Home बातम्या खाण अवलंबितांना केंद्राने आर्थिक पॅकेज द्यावे

खाण अवलंबितांना केंद्राने आर्थिक पॅकेज द्यावे

0

आर्थिक पॅकेजसाठीची मागणी ही राज्य सरकारने केंद्राकडे करावी लागते असे पत्रकारांनी नजरेत आणून देऊन राज्य सरकारला तुम्ही तशी सूचना करणार काय, असे विचारले असता, त्याचे थेट उत्तर देणे शिरोडकर व नाईक यांनी टाळले. तद्पूर्वी बोलताना राज्यातील खाण व्यवसाय बंद होण्यास पूर्णपणे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हेच जबाबदार असल्याचा आरोप वरील दोन्ही नेत्यांनी केला.

विरोधी पक्षनेतेपदी असताना मनोहर पर्रीकर यांनी गोव्यात बेकायदेशीर खाणी चालू असल्याचा आरोप करून रान उठवले. परिणामी देशात व जगभरात तसा संदेश गेला व त्याचा परिणाम म्हणून राज्यातील खाण व्यवसाय बंद पडल्याचा आरोप वरील नेत्यांनी केला. खाणी बंद पडल्यामुळे सात तालुक्यातील लोकांवर थेट परिणाम झाल्याचा व अप्रत्यक्ष गोवाभरातील लोकांवर परिणाम झाल्याचे नाईक व शिरोडकर म्हणाले.

गोव्यातील खाणीसंबंधीचा जो खटला सर्वोच्च न्यायालयात चालू आहे तो कोर्टाने लवकरच निकालात काढावा यासाठीही कॉंग्रेस प्रयत्न करणार असल्याचे वरील द्वयीने सांगितले. दिगंबर कामत सरकारने गेल्या ५ वर्षांच्या काळात बेकायदेशीर खाण व्यवसायाला मोकळे रान दिल्यानेच आज गोव्यावर ही परिस्थिती ओढवलेली असताना तुम्ही पर्रीकर व भाजप सरकारलाच कसे दोषी ठरवता. शहा आयोगाने बेकायदा खाण घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे व दिगंबर कामत यांच्यावर आपल्या अहवालात ठपका ठेवला आहे, त्याबद्दल तुमचे म्हणणे काय असे पत्रकारांनी विचारले असता खाणीसंबंधी राणे व दिगंबर यांनी दिलेले आदेश हे ‘क्वाझी ज्युडिशियल’ स्वरुपाचे होते, असे सांगून असे आदेश देणार्‍याना जर फासावर लटकवायचे झाले तर देशातील सर्व मामलेदार व जिल्हाधिकारी यांना वेगवेगळ्या आदेशांसाठी जबाबदार धरून शिक्षा द्यावी लागेल, असे शिरोडकर व नाईक म्हणाले.

दरम्यान, कॉंग्रेस पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी येत्या २० रोजी प्रदेश कॉंग्रेस समिती सदस्य, गट सदस्य, जिल्हा सदस्य मिळून सुमारे ५०० कार्यकर्त्यांचे एक शिबिर पणजीत आयोजित करण्यात आले असल्याचे वरील नेत्यांनी सांगितले. पुढील दोन महिन्यात महिला कॉंग्रेसचे शिबिरही आयोजित करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.