खाण व्यवसायावर गंडांतर येण्याच्या भीतीने उत्तर व दक्षिण गोव्यातील खनिजवाहू ट्रकमालक व खाणींशी संबंधित इतर व्यावसायिकांनी काल पणजीत विराट मोर्चा आणून शक्तिप्रदर्शन केले. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास जवळजवळ तीन हजार खाण समर्थक पणजीत थडकले. सकाळी अकरा वाजेपर्यंत त्यांनी पणजी – मिरामार दरम्यानचा दयानंद बांदोडकर मार्ग मिलिटरी हाऊसपाशी ठाण मांडून अडवून धरला.
यावेळी पोलिसांनी रस्ता मोकळा करण्याची विनंती आंदोलकांना केली, परंतु त्यांनी मार्ग मोकळा करण्यास नकार दिल्याने पोलिसांनी लाठीहल्ल्याचा निर्णय घेतला. दुपारी सव्वा अकराच्या सुमारास मोर्चेकर्यांना लाठीमार करून पिटाळण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला, परंतु तरीही साडेबारा वाजेपर्यंत मोर्चेकर्यांनी रस्ता रोखून धरला होता.
पोलिसांच्या लाठीहल्ल्यात जखमी झालेले मोर्चेकर्यांचे एक नेते ऍड. भांगी हे अचानक गायब झाल्याने मोर्चेकर्यांनी त्यांना पोलिसांनी अटक केल्याचा संशय व्यक्त केला व त्यांची सुटका होईपर्यंत मोर्चा मागे घेण्यात येणार नसल्याचा पवित्रा घेतला. मात्र, नंतर ऍड. भांगी हे घरी सुखरूप असल्याचा निरोप आल्याने वातावरण निवळले.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी मोर्चेकर्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले असता शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी की नाही याबाबत आंदोलकांतच एकमत नसल्याचे यावेळी दिसून आले. नंतर संध्याकाळी साडे तीन वाजता शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या मागण्या त्यांच्यापुढे ठेवल्या. खाणींना बफर झोन लागू करू नये अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली.
मुख्यमंत्री दिगंबर कामत, मुख्य सचिव संजय श्रीवास्तव, पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा आदींनी यावेळी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतले. राज्यातील खाणींना १० कि. मी. बफर झोन ठेवू नये अशी मागणी केंद्राकडे करण्याचे अभिवचन यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले. राज्यातील खाणी बंद पडतील ही ट्रकमालकांची भीतीही निराधार असल्याचे त्यांनी शिष्टमंडळाला सांगितले.
पोलिसांनी सकाळी मोर्चेकर्यांवर केलेल्या लाठीहल्ल्याची चौकशी करण्याची मागणी यावेळी शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावर चौकशीचे आश्वासन देण्यात आले. संध्याकाळी ट्रकमालकांनी दयानंद बांदोडकर मार्गाच्या बाजूला असलेल्या पदपथावर सभा घेऊन सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा चालूच ठेवण्याचा निर्णय घेतला.
गुप्तचर यंत्रणा अपयशी
पोलिसांची गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरल्यानेच काल सकाळी खाणसमर्थक मोर्चावर पोलिसांना नियंत्रण ठेवणे शक्य झाले नाही.
कदंब बसस्थानकाजवळ जमा होऊन तेथून मोर्चा काढणार असल्याचे खाणसमर्थकांनी सांगितले होते. त्यामुळे वाहतूक पोलिसांना तेथे तैनात केले गेले होते. परंतु अचानक मेरशी जंक्शनवरून मोर्चा काढला. त्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली. या प्रकारामुळे पोलिसांची तारांबळ उडाली.