गणेशभक्तांनो… ऐका एवढं!

0
13
  • वर्धा विलास हरमलकर,

भांडोळ

तुम्ही माझ्यासमोर उभं राहून म्हणता, गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! तुमच्या घोषणांनी आकाश दणाणून जातं. पण विसर्जनाच्या दिवशी तेच आकाश ध्वनिप्रदूषणाने हादरलेलं असतं. माझ्या नावाने सुरू झालेली भक्ती काही तासांतच उन्मादात बदललेली दिसते. माझ्या मनात तेव्हा एकच प्रश्न निर्माण होतो, हा उत्सव माझा आहे की तुमच्या मनमानीचा?

“मी पुन्हा आलोय… पण यंदा काही बोलायचं आहे!”
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनो,
तुमच्या गणपती बाप्पाचा सप्रेम नमस्कार!
दरवर्षीप्रमाणे यंदाही तुम्ही माझ्या आगमनाची तयारी करत असाल. कुठे मंडप उभा राहत असेल, कुठे सजावट सुरू असेल, कुठे वर्गणी गोळा होत असेल, तर कुठे माझ्या स्वागतासाठी ढोल-ताशांचा सराव सुरू असेल. काही जण रात्रभर जागून माझ्या आगमनासाठी मेहनत घेत असतील. हे सगळं मी पाहतो आणि मनापासून आनंदीही होतो. तुमचं प्रेम मी प्रत्येक वर्षी अनुभवतो. कोणी माझ्यासाठी देखणी मूर्ती घडवतो, कोणी सुंदर आरास करतो, कोणी महाप्रसादाचं आयोजन करतो, कोणी रक्तदान शिबिर भरवतो, कोणी गरजूंना मदतीचा हात देतो, काही मंडळं पर्यावरणाचा संदेश देतात, काही व्यसनमुक्तीची जनजागृती करतात. ही सगळी कामं पाहून मला समाधान वाटतं कारण भक्ती फक्त आरतीत नसते, ती समाजासाठी केलेल्या कार्यातही असते.

पण लेकरांनो… यंदा मी तुमच्याकडे फक्त आशीर्वाद द्यायला आलो नाही. आज मला काही प्रश्न विचारायचे आहेत. काही गोष्टी मनमोकळेपणाने सांगायच्या आहेत. कारण गेली काही वर्षं माझ्या मनात एक वेदना साचत गेली आहे. तुम्ही माझ्यासमोर उभं राहून म्हणता, गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! तुमच्या घोषणांनी आकाश दणाणून जातं. पण विसर्जनाच्या दिवशी तेच आकाश ध्वनिप्रदूषणाने हादरलेलं असतं. माझ्या नावाने सुरू झालेली भक्ती काही तासांतच उन्मादात बदललेली दिसते. माझ्या मनात तेव्हा एकच प्रश्न निर्माण होतो, हा उत्सव माझा आहे की तुमच्या मनमानीचा? तुम्हाला आठवतं का, मी सार्वजनिक उत्सवात कसा आलो? मी तर प्रत्येक घरात सुखाने विराजमान होतो. घराघरांत माझी पूजा व्हायची. पण एक माणूस पुढे आला. त्याने मला घराबाहेर आणलं, समाजाच्या मध्यभागी आणलं. ती महनीय व्यक्ती म्हणजे बाळ गंगाधर टिळक होय.

त्यांनी मला समाजाच्या मध्यभागी आणलं ते माझी कीर्ती वाढवण्यासाठी नव्हे तर राष्ट्र जागं करण्यासाठी. ब्रिटिश सरकारने सभा, संमेलने, राजकीय चर्चा यांवर निर्बंध घातले होते, लोक विखुरले होते, समाजात जातिभेदाची दरी होती. अशा वेळी टिळकांनी विचार केला, जिथे धर्माच्या नावाने लोक सहज एकत्र येतात, तिथे समाजजागृतीचं बीज पेरलं पाहिजे आणि म्हणून सार्वजनिक गणेशोत्सवाचा जन्म झाला. त्या मंडपात केवळ आरती होत नव्हती, तिथे देशभक्ती जागवली जात होती, व्याख्यानं होत होती, स्वराज्याची स्वप्नं रंगवली जात होती. समाज एकत्र येत होता. युवक घडत होते. मी त्या काळात हजारो तरुणांच्या डोळ्यांत स्वातंत्र्याची ज्योत पाहिली होती. आज त्याच तरुणांच्या हातात मला काय दिसतं? एका हातात माझा भगवा ध्वज आणि दुसऱ्या हातात दारूची बाटली. हे पाहून माझं मस्तक खाली झुकतं.

