26.1 C
Panjim
Friday, June 25, 2021

गद्दार

आपल्या देशात गद्दारांची कधीच कमी नव्हती. पोरसाच्या विरुद्ध अलेक्झांडरला मदत करणारा राजा अंभी असो, पृथ्वीराज चौहानाच्या विरुद्ध महंमद घोरीची मदत करणारा जयचंद असो, रायगडच्या पाडावात मोगलांना साह्य करणारा सूर्याजी पिसाळ असो, अथवा बंगालच्या सिराज उद दौला नबाबाच्या विरुद्ध ब्रिटिशांना मदत करणारा आणि त्यांच्या वसाहतवादाला भारतात पाय रोवू देणारा मीर जाफर असो, वेगवेगळ्या काळामध्ये अशा फितुरांनी आणि गद्दारांनी दगाबाजी केली आणि त्याची जबर किंमत आपल्या देशाला चुकवावी लागली. आजही अशा दगाबाजांची देशात कमी नाही. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसमवेत रंगेहाथ पकडला गेलेला डीएसपीसारख्या वरिष्ठ पदावरील पोलीस अधिकारी देविंदरसिंग हाही त्यातलाच एक. हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर नावीद आणि इतर दोघा दहशतवाद्यांना जम्मूमार्गे दिल्लीपर्यंत पोहोचवण्यास मदत करीत असताना हा देविंदरसिंग रंगेहाथ पकडला गेला. त्याने आपल्या घरी दहशतवाद्यांना शस्त्रांनिशी आश्रय दिल्याचेही आढळले. काही लाख रुपयांच्या मोबदल्यात हा देविंदरसिंग दहशतवाद्यांची मदत करीत होता असे प्रथमदर्शनी जरी दिसत असले, तरी हे प्रकरण वाटते तेवढे साधे नसावे. संसदेवरील हल्ल्याच्या प्रकरणात फाशी गेलेल्या अफझल गुरूने आपण शरणागती पत्करल्यानंतर याच देविंदरसिंगने आणि त्याच्या चेल्यांनी आपला खंडणीसाठी छळ केल्याचा आणि दहशतवाद्यांना मदत करायला लावल्याचा आरोप आपल्या वकिलाला लिहिलेल्या पत्रामध्ये केलेला होता. दुर्दैवाने तेव्हा त्या आरोपाची शहानिशा झालीच नाही. उलट या देविंदरसिंगला पुढे राष्ट्रपती पदक आणि बढतीही मिळाली. मात्र, आता त्याचा खरा चेहरा समोर आलेला आहे. देविंदरसिंग यानेच आपल्याला संसद हल्ल्यातील एक सूत्रधार महंमद याला दिल्लीत नेण्यास व भाड्याचे घर मिळवून देण्यास भाग पाडले होते असे अफझल गुरूने वकिलाला २०१३ साली लिहिलेल्या पत्रामध्ये नमूद केलेले आहे. त्यावर तेव्हा कोणी विश्वास ठेवला नाही, परंतु जर ते खरे असेल तर फाशी गेलेल्या अफझल गुरूच्या जागी हा देविंदरसिंग आधी असायला हवा होता असे वाटल्याखेरीज राहात नाही. अर्थात, अफझल गुरूच्या आरोपांत तेव्हाच तथ्य आढळले असते तरी देखील त्याची फाशी टळली नसतीच, कारण त्याला झालेली फाशीची शिक्षा ही सबळ पुराव्यांअंतीच झालेली आहे असे फाशीचा तो निवाडा देणारे न्या. एस. एन. धिंग्रा यांनी म्हटले आहे. केवळ पैशाच्या लोभाने दहशतवाद्यांना एवढी सरेआम मदत करण्याएवढा हा अधिकारी बेअक्कल असेल असे वाटत नाही. हे सारे नेमके काय प्रकरण आहे त्याच्या अधिक खोलात जाण्याची त्यामुळे आवश्यकता आहे. पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झाला तेव्हा तो तेथे तैनात होता. त्यामुळे पुलवामा हल्ल्यासंदर्भात याची नेमकी भूमिका काय राहिली त्याचाही कसून तपास झाला पाहिजे. देविंदरसिंग हा एकमेव गद्दार आहे की आर्थिक प्रलोभनापोटी देशाशी गद्दारी करणारे असे अनेकजण काश्मीरमध्ये वर्दीआड लपलेले आहेत याची शहानिशाही झाली पाहिजे. काश्मीरमध्ये दहशतवाद फैलावत गेला तेव्हा त्याची पहिली झळ खरे तर तेथील पोलीस दलाला बसली. अनेक कर्तव्यनिष्ठ पोलिसांवर हल्ले झाले. सुटीवर घरी आले असता त्यांच्या कुटुंबियांसमक्ष त्यांना ठार मारले गेले. तरीही विलक्षण धैर्याने आणि शौर्याने काश्मीरमधील पोलीस दल दहशतवाद्यांसमोर छातीचा कोट करून उभे आहे. लष्कर किंवा निमलष्करी दल काश्मीरमध्ये तैनात आहे, परंतु त्यांचे कुटुंबीय कडेकोट सुरक्षेतील लष्करी वा निमलष्करी छावण्यांमध्ये वास्तव्यास असतात, त्यामुळे सुरक्षित असतात. पोलिसांचे तसे नसते. त्यांचे घर, कुटुंबीय हे नागरी वस्तीत असल्याने त्यांना कोणी वाली नसतो. त्यामुळे दहशतवाद्यांच्या धमक्या, हल्ले या भीतीदायक वातावरणातही आपली कर्तव्यनिष्ठा बजावणे हे सोपे नाही. काश्मीरमध्ये अशी कर्तव्यनिष्ठा बजावणार्‍या पोलिसांच्या या धैर्याच्या पार्श्वभूमीवर देविंदरसिंग सारखा एखादा गद्दार जेव्हा निपजतो, तेव्हा त्यातून समस्त पोलीस दलाच्या निष्ठेवरच निर्माण होणारे प्रश्नचिन्ह त्या निष्ठावंतांना निश्‍चितच वेदना देणारे ठरेल. देविंदर आणि त्याच्यासारख्या लोभी, आपमतलबी आणि देशाशी काहीही देणेघेणे नसलेल्या गद्दारांचे जाळे हुडकून काढून त्यांचा पर्दाफाश करण्यासाठी आता गुप्तचर आणि तपासयंत्रणांनी मिळून काश्मीरमध्ये मोठे छापासत्र सुरू केलेले आहे. त्यातून या सार्‍या हितसंबंधांचा पर्दाफाश होईल अशी आशा आहे. या गद्दाराला काश्मीर पोलिसांनीच पाळत ठेवून रंगेहाथ पकडले आहे हे लक्षात घेणे जरूरी आहे. त्यामुळे या घटनेच्या निमित्ताने जम्मू काश्मीर पोलिसांचे मनोबल खच्ची करण्याचे प्रयत्न होता कामा नयेत. मात्र, वर्दीच्या आड दडलेल्या आणि आर्थिक लोभापायी असो अथवा अन्य कारणांसाठी असो, भारतविरोधी शक्तींना मदत करणार्‍यांना हुडकून काढून त्यांचा बंदोबस्त करणे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने आज काळाची गरज बनली आहे.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

