खासगी उद्योगांत मूळ गोमंतकीयांनारोजगारासाठी सरदेसाईंकडून विधेयक

0
10

राज्यातील खासगी उद्योग व कंपन्यांत मूळ गोमंतकीयांना 80 टक्के रोजगार देण्यात यावा, या मागणीसाठी गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक खासगी विधेयक मांडण्यासाठी पाठवले असून, ‘गोवा राज्य स्थानिक उमेदवार रोजगार विधेयक 2026′ असे या विधेयकाचे नाव आहे.
गोव्यातील खासगी उद्योग व कंपन्यांत गोमंतकीयांपेक्षा गोव्याबाहेरच्या उमेदवारांनाच जास्त प्राधान्य देण्यात येत असल्याचे दिसून आल्याने विजय सरदेसाई यांनी हे विधेयक विधानसभेत मांडण्याचा निर्णय घेतला आहे, असे गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी काल दै. ‘नवप्रभा’शी बोलताना सांगितले.

बऱ्याच खासगी कंपन्या व उद्योग हे गोमंतकीय उमेदवारांकडे आवश्यक ते कौशल्य नसल्याने आम्ही त्यांची निवड करू शकत नसल्याची कारणे देत असतात. त्यामुळे गोवा सरकारने गोव्यात येऊ घातलेल्या कंपन्या व उद्योग यांच्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य शिक्षण स्थानिकांना देण्याची सोय करावी, अशी मागणीही सदर विधेयकातून विजय सरदेसाई यांनी केली आहे, असे कामत म्हणाले.

नद्यांचे संवर्धन व संरक्षण यासाठीही एक खासगी विधेयक विजय सरदेसाई यांनी विधानसभेत मांडण्यासाठी पाठवले असून, नद्यांचे प्रदूषण होण्यापासून वाचवणे, तसेच कोणत्याही प्रकारे नद्यांचे नुकसान केले जाणार नाही, यासाठी पावले उचलण्याबाबतचे हे विधेयक असल्याचे कामत यांनी म्हटले आहे. ‘गोवा नद्या संरक्षण विधेयक’ असे हे विधेयक आहे.