मंडळांनो, अकरा दिवस तुम्ही माझी इतकी मनापासून सेवा करता. सकाळ-संध्याकाळ आरती करता, दुर्वा अर्पण करता, मोदक अर्पण करता, मला विघ्नहर्ता म्हणता. पण अकराव्या दिवशी माझ्या निरोपाची वेळ आली की अचानक सगळंच बदलतं. माझ्या मिरवणुकीच्या मागे काही चारचाकी गाड्या लागतात. त्या गाड्यांमध्ये काय असतं? प्रसाद? नाही, पिण्याचं पाणी? नाही, आपत्कालीन वैद्यकीय सुविधा? नाही, मग काय असतं? दारूच्या बाटल्या आणि त्या संपत जातात तसं विवेकही संपत जातो. माझ्यासमोर नतमस्तक होणारे काही युवक काही वेळातच मद्यधुंद होऊन रस्त्यावर नाचू लागतात. ते नाचतात पण भक्तीत नाही, ते ओरडतात पण घोषणांत नाही, ते धिंगाणा घालतात आणि त्याला नाव देतात गणेशोत्सवाची मजा! ही मजा आहे की माझ्या उत्सवाची विटंबना? माझ्या डोळ्यांत डोळे घालून एकदा प्रामाणिकपणे उत्तर द्या. मी कधी सांगितलं होतं का की माझ्या नावावर दारू प्या? मी कधी सांगितलं होतं का की डीजेच्या कर्णकर्कश आवाजात स्वतःचं भान हरपून नाचा? मी कधी सांगितलं होतं का की भक्तीपेक्षा उन्माद मोठा आहे? जर नाही, तर मग हे कोणासाठी? माझ्यासाठी? की स्वतःच्या हौसेसाठी? जर तुमची हौस भागवायची असेल, तर माझं नाव कशाला वापरता? माझ्या नावाने सुरू होणाऱ्या उत्सवाचा शेवट माझ्याच अपमानाने का करता? मी विघ्नहर्ता आहे. माझ्या नावावर विघ्न निर्माण करणारा नाही. मी बुद्धीची देवता आहे. माझ्या नावावर बुद्धी गहाण ठेवणारा नाही.

तुमच्यापैकी काहींना कदाचित माझे शब्द टोचले असतील. काहींना रागही आला असेल. काहींनी मनात म्हटलं असेल, बाप्पा, एवढं कठोर का बोलतोस? आज मी तुम्हाला एकच सांगतो… जिथे प्रेम असतं, तिथेच रागही असतो. आई आपल्या लेकराला ओरडते, कारण तिला त्याचं भविष्य प्रिय असतं. गुरू शिष्याला शिक्षा करतो, कारण त्याला शिष्य घडवायचा असतो आणि आज मी तुम्हाला जाब विचारतो आहे, कारण तुम्हीच माझ्या उत्सवाचे खरे शिलेदार आहात.

