खासगी वाहने पर्यटकांना भाडेपट्टीवर देणे भोवणार

0
1

गोवा वाहतूक पोलीस विभागाकडून 777 खासगी वाहनांवर कायदेशीर कारवाईची शिफारस

गोवा वाहतूक पोलीस विभागाने पर्यटकांना बेकायदेशीरपणे भाडेपट्टीवर दिलेल्या 777 खासगी वाहनांवर कायदेशीर कारवाईची शिफारस वाहतूक खाते आणि न्यायालयाकडे केली आहे, अशी माहिती वाहतूक पोलीस विभागाचे पोलीस अधीक्षक प्रबोध शिरवईकर यांनी
दिली.

राज्यात रेंट-अ-बाईक आणि रेंट-अ-कार ही वाहने पर्यटकांना भाडेपट्टीवर देण्याची परवानगी आहे. तथापि, राज्यात खासगी चारचाकी आणि दुचाकी वाहने पर्यटकांना भाडेपट्टीवर दिली जात आहेत. वाहतूक पोलीस विभागाकडून खासगी वाहने पर्यटकांना भाडेपट्टीवर देणाऱ्या वाहनमालकांवर कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे. 2024 मध्ये पर्यटकांना बेकायदेशीरपणे भाडेपट्टीवर दिलेली सुमारे 593 वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली. त्यात उत्तर गोव्यात 356 आणि दक्षिण गोव्यात 205 खासगी वाहने ताब्यात घेतली.

2025 मध्ये जानेवारी ते मे या पाच महिन्यात सुमारे 184 वाहने ताब्यात घेण्यात आली. त्यात उत्तर गोव्यात 110 आणि दक्षिण गोव्यात 41 आणि पोलीस स्थानकांनी 33 खासगी वाहने ताब्यात घेतली. या वाहनांच्या मालकांवर कारवाई करण्यासाठी संबंधित वाहतूक खात्याच्या विभागाकडे शिफारस करण्यात आली आहे. तसेच, वाहनमालकावर दंडात्मक कारवाईसाठी न्यायालयाकडे विनंती करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक प्रबोध शिरवईकर यांनी दिली.
वाहतूक कायद्यानुसार, खासगी वाहने पर्यटकांना भाडेपट्टीवर देणाऱ्यांवर पहिल्या गुन्ह्यासाठी 10 हजार रुपये दंड आणि वाहनाची नोंदणी निलंबित करण्याची तरतूद आहे. दुसऱ्या गुन्ह्यासाठी वाहनाची नोंदणी रद्द करण्याची तरतूद आहे.