गंभीर गुन्ह्यांत 36 टक्क्यांची घट : पोलीस महासंचालक

0
25

गंभीर गुन्ह्यांत 36 टक्क्यांची घट : पोलीस महासंचालकराज्यातील गंभीर गुन्ह्यांत गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी आत्तापर्यंत सुमारे 36 टक्के एवढी घट झाली आहे, असा दावा राज्याचे पोलीस महासंचालक डॉ. जसपाल सिंग यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काल केला.

राज्यात मागील काही दिवसांत एका पाठोपाठ आठ खून प्रकरणांची नोंद झाल्याने गुन्ह्याचे प्रमाण वाढल्याचा आरोप केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे. राज्यातील घरफोड्या, मोबाईल चोऱ्यांमध्ये परप्रांतीय गुंतलेले आहेत. दरोडे, जबरी चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांकडून गस्त घातली जाते, असे डॉ. सिंग यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील अमलीपदार्थ व्यवहारामध्ये स्थानिक, परप्रांतीय आणि विदेशी नागरिक गुंतलेले असून, स्थानिकांच्या पाठिंब्याशिवाय अमलीपदार्थ व्यवहार करणे शक्य नाही. परराज्यातून विविध मार्गांनी अमलीपदार्थ गोव्यात आणले जात आहे. स्थानिकांच्या मदतीने ग्राहक शोधले जातात, असेही डॉ. सिंग यांनी सांगितले.
पोलीस खात्याकडून महसूल गोळा करण्यासाठी वाहनचालकांना दंड ठोठावला जातो, हा समज चुकीचा आहे. पोलीस यंत्रणेकडून केवळ वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड ठोठावला जातो. वाहतूक नियम उल्लंघन करण्याऱ्याला दंड ठोठावण्यात आल्यानंतर त्याला वाहतूक नियमांची जाणीव करून दिली जाते, असेही डॉ. सिंग म्हणाले.

वाहतूक नियमांचे उल्लंघन न करणाऱ्या पर्यटकांची वाहने न अडविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. ज्या पर्यटकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जाते, त्यांना दंड ठोठावला जात आहे. पर्यटकांकडून करण्यात येणाऱ्या वाहतूक नियम उल्लंघनाचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल केले जातात. राज्यात येणाऱ्या पर्यटकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असेही डॉ. सिंग म्हणाले.

बाणस्तारी अपघाताचा तपास योग्य दिशेने
बाणस्तारी येथील भीषण अपघात प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. या अपघात प्रकरणी काही जणांनी चुकीची माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाच्या तपासासाठी राजकीय दबाव नाही, असे डॉ. जसपाल सिंग यांनी सांगितले.