Home बातम्या खेळातील सट्टेबाजी रोखण्यासाठी लवकरच कायदा करणार

खेळातील सट्टेबाजी रोखण्यासाठी लवकरच कायदा करणार

0

केंद्रीय कायदामंत्री कपिल सिब्बल यांनी काल याविषयी सुतोवाच केले. ‘होय, मी या अनुषंगाने क्रीडामंत्री जितेंद्र सिंग यांच्याशी बोललो आहे. सट्टेबाजीसारख्या कृत्याला रोखण्यासाठी आम्ही लवकरच एका कायद्याचा मसुदा तयार करणार आहोत.’ असे सिब्बल म्हणाले.

अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर लोकांच्या खेळाविषयी असलेल्या विश्‍वासार्हतेच्या भावनेला तडा जातो याकडे सिब्बल यांनी लक्ष वेधले. क्रीडा मैदानावर जे घडते ते खेळाच्या भल्यासाठी असते अशी लोकांची भावना असते. परंतु प्रत्यक्षात वेगळेच पाहायला मिळत आहे, असे ते म्हणाले.

दरम्यान, स्पॉट फिक्सिंग प्रकरणात ज्या क्रिकेटपटूंना अटक झाली आहे ते मुंबई, चंदिगढ, कोलकाता व हैदराबाद येथे ज्या हॉटेलमध्ये राहिले तेथील सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी पोलिसांनी संबंधितांकडे केली आहे. या ठिकाणी हे क्रिकेटपटू व बुकी यांच्यात संपर्क झाल्याच्या शक्यतेतून ही मागणी करण्यात आली आहे. या खेळाडूंच्या आवाजाचे नमुने मिळवण्यासाठी परवानगीही पोलीस घेणार आहेत.