सुस्तावाल तर पस्तावाल!

कोरोनाची अत्यंत प्राणघातक ठरलेली दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचे आशादायक चित्र एकीकडे दिसत असतानाच दुसरीकडे कोरोना विषाणूचे ‘डेल्टा प्लस’ हे नवे व...

आता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’चा धोका

>> केंद्र सरकारचा महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेशला इशारा >> देशभरातील २८ पैकी महाराष्ट्रात २१ रुग्ण कोरोनाच्या दुसर्‍या...

लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा : लोबो

गोव्यात एकदा संचारबंदी हटवल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू होणार आहे. अशावेळी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांना राज्यात...

सीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच

>> सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय...

राज्यात कोरोना बळींची संख्या तीन हजारांपार

>> चोवीस तासांत ११ मृत्यू, ३०३ नवे बाधित राज्यात कोरोना विषाणमुळे काल मंगळवारी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात...

ALSO IN THIS SECTION

सुस्तावाल तर पस्तावाल!

कोरोनाची अत्यंत प्राणघातक ठरलेली दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचे आशादायक चित्र एकीकडे दिसत असतानाच दुसरीकडे कोरोना विषाणूचे ‘डेल्टा प्लस’ हे नवे व...

विरोधक एकत्र येणार?

‘जो मै बोलता हूँ, वो मै करता हूँ, जो मै नही बोलता वो तो डेफिनेटली करता हूँ’ हा हिंदी चित्रपटातील संवाद ज्यांना...

स्वातंत्र्याचा हुंकार!

बरोबर ७५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी संध्याकाळी ठीक चार वाजता ह्या गोमंतकामध्ये एक चमत्कार घडला. एक अशी गोष्ट घडली जी कोणी कधी पाहिली...

कॉंग्रेसी सुंदोपसुंदी

कॉंग्रेस पक्षाचे गोवा प्रभारी दिनेश गुंडुराव आज गोवा दौर्‍यावर येत आहेत. राज्य विधानसभेची निवडणूक आता आठ महिन्यांवर आली असल्याने कॉंग्रेस पक्षाला त्यासाठी...

विझलेला चिराग

राजकारण हे कोणत्या थराला जाऊ शकते आणि रक्ताच्या नात्यावरही कसे मात करू शकते त्याचा दाहक प्रत्यय सध्या स्व. रामविलास पास्वान यांचे चिरंजीव...