तुम्ही कधी विचार केलात का… विसर्जन या शब्दाचा अर्थ काय आहे? विसर्जन म्हणजे फक्त मूर्ती पाण्यात सोडणे नाही. विसर्जन म्हणजे अहंकाराचं विसर्जन, वाईट विचारांचं विसर्जन, व्यसनांचं विसर्जन, क्रोधाचं विसर्जन, लोभाचं विसर्जन, माझी मूर्ती पाण्यात जाते पण तुमच्यातील दोषही त्याच दिवशी वाहून गेले पाहिजेत. दुर्दैवाने आज चित्र उलटं दिसतं. माझी मूर्ती पाण्यात जाते पण व्यसनं मात्र समाजातच राहतात. माझं विसर्जन होतं पण विवेकाचंही विसर्जन होतं. हे पाहून माझं मन अस्वस्थ होतं. मला सांगा, विसर्जनाची मिरवणूक सुरू झाल्यावर माझ्या मागे चालणाऱ्या प्रत्येक युवकाच्या डोळ्यांत भक्ती असते का? की नशा? हात जोडलेले असतात का? की हवेत बाटल्या उंचावलेल्या असतात? माझ्या नावाचा जयघोष असतो का? की डीजेच्या कर्णकर्कश आवाजात तोही हरवून गेलेला असतो? तुम्हीच उत्तर द्या. आता एक गोष्ट सांगतो. लोकमान्य टिळकांनी मला सार्वजनिक उत्सवात आणलं तेव्हा त्यांचं स्वप्न काय होतं? त्यांना असा गणेशोत्सव हवा होता जिथे विचारांची देवाणघेवाण होईल, जिथे समाज एकत्र येईल, जिथे युवक राष्ट्रासाठी तयार होतील, जिथे संस्कृती जपली जाईल. आज अनेक मंडळं तेच काम करत आहेत. मला त्यांचा अभिमान आहे. पण विसर्जनाच्या दिवशी काही तासांतच सगळ्या वर्षभराच्या चांगल्या कामांवर पाणी फिरतं कारण लोकांना काय आठवतं? रात्रीचा धिंगाणा, दारू पिऊन नाचणारे युवक, रस्त्यावरचा गोंधळ आणि मग संपूर्ण मंडळावर बोट ठेवलं जातं. काही मोजक्या लोकांच्या चुकीमुळे संपूर्ण मंडळाची प्रतिमा मलीन होते. याचा विचार कधी केलात?
आणखी एक प्रश्न, माझं विसर्जन मध्यरात्रीच का? परंपरेत कुठे लिहिलं आहे की पहाटे दोन वाजेपर्यंत डीजे वाजवायचा? कुठल्या धर्मग्रंथात लिहिलं आहे की रुग्ण, वृद्ध, लहान मुलं, विद्यार्थ्यांची झोप मोडली तरी चालेल? माझ्या भक्तीचा अर्थ दुसऱ्यांना त्रास देणं आहे का? नाही. भक्ती म्हणजे दुसऱ्याच्या वेदनेची जाणीव. मला पुण्यातील मानाच्या गणपतींच्या मिरवणुका पाहायला आवडतात. लाखो लोक असतात. उत्साहही असतो. ढोल-ताशांचाही नाद असतो. पण… तिथे शिस्त असते. प्रत्येक गणपतीची वेळ ठरलेली, मार्ग ठरलेला, जबाबदाऱ्या निश्चित, कोण आधी आणि कोण नंतर याचा स्पष्ट क्रम म्हणून लाखो लोक असूनही मिरवणूक सुरळीत पार पडते. मग मला प्रश्न पडतो… गोवा, कोकण आणि इतर भागातील मंडळांनो, शिस्त तुमच्याकडे का येऊ शकत नाही? तुमच्याकडे श्रद्धा आहे, उत्साह आहे. मग शिस्त का नाही? तुम्ही ठरवलंत तर विसर्जन वेळेत होणार नाही का? तुम्ही ठरवलंत तर दारूबंदी होणार नाही का? तुम्ही ठरवलंत तर डीजेचा अतिरेक थांबणार नाही का? हे सगळं शक्य आहे. फक्त इच्छा हवी, निर्णय हवा आणि नेतृत्व हवं.

