खाण लिजेसच्या लिलावास प्राधान्य

0
15

>> केंद्रीय मंत्री जोशी यांचे आश्‍वासन

>> सुभाष फळदेसाई यांची माहिती

गोव्यातील खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी खाण लिजेस एका महिन्यात निश्‍चित करून लिलावासाठी मान्यता घ्यावी. खनिज लिजांच्या लिलावाला मान्यता देण्यासाठी प्राधान्यक्रम देण्याचे आश्‍वासन केंद्रीय खाणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिले आहे, अशी माहिती समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी काल दिली.

हैदराबाद येथे आयोजित राष्ट्रीय पातळीवरील खाणमंत्र्यांच्या परिषदेला गोव्याचे समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी उपस्थिती लावली. या परिषदेत सहभागी होऊन गोव्यात परतल्यानंतर मंत्री फळदेसाई वरील माहिती दिली.

गोव्यातील खनिज निर्यात करण्यासाठी लावण्यात आलेले ५० टक्के निर्यात शुल्क शून्यावर आणण्याची विनंती केंद्रीय मंत्री जोशी यांच्याकडे केली आहे. गोव्यातील खनिज कमी दर्जाचे आहे. त्यामुळे निर्यात शुल्क कमी करण्याकडे गंभीरपणे लक्ष देण्याची विनंती करण्यात आली आहे.

गोव्यात पोर्तुगीज काळापासून खनिज व्यवसाय सुरू आहे. मागील १० वर्षांत खनिज व्यवसाय बंद पडल्याने मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील खनिज व्यवसाय त्वरित सुरू करण्याची गरज आहे, असे केंद्रीय मंत्री जोशी यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे मंत्री फळदेसाई यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा विधानसभेत चार ते सहा महिन्यात खनिज व्यवसाय सुरू करण्याचे आश्‍वासन दिलेे आहे. खाण खात्याकडून खनिज पट्‌ट्याच्या लिलावासाठी प्रक्रिया सुरू केलेली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

‘‘गोव्यातील खनिज कमी दर्जाचे आहे. त्यामुळे खनिज निर्यात करण्यासाठी लावण्यात आलेले ५० टक्के निर्यात शुल्क शून्यावर आणण्याची विनंती केंद्रीय मंत्री जोशी यांच्याकडे करून याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती करण्यात आली आहे.’’

  • सुभाष फळदेसाई