गणपती गेले गावाला… चैन पडेना आम्हाला!

0
69
  • पौर्णिमा केरकर

गणपती कधी येतो आणि कधी जातो कळतही नाही, एवढे त्याच्या सरबराईत आपण व्यस्त राहतो. आज सात दिवसांचे बाप्पा आपल्या गावाला चालले आहेत. त्यांच्याशिवाय काही दिवस तरी चैन पडणार नाही. पाच, सात दिवस त्यांच्या सहवासात राहून त्यांची जणू घराला सवयच होते. त्याचे विसर्जन धामधुमीत करून उत्साहाचा झरा अखंडितपणे वाहता ठेवला जातो. ही ऊर्जा पुढे वर्षभर येऊ घातलेल्या संकट-समस्यांवर मात करण्यासाठी पुरेशी ठरते!

श्रावण मास संपला, भाद्रपदाची सुरुवात झाली आणि ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहात होतो तो चवथीचा दिवस आला… श्रीगणेशाला पूजले-भजले… आरत्या, भजन, फुगड्यांत दिवस अगदी धुंद झाले…. रात्री फुलून गेल्या… तनामनावरची त्याची धुंदी पुरेशी उतरलीच नाही आणि त्याच्या विसर्जनाचा दिवस जवळ आला… आणि मग मनात कालवाकालव सुरू झाली. चवथीच्या सणाचे पाच, सात दिवस कसे कापरासारखे भुर्रकन उडून गेले कळलेच नाही! काहीही म्हणा, तो येणार येणार म्हणून महिन्याभरापूर्वीपासूनच लागलेली उत्कंठा! तो सोबत असतानाचा आनंद असीम सुख आणि तो विसर्जित होत जातानाची भावव्याकुळता फक्त चवथीच्या या एकाच उत्सवाशी समरस झालेली आहे. श्रीगणेश हे फक्त लोकदैवत नाही तर तो अवर्णनीय उत्साहाची जिवंत अनुभूती देणारा साक्षात्कार आहे.

जग किती वेगाने बदलत आहे… जीवनात येणारा प्रत्येक क्षण काहीतरी वेगळे आपल्याला देऊ पाहत आहे. धकाधकीची जीवनशैली आणि ‘वेळच नाही’च्या जमान्यात सगळेच जणूकाही धावत आहेत. कुठंतरी थांबून थोडा मोकळा श्वास घ्यावा तर तेही सहज शक्य होत नाही. अशावेळी परंपरेने चालत आलेले सण-उत्सव थकल्या-भागल्या जीवाला श्रांतता बहाल करतात. गणेशचतुर्थीचा सण तर या सर्वांत आनंदाचा परमोच्च बिंदू असतो.
लहानांपासून थोरांपर्यंत आणि गरिबापासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच या गणेशचतुर्थी सणाची ओढ वाटते. श्रीगणेश हे लोकदैवत लोकपरंपरेच्या प्रत्येक अंगाला स्पर्शून गेलेले आहे. विद्या, कला, संस्कृती, विज्ञान, निसर्ग ज्याच्या ठायी एकवटलेला आहे तो देवाधिदेव श्रीगणेश. दरवर्षी तो येतो. दीड, पाच, सात, नऊ, अकरा तर कधी याहीपेक्षा जास्त दिवस घरचा पाहुणचार घेतो; आणि परतीच्या प्रवासात मात्र सर्वांनाच भावविवश करतो. असे कोणते आकर्षण आहे या मृण्मयी मूर्तीत जे प्रत्येक भक्तगणाला खेचून घेते? सांस्कृतिक, धार्मिक अंगाबरोबरीनेच भावनिक अंगाने जोडून घेते? याचे उत्तर मात्र सापडत नाही. पण त्याचे चतुर्थीतील अस्तित्व भक्तगणांना वेड लावते! लोकपरंपरेतील स्त्रियांनी तर चवथीला विचारले होते, ‘चवथीबाई तू कधी गे येशी?’ ‘पावस पडे नदीवरी, येईन भागियात’ असा तिने संवाद साधला.