आता तुमच्यापैकी काही जण म्हणतील, बाप्पा, वर्षातून एकदाच तर असं करतो. काही म्हणतील मग मजा करायचीच नाही का? माझं उत्तर अगदी स्पष्ट आहे. मजा करा. पण माझ्या नावावर नाही. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काय करायचं हा तुमचा निर्णय असू शकतो. पण धार्मिक उत्सवाला मद्यपानाचं निमित्त बनवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? मी दिला? शास्त्रांनी दिला? संस्कृतीने दिला? की तुमच्या मनाने? माझ्या नावावर जर पाप केलं, तर त्याला भक्ती म्हणता येत नाही. तुम्ही मला विघ्नहर्ता म्हणता मग माझ्याच मिरवणुकीत विघ्न का निर्माण करता? रस्त्यावर भांडणं, दारूच्या नशेत अपघात, महिलांना होणारा त्रास, शिवीगाळ, धक्काबुक्की, वाहतूक कोंडी, रुग्णवाहिका अडकतात, लहान मुलं घाबरतात, वृद्ध त्रास सहन करतात आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात मथळा येतो ‘गणेश विसर्जन मिरवणुकीत गोंधळ.’ तो मथळा वाचताना माझी मान खाली जाते. कारण त्यात माझं नाव असतं. मला अजून एक गोष्ट विचारायची आहे. तुम्ही दारू पिऊन नाचता तेव्हा तुमच्या घरच्यांचा कधी विचार करता? तुमची आई घरात माझ्यासमोर दिवा लावून बसलेली असते. तुमच्या सुखासाठी प्रार्थना करत असते आणि तिचाच मुलगा माझ्या नावावर नशेत रस्त्यावर लोळत असतो. आईला काय वाटत असेल? वडिलांना काय वाटत असेल? तुमच्या लहान भावाने किंवा बहिणीने ते पाहिलं तर? तेही उद्या तेच शिकणार नाहीत का? लक्षात ठेवा… समाज उपदेशाने कमी आणि उदाहरणाने जास्त शिकतो. तुम्ही जर माझ्या मिरवणुकीत शिस्त दाखवली तर पुढची पिढी शिस्त शिकेल. तुम्ही जर व्यसन दाखवल तर पुढची पिढी व्यसनच शिकेल. आज सोशल मीडियावर तुमचे व्हिडिओ व्हायरल होतात. कोणी नशेत नाचत असतो. कोणी बाटली हातात घेऊन घोषणा देत असतो. कोणी बेशुद्ध पडलेला असतो आणि त्याखाली लिहिलेलं असतं गणपती बाप्पा मोरया!

माझ्या लेकरांनो… त्या व्हिडिओत मोरया असतो पण भक्ती नसते. माझ्या नावाने घोषणा देणं सोपं आहे. माझे विचार जगणं कठीण आहे. मी बुद्धीचा देव आहे. विवेकाचा देव आहे. संयमाचा देव आहे. माझ्यासमोर नारळ फोडण्यापेक्षा स्वतःच्या वाईट सवयी फोडा. मोदक अर्पण करण्यापेक्षा आई-वडिलांचा सन्मान करा. मोठे स्पीकर लावण्यापेक्षा मोठे विचार मनात ठेवा. तेव्हाच माझी पूजा पूर्ण होईल.
आज माझ्या नावावर हजारो युवक रस्त्यावर उतरतात. त्यांच्याकडे समाज पाहतो. लहान मुलं त्यांचं अनुकरण करतात. जर त्या मुलाला दिसलं गणपतीच्या मिरवणुकीत दारू पिणं चालतं तर उद्या तोही तेच करणार. मग दोष कोणाचा? त्या मुलाचा? की त्याला चुकीचं उदाहरण दाखवणाऱ्यांचा? म्हणूनच मंडळांनो, तुमची जबाबदारी फक्त उत्सव साजरा करण्याची नाही. पुढची पिढी घडवण्याची आहे. आज तुम्ही जे दाखवाल उद्या समाज तेच जगेल. म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारा आपण गणेशोत्सव साजरा करतो आहोत की गणेशोत्सवाचा बाजार मांडतो आहोत? मी उत्तराची वाट पाहतो आहे कारण अजूनही मला माझ्या लेकरांवर विश्वास आहे. तुम्ही बदलू शकता. तुम्ही समाज बदलू शकता. तोपर्यंत… माझ्या आरतीतील एक ओळ आठवा संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे. मी संकटातून बाहेर काढतो पण संकट निर्माण करण्याची परवानगी कधीच दिलेली नाही.

तुमचाच,
गणपती बाप्पा