हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज
मागचे दोन-तीन दिवस विश्रांती घेतल्यानंतर आता गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर राज्यात परत एकदा जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. आज सोमवारी दि. 25 ते गुरूवार दि. 28 ऑगस्ट असे पुढील चार दिवस राज्यातील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. दि. 25 ते दि. 28 ऑगस्ट या काळात हवामान खात्याने राज्यात एलो अलर्टचा इशारा दिला आहे. तर 29 ऑगस्टनंतर पाऊस कमी होण्याची शक्यता व्यक्त करताना ग्रीन अलर्टचा इशारा दिलेला आहे. मागचे काही दिवस पाऊस कमी झाल्याने लोकांना चतुर्थीसाठीची खरेदी करताना पावसाचा अडथळा झाला नव्हता. चतुर्थीच्या काळातही पाऊस कमी होईल अशी लोकांची अपेक्षा होती. मात्र, हवामान खात्याने पावसाची शक्यता केल्याने भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे.
सध्या गोवाभरात सगळीकडेच चतुर्थीसाठीचा बाजार भरलेला असून सणासुदीसाठीची खरेदी चालूच आहे. उद्यापासून या खरेदीला आणखी वेग येणार आहे. सणासुदीसाठीचे कपडेलत्ते, सजावटीसाठीचे सामान, रोषणाईसाठीचे सामान, माटोळीचे सामान, स्वयंपाकासाठीची कडधान्ये, तेल-तूप, साखर, गुळ असे सामान आणायचे आहे. पाऊस कोसळल्यास खरेदीच्यावेळी अडचण होणार असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, गेल्या 24 तासांत पेडणे सोडल्यास राज्यात अन्य भागांत अल्प असा पाऊस कोसळला. पेडण्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळला. पेडण्यात सर्वाधिक 17.8 मी.मी., एला (जुने गोवे) : 13.2 मी.मी., सांगे : 12.2 मी.मी., फोंडा : 10.8 मी.मी., मुरगाव : 10.8 मी.मी., पणजी : 10.6 मी.मी., मडगाव : 9.1 मी.मी., म्हापसा : 6 मी.मी., धारबांदोडा : 5.40 मी.मी., काणकोण : 4.2 मी.मी., तर दाबोळी : 3.2 मी.मी. एवढा पाऊस कोसळला.
मात्र, आता पुढील चार दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

