खोर्लीचे सरपंच, उपसरपंच अपात्र

0
7

गटविकास अधिकाऱ्यांची कारवाई; हितसंबंधाचा मुद्दा आणि पदाचा गैरवापर

तिसवाडी गटविकास अधिकारी अनिल धुमस्कर यांनी खोर्ली ग्रामपंचायतीचे सरपंच गोरख केरकर आणि उपसरपंच सौ. सुप्रिया केरकर या दांपत्याला पंचायतीमधील कामामध्ये हितसंबंध आणि पदाचा गैरवापर प्रकरणात दोषी ठरवून अपात्र ठरविले आहे. गोवा पंचायत राज्य कायदा, 1994 अन्वये त्या दोघांना अपात्र ठरवण्यात आले असून, खोर्ली पंचायतीमधील त्यांच्या जागा रिक्त घोषित करण्यात आल्या आहेत.
सरपंच गोरख केरकर आणि उपसरपंच सुप्रिया केरकर या दाम्पत्याने दोन बांधकामांसाठी (ज्यामध्ये गोरख केरकर यांच्या मालकीच्या एका व्यावसायिक मालमत्तेचाही समावेश होता) एनेबलिंग हाउस नंबर (ईएचएन) आणि वीज, पाणी कनेक्शनसाठी ना-हरकत प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी स्वतंत्र अर्ज केले होते. पंचायतीच्या 29 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या पाक्षिक बैठकीत या अर्जांना मंजुरी दिली. या बैठकीत दोघांनी सहभाग घेतला होता, अशी तक्रार तिसवाडी गटविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती.

या प्रकरणाच्या चौकशीमध्ये संबंधित व्यक्तींनी अर्ज सादर केल्याचे मान्य केले; परंतु त्या संरचना सार्वजनिक वापरासाठी होत्या. त्यापैकी एक संरचना मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी म्हणून, तर दुसरी पंचायत कामगारांच्या तात्पुरत्या निवासासाठी होती, असा दावा त्यांनी केला. ही जमीन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली होती आणि त्यातून मिळणारा कोणताही लाभ हा आर्थिक स्वरूपाचा नसून केवळ गौण किंवा आनुषंगिक होता, असा दावा केरकर दाम्पत्याने केला.

मंजुरी प्रक्रियेतील केरकर दाम्पत्याच्या सक्रिय सहभागाची पुष्टी अधिकृत इतिवृत्त आणि मंजुरी प्रक्रियेतून झाली आहे. हा हितसंबंधांचा वैयक्तिक संघर्ष ठरतो, असा निर्णय गटविकास अधिकारी अनिल धुमस्कर यांनी दिली. अधिकृत नोंदींमध्ये फेरफार करण्याचे त्यांचे प्रयत्न गोवा पंचायत राज कायद्याच्या कलम 55(4) मधील तरतुदींचे उल्लंघन करणारे होते. या बाबीमुळे हे प्रकरण पंचायतीच्या नियमित कामकाजापेक्षा वेगळे ठरले आणि परिणामी त्यांना अपात्र ठरवण्यात आले, असेही आदेशात म्हटले आहे.