गोवा हस्तकला, ग्रामीण आणि लघू उद्योग विकास महामंडळाने मातीच्या गणेशमूर्ती बनविणाऱ्या स्थानिक कारागिरांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ केली आहे. यापूर्वी एका मूर्तीसाठी 100 रुपये अनुदान दिले जात होते, त्यात आणखी 100 रुपयांची वाढ करून आता एका मूर्तीसाठी 200 रुपये आर्थिक साहाय्य केले जाणार आहे.
राज्य सरकारच्या गोवा हस्तकला महामंडळाकडून दरवर्षी मातीच्या गणेश मूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांना आर्थिक साहाय्य केले जाते. एका कारागिराला जास्तीत जास्त 250 मूर्तींसाठी अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या राज्यातील कारागिरांनी आर्थिक मदतीसाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन महामंडळाने केले आहे.
मातीच्या पारंपरिक गणेशमूर्ती बनवण्याला प्रोत्साहन देणे, प्राचीन कला जतन करणे आणि गोव्यातील प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरील बंदीच्या अंमलबजावणीला सहकार्य करण्यासाठी ही योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत, नोंदणीकृत कारागिरांना किमान एक फूट उंचीच्या प्रत्येक मातीच्या मूर्तीसाठी 200 रुपये अनुदान दिले जाणार आहे. मात्र, एका कारागिरासाठी जास्तीत जास्त 250 मूर्तींपर्यंतच हे अनुदान मिळेल. अनुदानाचे वाटप प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर केले जाईल. या योजनेच्या अर्जाचे नमुने 24 जून ते 24 जुलै या कालावधीत 50 रुपये शुल्कावर पाटो-पणजी येथील हस्तकला महामंडळाचे मुख्य कार्यालय आणि मडगाव येथील ‘अपरांत एम्पोरियम’ येथे उपलब्ध असणार आहेत.

