दीर्घ आजारानंतर व्हॅटिकन सिटीमध्ये घेतला अखेरचा श्वास
कॅथोलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे काल वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले. पोप यांनी काल सोमवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी 7:35 वाजता अखेरचा श्वास घेतला. पोप फ्रान्सिस हे इतिहासातील पहिले लॅटिन अमेरिकन पोप होते.
गेल्या काही महिन्यांपासून ते आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त होते. 14 फेब्रुवारी रोजी त्यांना रोमच्या जेमेली रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर न्यूमोनिया आणि अशक्तपणाचा उपचारही सुरू होता. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे त्यांना 5 आठवडे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. व्हॅटिकन सीटी येथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. त्यांच्या रक्त तपासणी अहवालात मूत्रपिंड निकामी होण्याची लक्षणे दिसून आली. तथापि, त्यांना 14 मार्च रोजी डिस्चार्ज देण्यात आला होता.
पहिले बिगर युरोपियन पोप
पोप फ्रान्सिस हे 1,300 वर्षांत पोप म्हणून निवडले जाणारे पहिले बिगर-युरोपियन होते. पोप फ्रान्सिस यांनी समलैंगिक लोकांना चर्चमध्ये येण्याची परवानगी देणे, समलैंगिक जोडप्यांना आशीर्वाद देणे, पुनर्विवाहाला धार्मिक मान्यता देणे असे मोठे निर्णय घेतले होते. रविवारी ईस्टरनिमित्त पोप फ्रान्सिस यांनी शुभेच्छा दिल्या होत्या.
स्पेनमध्ये तीन दिवसांचा दुखवटा
पोप फ्रान्सिस यांच्या निधनाबद्दल स्पेनने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. पोप फ्रान्सिस हे गेल्या एका शतकाहून अधिक काळातील व्हॅटिकनच्या बाहेर दफन केले जाणारे पहिले पोप असतील. पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. अंत्यसंस्काराची वेळ अद्याप जाहीर केलेली नाही.
मोदींकडून दुःख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटरवर पोप फ्रान्सिस यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. या दुःखाच्या वेळी जगातील कॅथोलिक समुदायाप्रती माझी मनापासून संवेदना असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस नेत्या खासदार प्रियांका गांधी यांनीही पोप यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
राज्यपालांकडून शोक
गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लाई यांनी काल पोप फ्रान्सिस यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पोप फ्रान्सिस यांची जगभरात प्रेमळ, दयाभाव असलेली व्यक्ती तसेच मानवतेचे दूत अशी ओळख होती. पंतप्रधान मोदी हे इटली दौऱ्यावर गेले असता पोप यांनी त्यांना प्रेमाने दिलेला वागणूक ही न विसरता येण्यासारखी असल्याचे पिल्लाई यांनी म्हटले आहे. ते एक महान अध्यात्मिक नेते म्हणून जगभरातील स्मरणात सदैव राहतील असे राज्यपालांनी पुढे म्हटले आहे.

