खोट्या शपथा घेऊन जनतेचा विश्‍वासघात

0
10

>> बंडखोरांच्या भाजप प्रवेशानंतर प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांची टीका; कॉंग्रेस पक्षाला पुन्हा उभारी देणार

कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर निवडून येऊन भाजपमध्ये प्रवेश करणार्‍या आठ फुटीर आमदारांनी जनतेचा विश्वासघात केला असून धार्मिक स्थळात शपथ घेऊन तिचे पालन न करता देवदेवतांची थट्टा केली आहे, अशी तीव्र टीका गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी कॉंग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल केली.

भाजपकडून कॉंग्रेसच्या आमदारांवर पक्षांतर करण्यासाठी दबाव आणला जात होता. तथापि, तीन आमदार भाजपच्या दबावाला बळी पडले नाहीत. त्यांनी नागरिकांना दिलेल्या वचनाचे पालन केले आहे. कॉंग्रेस पक्षाला पुन्हा उभारी देण्यात येईल, असेही पाटकर यांनी सांगितले. यावेळी कॉंग्रेसचे आमदार युरी आलेमाव, ऍड. कार्लुस फेरेरा, आणि आल्टन डिकॉस्टा यांची उपस्थिती होती.
भाजपने २०१९ मध्ये कॉंग्रेसच्या १० आमदारांना रातोरात भाजपमध्ये प्रवेश देऊन लोकशाहीचा खून पाडला होता. आता, आठ कॉंग्रेस आमदारांना भाजपमध्ये प्रवेश देऊन दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून केला गेला आहे. कॉंग्रेसच्या फुटीर आमदारांनी मतदारांचा विश्वासघात केला आहे, अशी टीका कॉंग्रेसचे माध्यम विभागाचे प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी केली.
सर्वोच्च न्यायालयात कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी गेल्या वेळी पक्षांतर केलेल्या १० कॉंग्रेस आमदारांच्या विरोधात दाखल केलेली याचिका प्रलंबित आहे. आताच्या आठ आमदारांच्या पक्षांतराबाबत याचिका दाखल करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती ऍड. कार्लुस फेरेरा यांनी दिली.

भाजपची बी टीम उघड ः आरजी

कॉंग्रेस ही भाजपची बी टीम आहे. मायकल लोबो यांचे कॉग्रेसचे आमदार भाजपला पुरविण्याचे मिशन होते, अशी टीका रिव्होल्युशनरी गोवन्सचे अध्यक्ष मनोज परब यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीत आरजीने मतविभाजन केल्याचा आरोप केला जात होता. आता सर्व गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. आरजी हा जास्त मताधिक्य असलेला विरोधी पक्ष आहे, असा दावा परब यांनी केला.

बंडखोर आमदारांकडून लोकशाहीची हत्या

आमदार विजय सरदेसाई यांची टीका; गोमंतकीय जनता माफ करणार नाही

कॉंग्रेसचे आठ आमदार भाजपमध्ये जाणार हे आधीच आम्हाला ठाऊक होते. बाजारातून तांदळाच्या गोणी विकत घेण्यात येतात, तसे या आमदारांना सरकारने विकत घेतले आणि तेही विकले गेले. पितृपक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेण्याची कृपा त्यांच्यावर देवाने केली असावी. मात्र त्यांनी लोकशाहीची हत्या केली एवढे निश्‍चित, अशी प्रतिक्रिया आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली.
यापूर्वी या बंडखोर आमदारांनी देवासमोर पक्षांतर न करण्याची शपथ घेतली होती. त्याचा त्यांना विसर पडला आहे. मात्र आता त्यांना भवितव्य नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत राजकीय क्षेत्रासह सरकार चालविण्यात अपयशी ठरले असून, आपली दुष्कृत्ये लपविण्यासाठी विरोधी पक्ष संपविण्यासाठी त्यांनी हे काम केले.

अशा तर्‍हेने त्यांनी देखील लोकशाहीची हत्या केली आहे, असेही सरदेसाई म्हणाले.
आज प्रशासनात भ्रष्टाचार माजला आहे. त्या पैशातून या आमदारांना त्यांनी विकत घेतले आहे. पक्षत्याग केलेल्या आमदारांना जनता क्षमा करणार नाही, असे सरदेसाई म्हणाले.

कॉंग्रेसच्या आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आपल्याला काही फरक पडणार नाही. त्यामुळे हा माझा प्रश्‍न नसून, कॉंग्रेसचा आहे. आपल्या भूमिकेत कोणताही बदल होण्याचा प्रश्‍न उद्भवत नाही.

केवळ स्वार्थासाठी भाजप प्रवेश ः विजय

  • आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, अपक्ष आमदार.

कॉंग्रेसच्या आठ फुटीर आमदारांनी प्रामाणिकपणा, नैतिकता खुंटीला टांगून ठेवली आहे. त्या आमदारांनी फक्त स्वार्थ आणि पैशासाठी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. देवासमक्ष घेतलेली शपथ ते विसरले आहेत. भाजपा हा जनतेच्या मतांमुळे नव्हे तर राजकीय खेळामुळे सत्तेत टिकून आहे, अशी टीका गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली.