थापन झालेल्या ‘रविकिरणमंडळा’चे ते अध्वर्यू होते. त्यांचा आणि त्यांच्या पत्नी सौ. मनोरमा रानडे यांच्या कवितांचा समावेश असलेला ‘श्री-मनोरमा’ हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. गं. दे. खानोलकर यांना शांतिनिकेतनमध्ये रवींद्रनाथांचा सहवास आणि मार्गदर्शन लाभले. ‘अर्वाचीन मराठी वाङ्मयसेवक’ हा सहा खंडांचा चरित्रकोश त्यांनी साकार केला. रवींद्रनाथांचे बृहद् चरित्र पुढील कालखंडात लिहिले. त्यांचे वाङ्मयीन कर्तृत्व चौफेर स्वरूपाचे आणि स्तिमित करणारे आहे. ‘महाराष्ट्र-रसवंती’ संपादन करण्यामागची भूमिका संपादकांनी अशी मांडली आहे- ‘‘समान विचारपद्धती, समान घडण व समान स्वरूप असलेल्या कवितांचा एक-एक स्वतंत्र विभाग पाडून, त्यांतील संगीत, सौंदर्य, कल्पनाविलास, कलाचातुर्य व भाषेच्या झिरझिरीत पडद्यामागून वाहणारे भावनांचे व विचारांचे प्रवाह यांचा मनोरंजक रीतीने परिचय करून देण्याचा यात प्रयत्न केला आहे.’’ संक्षेपाने सांगायचे झाल्यास अभिवृत्ती आणि अभिरूची घडविण्याचे हे दर्जेदार व्यासपीठ त्यांनी निर्माण केले होते.
- यांतील गद्य-पद्य वेच्यांचा परामर्श रसग्रहणाच्या स्वरूपात यापुढे घ्यायचा आहे.