दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाकडून आदेश जारी
दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाने दक्षिण गोवा जिल्ह्याच्या हद्दीतील धबधबे, विनावापर खाण खंदक, नद्या, तलाव आणि इतर तत्सम नैसर्गिक जलसाठ्यांमध्ये पोहणे, आंघोळ करणे किंवा प्रवेश करणे टाळण्यासाठी 60 दिवसांच्या बंदीचा आदेश काल जारी केला. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
पावसाळ्याशी संबंधित बुडण्याच्या घटना रोखण्यासाठी दक्षिण गोवा जिल्हा दंडाधिकारी एग्ना क्लिटस यांनी हा आदेश जारी केला आहे. बीएनएसएसच्या कलम 163 अंतर्गत जारी केलेला हा आदेश, पोलीस अधीक्षक (दक्षिण) यांच्या शिफारशीनुसार आहे.
पोलीस निरीक्षक आणि मामलेदारांना या बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उल्लंघन करणाऱ्यांवर बीएनएसच्या कलम 223 अंतर्गत कारवाई केली जाईल, असा इशाराही आदेशात देण्यात
आला आहे.