कष्टकरी लोकांच्या जीवनात तर चवथीच्या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. असंख्य लोककथा, लोकगीते त्याच्याशी जोडली गेली आहेत. घरी, शेतात, डोंगरदऱ्यांत कितीही काम असले तरी मोठ्या उत्साहात चतुर्थीचा सण साजरा करतील. फक्त दीड दिवस नाही तर पाच, सात, त्याही पुढे जाऊन या सणाशी त्यांनी आपले अनुबंध जोडलेले आहेत. गणेशाच्या मूर्तिप्रतिष्ठापनेचा पहिला दिवस पूजाअर्चा, धार्मिक विधी यांतच कधी निघून जातो ते लक्षातही येत नाही. दुसऱ्या दिवशी काहीजण दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करतात. मात्र या दीड दिवसांत मुलाबाळांना मनसोक्त आनंद मिळत नाही म्हणून मग निदान पाच दिवस तरी सण साजरा करायला हवा, असे विचार पुढे येऊन संगनमताने उत्साहपूर्ण वातावरणात थाटामाटाने सण साजरा करण्यावर भर दिला गेला. चतुर्थीत नातेवाईक, मित्रमंडळीना आग्रहाचे निमंत्रण दिले जाते, जेणेकरून अनेकांचे पाय घराला लागतात. पहिला दिवस तर सर्वांसाठीच घाईघाईचा… आपापल्या गणपतीला तयार केलेला प्रसाद भक्षण करण्याचा. म्हणून सहजासहजी पहिल्या दिवशी नातेवाइकांच्या घरी देवदर्शनासाठी जात नाहीत. दीड दिवसाने विसर्जन केल्या जाणाऱ्या गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना ज्या घरी असते तिथेही पहिल्या दिवसासारखीच घाई असते म्हणून मग खऱ्या अर्थाने चवथ साजरी केली जाते ती दीड दिवसानंतर.

गणपतीची मूर्ती कितीही दिवस घरात ठेवली तरी दीड दिवसानंतरच उत्सव सुरू झाला आहे याची प्रचिती येते. त्याला कारणही तसेच असते. चतुर्थीपूर्वी महिनाभर तरी साफसफाई, रंगरंगोटीची कामे घराघरांत सुरू असतात. ज्या ठिकाणी मूर्ती विराजमान होणार तिथली कमान, मागच्या बाजूने भिंतीवर काढली जाणारी प्रभावळ, आकर्षक पताकांची सजावट,
सभोवतालची रंगरंगोटी करण्यात दिवस भराभर निघून जातात. उद्योगधंदे, नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने शहरात स्थायिक झालेली गावाकडची कुटुंबे चवथीच्या काळात दीड दिवसाच्या गणपतीसाठी येतात आणि गणपती विसर्जन झाल्यानंतर आपल्या व्यापाशी समरस होतात. याउलट गावात असलेल्या बहुतांश कुटुंबांत गणेशोत्सव दीड दिवस साजरा करण्याऐवजी कमीत कमी पाच किंवा त्याहीपेक्षा जास्त दिवस साजरा करण्याची परंपरा दिसते. डिचोली तालुक्यातील कोलवाळ नदीकिनारी आणि कल्पदृमाच्या सावलीत वसलेल्या मेणकुरे गावात चवथीचा उत्सव बहुतांश कुटुंबात सात, नऊ दिवस साजरा करण्यात धन्यता मानतात. एका एका घरातील पन्नास-साठ सदस्य या दिवसांत गुण्यागोविंदाने एकत्रित राहतात. शहरात राहणारी त्यांची मंडळी घराची साफसफाई, रंगरंगोटी करण्यासाठी गावाकडे ये-जा करतात. एकत्रितपणे साजऱ्या होणाऱ्या या उत्सवासाठी दूरच्या गावांतून, शहरांतून मोठी आणि देखणी मूर्ती पूजण्यास प्राधान्य दिले जाते. सात, नऊ दिवस शाकाहारातील पदार्थांचा आस्वाद घेतला जातो. जीवनातील ताणतणाव विसरून कुटुंबे दरदिवशी शास्त्रीय संगीताचे ज्ञान नसताना घुमट, समेळ, कासाळे यांच्या निनादात आरत्या म्हणतात. कुठे तबला-हार्मोनिअमच्या सुराटीवर संतांच्या अभंगांतून भक्तीचा भाव व्यक्त करतात तर कोठे महिला गणपतीच्या जन्मापासूनची कथा लोकगीतांतून सादर करतात. छोट्या मुली एका हातीचा, फेराचा, बस फुगडीचा आविष्कार घडवितात, तर महिला रामायण-महाभारताच्या कथांवर आधारित ‘झिनोळी फुगडी’ सादर करतात. बार्देस तालुक्यात नादोडा गावातील राण्यांच्या जुव्यावर गणपतीची डोळे दिपवून टाकणारी सजावट केली जाते. विविध आकर्षक देखावे, गणपतीमूर्तीला रथावर बसवून त्याची मिरवणूक काढणारे देखावे येथे अनुभवता येतात. एरव्ही राणेचे जुवेचा परिसर शांत आणि काहीसा अलिप्त असलेला, मात्र चतुर्थीच्या उत्सवात तो गजबजून उठतो. माशेल ही कलाकारांची मोठी शाळा याचा प्रत्यय गणेशोत्सवात हमखास येतो. येथील घराघरांत असलेले कलाकार सामूहिक आविष्कार घडवीत पर्यावरण पूरक देखावे करून लोकांचे लक्ष वेधून घेतात. दीड दिवसांच्या मूर्तीचे विसर्जन करून मोकळी झालेली पावले मग माशेल, जुवे येथे वळतात. माशेलप्रमाणेच सत्तरी, डिचोली, पेडणे तालुक्यांना चतुर्थीच्या दिवसांत सकाळ-संध्याकाळ दवली मांड वादनाची परंपरा लाभलेली आहे. गणपतीला जागृत करण्यासाठी ही नौबत केली जाते असे लोकमानस मानते.

