गंभीर आणि चिंताजनक

0
9

उच्च शैक्षणिक दर्जासाठी देशभर ख्यातनाम असलेल्या गोव्यातील जुवारीनगर येथील एका निवासी शैक्षणिक संस्थेमध्ये गेल्या दोन वर्षांत सहा विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा मार्ग अनुसरणे ही अतिशय दुःखदायक आणि तितकीच गंभीर गोष्ट आहे. राजस्थानपासून मुंबई, हैदराबाद, दुबई असे ठिकठिकाणी ह्या संस्थेचे कॅम्पस आहेत. मग गोव्यातच ह्या आत्महत्या अशा सातत्याने का घडत आहेत असा प्रश्न निश्चितच येथील जनतेला आज पडला आहे. अशा प्रकारच्या उच्च शैक्षणिक दर्जा असलेल्या शिक्षणसंस्थेमध्ये जेव्हा मुले शिक्षण घेण्यासाठी येतात, तेव्हा ती रीतसर प्रवेश परीक्षा देऊन आपले उज्ज्वल शैक्षणिक भवितव्य घडवण्याच्या प्रेरणेनेच आलेली असतात. मग येथे शिक्षण घेत असताना असे काय घडते की त्यांना आत्महत्येचा अतिशय टोकाचा मार्ग अनुसरावासा वाटतो? वस्तुस्थिती ही आहे की, अनेकदा ही मुले त्यांच्या पालकांच्या दबावाखातर वा त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेच्या कल्पनांखातरही अशा प्रकारच्या बड्या शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेण्यास बाध्य केली जात असतात. त्यामुळे स्वतःची इच्छा नसतानाही केवळ पालकांच्या दबावामुळे अशा प्रकारच्या निवासी शिक्षणसंस्थेत शिक्षण घ्यावे लागलेल्या मुलांना कोणत्या स्वरूपाच्या शैक्षणिक ताणतणावास तोंड द्यावे लागत असेल, कोणाचाही पाठिंबा वा पाठबळ नसताना कशी एकाकी झुंज द्यावी लागत असेल, ह्याची कल्पना आपण करू शकतो. दोन वर्षांत सहा मुलांनी आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग अनुसरणे हा अतिशय गंभीर प्रकार आहे आणि ह्या विशिष्ट संस्थेच्या अभ्यासक्रमात किंवा अध्यापनात निश्चितपणे काही गंभीर त्रुटी आहेत असेच त्यामुळे म्हणावे लागते. ह्यापूर्वी झालेल्या घटनांसंदर्भात झालेल्या चौकशीत परीक्षेचा तणाव हे कारण समोर आले होते. आत्महत्या केलेले बहुतेक विद्यार्थी दुहेरी पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होते, त्यामुळे त्यांच्यावर अभ्यासाचा प्रचंड ताण असायचा हेही स्पष्ट झाले होते. त्यानंतर या संस्थेतील विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासंदर्भात उपाययोजना करण्याची ग्वाहीही संस्थेने दिली होती. मग अजूनही ह्या आत्महत्या का सुरू आहेत? आणि त्यांची जबाबदारी कोण स्वीकारणार? डिसेंबर 2024, मार्च 2025, मे 2025, ऑगस्ट 2025, सप्टेंबर 2025 आणि आता फेब्रुवारी 2026 अशा ह्या अगदी सातत्याने आत्महत्या घडल्या आहेत. बहुतेक आत्महत्या ह्या परीक्षेच्या सुमारास होतात असेही दिसते आहे. मग सरकार मुकाट्याने ह्या आत्महत्या बघत गप्प बसणार आहे काय? ह्या आत्महत्यांचे खापर केवळ विद्यार्थ्यांवर फोडता येणार नाही. सदर संस्थेतील वातावरणही त्याला तितकेच कारणीभूत दिसते आणि त्याबाबत जबाबदारी निश्चित केली गेली पाहिजे. मागे आत्महत्या करणाऱ्या एका विद्यार्थ्याने अमली पदार्थ सेवन केल्याचे आढळून आले होते. त्याला हे अमली पदार्थ मिळाले कसे आणि कोठून? त्यामुळे केवळ शैक्षणिक कारणांखातर ह्या आत्महत्या घडत आहेत की आणखी काही आयाम ह्या घटनांना आहेत हेही शोधले गेले पाहिजे. चौदा महिन्यांत पाच कोवळ्या मुलांच्या आत्महत्या हे गोव्यासाठीही लांच्छन आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी, त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी समुपदेशक नेमले जातात. मग ह्या अशा बड्या संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासंदर्भात उपाययोजना केल्या जात नाहीत काय? आता तर सरकारने खासगी विद्यापीठ कायदा संमत करून खासगी विद्यापीठांना गोव्यात रान मोकळे करून दिलेले आहे. ही खासगी विद्यापीठे तर व्यवस्थापन कोट्यातून लक्षावधींच्या देणग्या घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश देत असतात. तेथे अशा प्रकारच्या ताणतणावांचे प्रमाण ह्याहून अधिक असेल. त्यामुळे पुढच्यास ठेच, मागचा शहाणा ह्या न्यायाने सरकारने ह्या विषयात न्यायालयीन चौकशी नेमून खऱ्या कारणांचा शोध घेण्याची आवश्यकता आज भासते आहे. सर्वांत आधी सदर शैक्षणिक संस्थेच्या व्यवस्थापनाला ह्या सतत घडलेल्या घटनांना जबाबदार धरले जावे. ह्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांमधील वातावरण कसे असते, तेथील मुले एकमेकांशी मिळून मिसळून राहतात का, त्यांच्यासाठी शैक्षणिक ताणतणाव कमी करणारे उपक्रम आयोजित केले जात असतात का, हे तपासले गेले पाहिजे. नैराश्यात गेलेली मुले त्यांची गैरहजेरी, त्यांची अलिप्तता या लक्षणांवरून ओळखता येत नसतील तर असे शिक्षक काय अध्यापन करणार? कोंडवाड्यामध्ये गुरे कोंबावीत तशी वसतिगृहांमध्ये मुले कोंबून त्यांना पुस्तकी किडे बनवणाऱ्या आणि त्यासाठी खोऱ्याने पैसा ओढणाऱ्या संस्था नको आहेत. अभ्यास आणि जीवन या दोन्ही गोष्टींचे तारतम्य साधणारी शैक्षणिक व्यवस्था हवी आहे!