खामेनेईंच्या अंत्ययात्रेवेळीच इराणचे होर्मुझमध्ये हल्ले

0
10

तीन तेलवाहू जहाजे द्रोनद्वारे लक्ष्य

कतारने केला हल्ल्यांचा तीव्र निषेध

इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनई यांच्या अंत्ययात्रेदरम्यान काल मंगळवारी इराणने होर्मुझमध्ये पुन्हा हल्ले सुरू केले. होर्मुझच्या सामुद्रधुनीत एकाच दिवसात इराणकडून तीन तेलवाहू जहाजांवार हल्ला चढवण्यात आला. युनायटेड किंगडम मेरिटाइम ट्रेड ऑपरेशन्सनुसार, दिवसाच्या सुरुवातीला दोन टँकरवर झालेल्या हल्ल्यानंतर तिसऱ्या जहाजाला ड्रोनद्वारे लक्ष्य करण्यात आले.
या हल्ल्यांबाबत इराणने, व्यापारी जहाजे त्यांनी निश्चित केलेल्या मार्गांवरून होर्मुझमधून जात नाहीत. याशिवाय ते सुरक्षेची हमी देऊ शकत नाहीत. होर्मुझमधील परिस्थिती अमेरिकेच्या हल्ल्यांपूर्वीच्या स्थितीत अद्याप परत आलेली नाही असे स्पष्ट केले आहे. यातील एक जहाज कतारचे आहे.

या हल्ल्यात तिसऱ्या टँकरचे किरकोळ नुकसान झाले. तसेच दुसऱ्या जहाजाचे संरचनात्मक नुकसान झाले आहे, मात्र यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही आणि जहाज आपला प्रवास पुढे चालू ठेवू शकले अशी माहिती ब्रिटिश लष्कराने दिली. ओमानच्या किनाऱ्याजवळ असलेल्या एका टँकरवर क्षेपणास्त्र आदळले आणि हल्ला झाल्यानंतर काही तासांनी त्याला आग लागली.

हल्ल्याचा कतारकडून निषेध
कतारने मंगळवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ आपल्या तेलवाहू जहाजावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या घटनेसाठी कतारने इराणला पूर्णपणे कायदेशीररित्या जबाबदार धरले आहे. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माजिद अल अन्सारी यांनी हा हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे गंभीर उल्लंघन असून त्याने जागतिक ऊर्जा पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीच्या सुरक्षेला धोका निर्माण केला असल्याचे म्हटले आहे. इराणने प्रादेशिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांच्या सुरक्षेला बाधा आणणाऱ्या सर्व कारवाया तात्काळ थांबवाव्यात अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.

खामेनेईंच्या अंत्ययात्रेत
लाखो लोकांचा सहभाग

दरम्यान, अयातुल्ला अली खामेनी यांची अंत्ययात्रा मंगळवारी शिया धार्मिक शहर कोममध्ये पोहोचली. लाखो लोकांनी अंत्ययात्रेत लाल कापड अर्पण केले, जे इस्लामिक परंपरेनुसार सूड किंवा रक्तपाताच्या मागणीचे प्रतीक आहे. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखो लोक जमले होते. खामेनी यांचे सुरुवातीचे इस्लामिक शिक्षण येथेच झाले होते. खामेनी यांच्या शवपेटीवर काळी पगडी घालण्यात आली आहे. ते देशाचे सर्वोच्च नेते असल्याने शवपेटीवर इराणचा राष्ट्रध्वजही गुंडाळण्यात आला आहे.