सत्तरी तालुक्याला माटोळीचे वैविध्य लाभलेले असून औषधी वनस्पती, भाज्या, फळफळावळ यांची लक्षवेधी रचना केली जाते. सत्तरी तालुका निसर्गसमृद्ध असून जैवविविधतेचाच महोत्सव साजरा केला जातो असेच वाटत राहते. सुरुवातीला दोन दिवस सगळे काही स्थिरस्थावर झाल्यानंतर घरच्या महिलावर्गाला थोडी उसंत मिळते. त्यामुळे जेव्हा केव्हा त्यांना वेळ मिळतो तेव्हा त्या आपल्या सख्यांसोबतीने फुगडी घालण्याची तत्परता दाखवितात. फुगडी ही महिलांचीच; मात्र साखळीतील कुडणे, नावेलीतील मायणा या गावात पुरुष फुगडी घालतात. सत्तरी तालुक्याला जसे जंगलांचे देणे लाभले आहे तसेच अंत्रुज महालाला कुळागारांची मांदियाळी लाभलेली आहे. या पार्श्वभूमीचे दर्शन इथल्या गणेशोत्सवात दिसते. ज्या जागी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते तिथे वर माटोळी सजावट असतेच, त्याशिवाय तुळशीवृंदावनासमोरही माटोळी रचण्याची परंपरा बघायला मिळते. कागदापासून केलेली कलाकुसर आणि वैशिष्ट्यपूर्ण घुमट आरत्यांचे सादरीकरण हे येथील वेगळेपण अन्यत्र लाभणे कठीण! फुगडी, भजन, आरत्या यांचे लहानथोरांनी केलेले उत्स्फूर्त सादरीकरण… रंगरंगोटी करण्यापासून माटोळी बांधणे, पताकांची आरास, नेवऱ्या-करंज्या करणे, मोदक व इतर पदार्थ करण्यापर्यंत वावरत असलेले सर्व वयोगटातील हात… ही अशी सामूहिकता अन्य कुठल्याही सण-उत्सवाला लाभलेली नाही; ती फक्त आणि फक्त गणपतीबाप्पाच्या आगमनाची कमाल आहे. विविध कलांच्या आविष्काराचे माध्यम म्हणजे गणपती उत्सव.
एरव्ही गणपती म्हणजे साधीसुधी मृण्मयी मूर्ती, परंतु लोकांसाठी मात्र ती संजीवक मूर्ती ठरलेली आहे. म्हणूनच तिला वेगवेगळ्या आकार, प्रकार, रूपांत पूजतात. शिरोडा-वाजे येथे गणपतीची दरवर्षी तीच ती लाकडी मूर्ती सामूहिकतेने पूजन करून पूर्वापार चालत आलेल्या परंपरेचे पालन केले जाते. काणकोणच्या तुडल येथे अडीच दिवसांचा गणपती असतो. विसर्जनाच्या दिवशी गावातील देसाई मंडळी नदीकिनारी जाऊन पारंपरिक विधी करतात. या विधीमागचे कारण अनाकलनीय राहिले आहे. शिवोलीतील काही कुटुंबांत शिवपार्वतीची पूजा केली जाते.

