गणेशोत्सवापूर्वी राज्य खड्डेमुक्त करणार

0
6

>> मुख्यमंत्र्यांचा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांना आदेश; खड्ड्यांमुळे अपघात घडल्यास अभियंते जबाबदार

गणेशचतुर्थी हा राज्यातील सर्वात मोठा सण असून, हा सण सुरू होण्यापूर्वी राज्यातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचा आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांना काल बैठकीत दिला. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात घडल्यास त्यासाठी संबंधित विभागाच्या अभियंत्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही यावेळी मुख्यमंत्र्यानी दिला. ज्या कंत्राटदारांनी निकृष्ट दर्जाचे काम केले आहे, अशा सुमारे 100 रस्ता कंत्राटदारांना नोटिसा बजावल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

यंदा कोसळलेल्या जोरदार पावसामुळे राज्यातील बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले असून, वाहने चालवणे जोखमीचे झाले आहे. या खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटनाही घडत आहेत. या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्र्यांनी अभियंत्यांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक सूचना केल्या. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सहाय्यक अभियंत्यांपासून प्रधान मुख्य अभियंत्यांपर्यंत सर्व अधिकारी हजर होते. तसेच पोलीस खात्याचे काही अधिकारी देखील हजर होते.

कुठल्या कुठल्या भागांतील रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे व नजीकच्या काळात कोणकोणत्या ठिकाणी प्राधान्यक्रमाने कामे हाती घेण्याची आवश्यकता आहे, याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांकडून मिळवली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी बैठकीतील सर्व तपशील पत्रकारांना दिले.
रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम केलेल्या कंत्राटदारांना जशा नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत, तशाच नोटीसा यापुढे अभियंत्यांनाही बजावण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

पाऊस ओसरल्यानंतर रस्त्यांच्या हॉटमिक्सचे काम हाती घेतले जाईल. कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले, तर कंत्राटदाराकडून त्याच्या खर्चातून तेच काम पुन्हा करून घेतले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. याबाबत कोणाचीही गय केली जाणार नसून, संबंधित अभियंत्यालाही जबाबदार धरले जाईल. खड्ड्यांमुळे अपघात झाले तर त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

‘इंटिग्रेटेड मॅनेजमेंट सिस्टम’ लागू होणार

1 ऑक्टोबरपासून राज्यात ‘इंटिग्रेटेड मॅनेजमेंट सिस्टम’ लागू होणार आहे. परिणामी राज्यात कुठे किती किलोमीटरचा रस्ता बांधण्यात आला आणि तो कधी बांधण्यात आला होता व ते कंत्राट कुणाला मिळाले होते, तसेच त्या कामाची पाहणी कोणत्या अभियंत्याने केली होती, या सर्व गोष्टींची नोंद होणार असून काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे आढळून आल्यास कंत्राटदाराबरोबरच अभियंत्यांनाही जबाबदार धरण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या व्यवस्थेमध्ये सर्व खात्यांना सहभागी करून घेतले जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.