खासगी जमिनीतील अनधिकृत घरे कायदेशीर करण्यासाठी निर्धारित मुदतीत अर्ज सादर करू न शकलेल्या घर मालकांचे अर्ज स्वीकारण्यात येतील. घरमालकांना अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत खास वटहुकूम जारी केला जाणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री रोहन खंवटे यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
सरकारने खासगी जमिनीतील अनधिकृत घरे कायदेशीर करण्यासाठी तारीख निश्चित करून अर्ज सादर करण्याचे आवाहन घरमालकांना केले होते. खासगी जमिनीतील घरे कायदेशीर करण्यासाठी आत्तापर्यंत ४८५० अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज सादर केलेल्या घर मालकांना येत्या ३१ मार्च पर्यंत १० हजार रुपयांचे शुल्क भरण्याची सूचना केली आहे. शुल्काचा भरणा केलेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, असेही मंत्री खंवटे यांनी सांगितले.
खासगी जमिनीमध्ये घरे असलेले अनेक घरमालक काही कारणास्तव आपले घर कायदेशीर करण्यासाठी अर्ज सादर करू शकलेले नाहीत, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे खासगी जमिनीत घर बांधलेल्या घरमालकांचे अर्ज स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना अर्ज सादर करताना १० हजार रुपये शुल्क भरण्याची सूचना केली जाणार आहे. कोमुनिदाद आणि सरकारी जमिनीतील बेकायदा घरे कायदेशीर करण्याबाबत अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही, असेही मंत्री खंवटे यांनी सांगितले.