कलांचा हा सामूहिक आविष्कार अनुभविण्यासाठी लोकमानस घराबाहेर पडते ते दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन झाल्यावर. घरच्या गणपतीची सजावट पूर्ण करताना दीड दिवसानंतरचा वेळ काहीसा निवांत मिळतो. येथे मग नातेवाइकांकडे जाणे होते. मित्रमंडळी हमखास याच दिवसात आत्मीयतेने येतात, गणेशाचे भक्तिभावाने दर्शन घेतात. चवथीचे हे दिवस उत्साहाने भरावलेलेच असतात. एरव्ही असे कोणी कोणाच्या घरी सहजासहजी जात-येत नसतात, परंतु चतुर्थीचा सण याला अपवाद ठरतो! गणपतीबाप्पा घरी आले आणि घराचे मंदिर झाले अशी मांगल्याची अनुभूती येते. पारंपरिक अन्नसंस्कृतीची वैविध्यता अनुभवता येते. विविध प्रकारच्या मौसमी भाज्या, फळे, फुले, फराळ, गोडधोड अशी जणू प्रत्येक दिवशी मेजवानीच असते. लहान मुले तर अनोख्या विश्वात वावरत असतात. हा उत्सव मूळ घरापासून दूर दूर गेलेल्या आपल्या माणसांना एका धाग्यात बांधून ठेवतो. कधीतरी येऊन-जाऊन असणारी पावले चतुर्थीला मात्र कमीत कमी आठ-दहा दिवस एकत्रित राहतात. एकत्रित रांधून सामूहिक जेवतात… जणू काही कुटुंबातील सदस्यांचे चवथ म्हणजे ‘गेट टुगेदरच’ असते. आज खरोखरच अशा सामूहिक जगण्याची समाजाला गरज आहे.

गणपती कधी येतो आणि कधी जातो कळतही नाही एवढे त्याच्या सरबराईत आपण व्यस्त राहतो. आता बाप्पाही आपल्या गावाला चाललेले आहेत. त्यांच्याशिवाय काही दिवस तरी चैन पडणार नाही. पाच, सात दिवस त्याच्या सहवासात राहून त्याची जणू घराला सवय होते. त्याचे विसर्जन धामधुमीत करून उत्साहाचा झरा अखंडितपणे वाहता ठेवला जातो. तो ऊर्जा पुरवितो. पुढे येऊ घातलेल्या संकट-समस्यांवर मात करण्यासाठी ही ऊर्जा पुरेशी ठरते.

वाढत्या शहरीकरणात माणसे यंत्रवत होत चालली आहेत. स्वतःला एका चौकटीत बंदिस्त करून जगावर भाष्य होऊ लागले आहे, या पार्श्वभूमीवर चतुर्थीचा हा सण सभोवतालाला चैतन्य पुरवितो. माती हे सर्जकतेचे, नवनिर्मितीचे प्रतीक… या मातीप्रतीची, निसर्गाप्रतीची कृतज्ञताच या सणाच्या माध्यमातून लोकमानस व्यक्त करीत आलेला आहे.
गणपतीच्या प्राचीन दगडी मूर्ती, मंदिरे ठिकठिकाणी आहेत. लोक भक्तिभावाने तिथे जातात. सर्व कलांचा तो अधिपती. ‘रणमाले’सारख्या लोकनाट्यात त्याला वेगळ्या रूपात अनुभवता येते. त्याची ओढ मनाला कायमच आहे. संकटाच्या वेळी तो सोबत असतोच ही मनाची धारणा त्याच्या आगमनाची वाट पाहात अधिक तीव्र होत जाते. आतुरतेने त्याची आपण वाट पाहातो… तो तेवढ्याच दिमाखात येतो… सर्वात मिसळतो… आणि निघून जाताना भावविवश करून जातो… हे अनुबंध जगण्याला उभारी देतात, उत्साह प्रदान करतात… रोजच्या त्याच त्याच जगण्याला लाभलेली ही आनंदाची पर्वणी असते. सगळ्या चिंता, काळज्या, विवंचना, वेदना त्याला सांगून अगदी आतून मोकळं व्हायचं… विघ्नहर्ता आहेच विघ्ने दूर करणारा हा अतूट विश्वास इथे दिसतो… याच विश्वासाने हा सण आजही साजरा होतो…!!